कीटकनाशकांमुळे मृत्यू : यवतमाळचे शेतकरी वाचू शकले असते का?

सुरक्षा साधनांशिवाय फवारणी
प्रतिमा मथळा यवतमाळमध्ये अजूनही सुरक्षा साधनांशिवाय फवारणी सुरू आहे.

यवतमाळ जिल्हा यापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. कीटकनाशक प्राशन करून अनेक शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. आत्महत्यांचं ते प्रमाण कमी झालं, पण तीच कीटकनाशकं आता इथल्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहेत.

एकट्या यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण विदर्भात हा आकडा २४ पर्यंत पोहोचला आहे. शेकडो शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतले आहेत.

प्रश्न आता हा विचारला जातो आहे की, ही भीषण दुर्घटना कल्पनेच्या पलिकडची होती का? की यवतमाळची कीटकनाशक फवारणी हा एक टाईम बॉम्ब होता जो कधीतरी फुटणार होता?

सुरक्षा साधनांचं काय?

महाराष्ट्र सरकारनं आता उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे आणि दोषी कीटकनाशक कंपन्यांवर कारवाईची भाषा सरकार करतं आहे. सोबतच कीटकनाशक फवारतांना वापरायची सुरक्षा साधनंही पुरवणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. पण ही प्रशासनावर पडणारी जबाबदारी टाळता येणार आहे का? सुरक्षेचे हे उपाय दुर्घटनेअगोदरच शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचवले नाहीत हा प्रश्न विचारला जातो आहे.

बहुतांश शेतकरी कीटकनाशकांच्या निवडीसाठी आणि त्यांच्या मात्रांसाठी खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या कृषी सेवा केंद्रांच्या चालकांवरच सल्ल्यासाठी अवलंबून राहतात.

जबाबदारी कुणाची?

कोणती कीटकनाशकं किती विषारी आहेत, त्यांची किती मात्रा किती प्रमाणात वापरायची आहे, ती कोणत्या पिकांसाठी वापरायची आहेत, ती वापरतांना सुरक्षेचे कोणते उपाय घ्यायचे आहेत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे.

कृषी सहाय्यक अधिकारी, कृषिसेवकही त्यासाठी नेमले जातात, पण तरीही शेतकऱ्यांचे आणि मजुरांचे जीव कसे गेले हा प्रश्न विचारला जातो आहे.

धोकादायक फवारणी

डॉ चेतन दारणे स्वत: दंतचिकित्सक आहेत, पण शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर यवतमाळमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचं निरीक्षण हे आहे की, शेतकऱ्यांचं जे आणि जसं प्रबोधन व्हायला हवं ते होत नाही आणि त्यामुळे सर्रास धोकादायक पद्धतीनं कीटकनाशक फवारणी होते.

"शेतकरी वा मजूर इतके शिक्षित नसतात की ते सगळं समजू शकतील. हे शासनाच्या पातळीवरचं अपयश आहे. कृषी सहाय्यकाचं काम आहे की, त्यानं गावागावांत जायला हवं. माहिती द्यायला हवी. इथं कृषि सेवक आठवड्या पंधरवड्यातून एकदा येतो. त्यामुळं या शेतकऱ्यांचं हवं ते प्रबोधनच होत नाही", असं डॉ. चेतन दारणे यांनी बीबीसीला सांगितलं.

"दुसरी गोष्ट म्हणजे ज्या इमरजन्सी सुविधा स्थानिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असायला हव्यात त्याही इथे नाहीत. त्यासाठी थेट यवतमाळला शासकीय रुग्णालयात जावं लागतं. इथे तर रक्ताचीही तपासणी होत नाही. साधा मजूर त्या तपासणीचे दोनशे अडीचशे रुपयेसुद्धा भरू शकत नाही", असंही दारणे म्हणाले.

'...पण प्रश्न रोजीरोटीचा आहे'

दारणेंचे शब्द पुढच्या काहीच वेळात प्रत्यक्ष पहायला मिळातात. यवतमाळच्या या दुर्घटनेची कारणं शोधत जेव्हा आम्ही जिल्हाभर फिरलो तेव्हा दिसलं की, जरी बहुतांश फवारणी संपली असली तरी अजूनही काही शिवारांमध्ये ती सुरु आहे. शेतकरी आणि शेतमजूर उघड्या अंगानं फवारणी करत आहेत.

प्रतिमा मथळा शेतमजुरांपर्यंत अजूनही सुरक्षेसंदर्भातल्या सूचना पोचलेल्या नाहीत.

