भारताचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल - टोनी हॉल

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू या भाषांमध्ये बीबीसीची सेवा सुरू झाली आहे.

सोशल मीडियाचा प्रभाव, फेक न्यूजचा सामना, लिंगभेदविषयक बाबींचं वार्तांकन याबद्दल बीबीसीचे डायरेक्टर जनरल लॉर्ड टोनी हॉल यांनी विचार मांडले आहेत.

बीबीसीनं भारतातील चार नव्या भाषांमध्ये पदार्पण केलं आहे. मराठी, तेलुगू, गुजराती आणि पंजाबी या भाषांमध्ये वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर बीबीसीचे डायरेक्टर जनरल लॉर्ड टोनी हॉल यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये बीबीसीची भूमिका आणि पुढील वाटचालीची माहिती दिली.

नव्या चार भाषांमध्ये सेवा सुरू करताना लॉर्ड टोनी हॉल यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतात बीबीसीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

या माध्यमातून भारताचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

युरोपसह जगातील प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनात महिलांना पुरेसं स्थान मिळत नाही. पण बीबीसीच्या या विस्तारामुळे त्यात समानता आणण्यात मदत होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

बीबीसीचं भारतातील याबाबतचं वार्तांकन एकाच पठडीतलं नसावं तर ते विविध पैलू हाताळणारं असावं.

तसंच समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील स्त्रीपुरूषांचा त्यात सामावेश असावा असं सुद्धा टोनी हॉल यांनी म्हंटलं आहे.

इंटरनेटवर पसरणाऱ्या फेक न्यूजबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच फेक न्यूजला आळा घालण्यावरही त्यांनी चर्चा केली.

"इंटरनेटचं स्वरूप आणि सोशल मीडियाचा चेहरा आपण बदलू शकत नाही. पण आपण एक असं व्यासपीठ नक्कीच उपलब्ध करून देऊ शकतो, जिथं लोक घटनांची सत्यता पडताळून पाहू शकतील. अचूक गोष्टी समजून घेऊ शकतील," असं मत त्यांनी फेक न्यूजबाबत बोलताना व्यक्त केलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)