उदयनराजे भोसले पुढच्या आठवड्यात भाजपमध्ये येणार- चंद्रकांत पाटील

उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.

फोटो स्रोत, Sai Sawant

फोटो कॅप्शन,

उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाजप प्रवेशावरील चर्चांना उधाण आलं होतं.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना फोन केला होता आणि दिल्ली में आने के बाद मिलिये असं म्हटल्याचा एक व्हीडिओ देखील फिरत होता. त्यावरून उदयनराजे भाजपात येतील असा तर्क लावला जात होता. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं.

या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांच्याबाबत या 10 गोष्टी जाणून घ्या.

1. लेवे खून प्रकरणी अटक

1999 - साताऱ्यातले नगरसेवक शरद लेवे यांच्या खून प्रकरणात उदयन राजेंना अटक झाली. अटकेआधी उदयनराजेंनी अरेरावी केली, असा दावा निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी त्यांच्या 'नवी दिशा - पोलीस प्रशासनाची' या पुस्तकात केला आहे. त्यावेळी उदयनराजे युतीच्या सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री होते.

2. 'गोळ्या घालू'

2001 - सातारा नगरपालिकेवर जप्तीचे आदेश कोर्टाने दिले होते, तेव्हा उदयनराजे नगरपालिकेत आले आणि सीईओंच्या खुर्चीवर बसून सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिली, अशा बातम्या तेव्हा वृत्तपत्रांत छापून आल्या होत्या. "गोळ्या घालू" या शब्दांत त्यांनी धमकी दिल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांत छापून आल्या होत्या.

3. पोलीस स्टेशनात शिवीगाळ

2002 - कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर उदयनराजे थेट पोलीस स्टेशनात पोहोचले. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करून स्वतःच्या कार्यकर्त्याला बळजबरीने सोडवून घेतलं. उदयनराजेंविरोधात गुन्हा दाखल झाला.

4. आवाज वाढव डीजे...

2008 - रात्री बारानंतर लाऊडस्पीकरवर गाणी लावायला बंदी असतानाही उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना गाणी सुरू ठेवण्याचा जाहीर सल्ला दिला. त्यानंतर साताऱ्यातल्या अनेक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत मोठ्याने गाणी वाजवली.

त्यावेळी पोलिसांनी 56 मंडळांविरोधात गुन्हे दाखल केले. पुढे काही वर्षांनी मिरवणुकीदरम्यान डॉल्बी लावण्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हाही उदयनराजे त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले "मी आहे इथं...डॉल्बी चालू करा." हा व्हीडिओ यूट्यूबवर अजूनही आहे.

फोटो स्रोत, Sai Sawant

फोटो कॅप्शन,

उदयनराजे भोसले सातारा पोलीस स्टेशनाबाहेर.

5. पक्ष गेला खड्ड्यात!

2009 - उदयनराजे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, त्यावेळी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांच्याकडे काहीसं दुर्लक्ष झालं. वैतागून उदयनराजे त्यातून बाहेर पडले. नंतर पुण्यातच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 'पक्षबिक्ष गेला खड्ड्यात, साताऱ्याची जनता हाच माझा पक्ष. उदयनराजे स्वतंत्र आहेत. मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो', असं विधान केलं.

6. दारू पिऊन पत्रकार परिषद?

2009 - उदयनराजेंवर अनेक वेळा आरोप झाले आहेत की, ते दारू पिऊन पत्रकार परिषद घेतात. अशाच एका वादग्रस्त पत्रकार परिषदेत ते एकावर एक खुर्च्या ठेवून त्यावर जाऊन बसले होते. प्रत्येक खुर्ची ही एका पक्षाची आहे, असं ते म्हणाले.

7. शर्ट काढला

2010 - साताऱ्यातल्या गांधी मैदानात झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उदयनराजेंनी शर्ट काढून पोझ दिली होती. ही वर्तणूक योग्य आहे का, याविषयी त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.

त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली, त्यावरून ते दारू प्यायले होते, असा आरोप माध्यमांनी केला होता. उदयनराजेंनी नंतर दिल्लीत दुसरी पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचं खंडन केलं.

8. काचा फोडल्या

2012 - सुशील मोझर नावाच्या व्यक्तीविरोधात उदयनराजेंनी आंदोलन केलं. उदयनराजेंवर मोझर यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा आरोप आहे. या प्रकरणीही उदयनराजेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फोटो स्रोत, Sai Sawant

फोटो कॅप्शन,

उदयनराजे आधी भाजपमध्ये होते. आता ते राष्ट्रवादीत आहेत.

9. जेम्स बाँडसारखे फोटो

2014 - "उदयन राजेंनी आपल्या पोलीस सुरक्षा रक्षकाची पिस्तूल गंमत म्हणून बघायला घेतली आणि बंदुक घेऊन आपले जेम्स बाँड स्टाईल फोटो काढून घेतले. हे फोटो व्हायरल झाले. नंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याची खात्यांतर्गत चौकशी झाली," असं दै. तरूण भारतचे वरिष्ठ उपसंपादक संदीप राक्षे यांनी सांगितलं.

10. उद्योजकाला मारहाण

2017 : सोना अलाईज या कंपनीचे मालक रवींद्रकुमार जैन यांना मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजेंविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत बीबीसी मराठीला अधिक माहिती देताना दै. सकाळचे सातारा शहर प्रतिनिधी शैलेंद्र पाटील यांनी सांगितलं की जैन यांनी खंडणी व मारहाण प्रकरणी तक्रार नोंदवली.

पोलिसांनी याबाबत उदयनराजे आणि अन्य १० व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. जखमी अवस्थेत जैन यांनी साताऱ्यातून पळ काढला आणि उपचारासाठी पुण्यात पोहोचले. उदयनराजे यांना अनेक प्रयत्न करूनही अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

उदयनराजेंची बाजू

या सर्व प्रकरणांविषयी आम्ही उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे निकटवर्तीय सुनील काटकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "महाराज मुळात राजकारणी नाहीत. ते राजकारणी असते, तर एकही गुन्हा दाखल झाला नसता. त्यांची मोठी लोकप्रियता राजकीय लोकांच्या डोळ्यांत खुपते आणि तेच गुन्हा दाखल करायला काही लोकांना प्रवृत्त करतात."

उदयनराजेंनी कधीही कुणालाही शिवीगाळ केला नसल्याचा दावाही काटकर यांनी केला. तसंच, ते पोलिसांशी मित्राप्रमाणे वागतात, असंही ते म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)