ट्रान्सजेंडरसाठी मध्य प्रदेशात स्वतंत्र टॉयलेट

भोपाळमधील ट्रान्सजेंडरसाठीचं टॉयलेट Image copyright SHUREH NIYAZI

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र टॉयलेट सुरू करण्यात आलं आहे. फक्त ट्रान्सजेंडरसाठी असणारं देशातलं हे पहिलंच टॉयलेट असल्याचा दावा भोपाळ नगर निगमने केला आहे.

भोपाळमध्ये 3000 च्या वर ट्रान्सजेंडर असून भोपाळ शहराच्या जुन्या भागातील 'मंगळवार' आणि 'बुधवार' या परिसरात त्यांची संख्या जास्त आहे.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येला स्वच्छतागृहासारखी प्राथमिक सुविधा देण्याचा अद्याप विचार झाला नव्हता.

हा विचार करून भोपाळच्या 'मंगळवार' परिसरात हे टॉयलेट सुरू करण्यात आलं आहे. हे टॉयलेटमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

ट्रान्सजेंडर शहरातील विविध भागात नाचगाण्याचे काम करतात.

'सर्वांना समान दर्जा'

या टॉयलेटचं उद्घाटन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. ते म्हणाले, "समजातील प्रत्येक वर्गाला समान दर्जा देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच ट्रान्सजेंडरनाही इतर नागरिकांसारखंच मानण्यात आलं आहे."

शहरातील ट्रान्सजेंडरच्या गटाच्या प्रमुख सुरैय्या नायक म्हणाल्या, "सरकराचे हे प्रयत्न फारच चांगले आहेत. यामुळं आमची फार मोठी गरज पूर्ण होणार आहे. महिला आणि पुरुष दोघेही आक्षेप घेत असल्यानं इतर टॉयलेट ट्रान्सजेंडर वापरू शकत नाहीत."

2014 मध्ये सर्वोच्च न्यालायाने एका सुनावणीदरम्यान ट्रान्सजेंडरसाठी स्वंतत्र टॉयलेट असली पाहिजेत, असं म्हटलं होतं.

भोपाळच्या महापौर आलोक शर्मा म्हणतात, "शहराची स्वच्छतेचा विचार करता आमची जबाबदारी आहे की समाजातीस सर्व घटकांच्या अडचणी दूर केल्या जाव्यात. हे पाऊलसुद्धा या भूमिकेतूनच उचलण्यात आलं आहे."

Image copyright SHUREH NIYAZI

या टॉयलेटचं वैशिष्ट्य म्हणजे यात मेकअपरूम सुद्धा आहे.

काही ट्रान्सजेंडरनी मात्र या टॉयलेटची जागा अन्यत्र हवी होती, असं वाटतं. या परिसरात ट्रान्सजेंडर जास्त संख्येने राहतात, त्यांच्या घरात टॉयलेट असल्यानं या टॉयलेटचा वापर कमी होईल.

या टॉयलेटची खरी गरज शहराच्या इतर ठिकाणी आहे, अशी प्रतिक्रिया काही ट्रान्सजेंडरनी दिली.

मध्यप्रदेशातून पहिला ट्रान्सजेंडर आमदार

मध्यप्रदेशमधून देशाला पहिला ट्रान्सजेंडर आमदार दिला होता. 1998 ला दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये शहडोल जिल्ह्यातील सुहागपूर विधानसभा मतदार संघातून शबनम मौसी विजयी झाल्या होत्या.