प्रेस रिव्ह्यू - गांधी हत्येच्या फेरतपासाची पडताळणी

महात्मा गांधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपासाची खरोखरच आवश्यकता आहे का? याची पडताळणी करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपासणी शक्य आहे का? याची पडताळणी करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयानं विधिज्ञ अमरेंद्र शरण यांची नियुक्ती केली आहे. गांधी हत्येत आणखी एका आरोपीचा सहभाग होता काय? याबाबत मुख्यत्वे तपासणी केली जाणार आहे.

'अभिनव भारत' संघटनेशी संबंधित पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाल्यावर शरण यांची अमायकस क्यूरी (न्यायालयाचा मित्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा त्रावणकोर इथल्या देवासम मंदिराच्या बोर्डानं मंदिरात प्रथमच 6 दलित पुजाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

दलित पुजऱ्यांचीनियुक्ती

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, त्रावणकोरमधल्या देवासम मंदिराच्या बोर्डानं मंदिराच्या पुजाऱ्यांची नियुक्ती करताना नवा पायंडा पाडला आहे.

नव्यानं नियुक्त करण्या आलेल्यांपैकी 36 पुजारी हे ब्राह्मण समाजातील नाहीत. विशेष म्हणजे यातील 6 पुजारी हे दलित आहेत.

यापूर्वी मंदिर बोर्डानं, ब्राह्मण समाजातील नसलेल्यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. पण, दलित समाजातील पुजारी नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नोटबंदीनंतर ५,८०० कंपन्यांनी केलेले बेनामी व्यवहार उघड झाले आहेत.

बनावट कंपन्यांच पितळ उघड

महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तानुसार, काळा पैसा आणि शेल कंपन्यांच्या विरोधातील भक्कम पुरावे केंद्र सरकारनं गोळा केले आहेत. नोटाबंदीनंतर झालेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती 13 बँकांनी केंद्राला सादर केली.

त्यामध्ये ५,८०० कंपन्यांनी केलेले बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. नोटाबंदीनंतरच्या काळात या खात्यांतून ४५५२ कोटी रुपये काढल्याचं समोर आले आहे. बँकांनी या कंपन्यांच्या १३,१४० खात्यांचे तपशील सादर केले आहेत.

यातील एका कंपनीकडे २,१३४ बँक खाती असल्याचे उघड झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नारायण राणे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली.

राणेंविरोधात जनहित याचिका

लोकसत्तामधील वृत्तानुसार, नारायण राणे यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्थापन करून NDA मध्ये जाण्याची तयारी सुरू केली आहे.

राणे यांच्यासह एका नामांकित विकासकाविरोधात ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सुरू असलेली चौकशी अचानक बंद करण्यात आली आहे.

राणे सत्ताधारी भाजपच्या गोटात सहभागी होत असल्यानं ही चौकशी बंद करण्यात आली आहे, असा आरोप या जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)