सावरगांवहून कळंबकडे जातांना रस्त्यालगतच्या कापसांच्या शेतामध्ये फवारणी करून परततांना काही मजूर आम्हाला दिसले. त्यांच्या पाठीवर स्प्रे पंप लावले आहेत... बोलतांना हे समजतं की, त्यांना माहिती आहे - त्यांच्यासारखे १९ जण कीटकनाशकांमुळे दगावले आहेत. मग त्यांना भीती वाटते का?

"आम्ही तर जे शेतकरी सांगतात तेच करतो. आम्हाला तरी अजून कोणा अधिकाऱ्यानं वगैरे येऊन काही सांगितलं नाही. आम्ही जे करतो ते पोटासाठी करतो. त्यातूनही आमच्या जिवाला काही झालंच तर झालं... आता काय करायचं?" निनंता बोंद्रे सांगतात.

पण त्यांना कोणी कृषि अधिकाऱ्यानं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ते काम करतात त्यांनी काही सुरक्षेचे उपाय सांगितले आहेत का? ते काय करतात?

"आम्हाला इतकंच सांगितलं जातं की, सुरक्षा करा. आम्ही मग आमच्या पद्धतीनं ती करतो. जेवतांना हात मातीनं धुऊन घेतो आणि फवारणी करतांना हे कापड तोंडावर बांधून घेतो." अवधूत दुनगुणे सांगतात.

"बाकी औषध उघडं असतं. ते डोळ्यात जातंच, त्वचेवर असतं. शरीराचा असा एकही भाग नाही औषध (कीटकनाशक) तिथं लागत नाही. आम्हाला अजून तरी काही त्रास झाला नाही. पण बाकी सगळं ग्लोव्ह, गॉगल ते तर काही शेतकऱ्यांपाशीसुद्धा नाही, मग आम्हा मजुरांकडे ते कुठून येणार?"

"जिवाला धोका आहे हे आम्हाला माहीत आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे, मग काय करू?" अवधूत दुनगुणे त्यांची व्यथा मांडतात.

यवतमाळ जिल्ह्यात जे १९ मृत्यू झाले, त्यातले ९ जण शेतमजूर होते. त्यांच्या नावावर काहीही जमीन नाही. फवारणीसारखी कामं रोजंदारीवर करून ते पैसे ते कमावत होते.

त्यापैकी एक होते देवीदास मडावी. १९ ऑगस्टला त्यांचा या दुर्घटनेत पहिला बळी गेला आणि मग गांभीर्य साऱ्यांच्या लक्षात आलं.

आम्ही कळंब या त्यांच्या गावी त्यांच्या २५ वर्षांच्या मुलाला - संदीपला भेटलो, तेव्हा त्याच्या डोळ्यात हीच चिंता दिसत होती की, या विषारी कीटकनाशकांबद्दल, त्यासाठी आवश्यक सुरक्षा साधनांबद्दल साध्या शेतमजूराला काय समजणार?

'वडील तर गेले, दुसरं कुणी जायला नको'

"हे सगळं त्या फवारणीनं झालं. जर शेतकरी किंवा मजूर स्वत: हे साहित्य घेऊ शकत नाही तर कंपनीनं ते द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या अंगावर ड्रेस, मास्क द्यायलाच पाहिजे. आता तरी हे द्यायलाच हवे", संदीप मडावी प्रकर्षाने हे मांडतो.

प्रतिमा मथळा देवीदास मडावी यांचा मुलगा

"माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, पण बाकी कोणाच्या घरी असं व्हायला नको. जबाबदार तर कंपन्यांनाच धरायला हवं. त्यांची कीटकनाशकं खपण्यासाठी ते काहीही करतात, पण मजूर वर्गाला तर सगळं समजत नाही ना! मजूराला कुठं समजतं की, औषध चांगलं आहे की बेकार? एवढी काळजी तर साधारण मनुष्य नाही घेऊ शकत", संदीप मडावी सांगतो.

जिल्हा प्रशासनाचं म्हणणं हे आहे की, कीटकनाशकांमुळे शरीरावर परिणाम होण्याच्या घटना केवळ याच वर्षी घडलेल्या नाहीत. गेल्या वर्षीही दीडशेहून अधिक घटनांची नोंद झाली होती.

'शेतकरी ऐकत नसतील तर काय करणार'

पण मग धोक्याची घंटा वाजूनही वेळीच उपाय का केले गेले नाहीत? पण महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांचा दावा आहे की सारे उपाय केले गेले होते.

बीबीसी मराठी'नं विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देतांना कृषिमंत्री पांडुरंग फ़ुंडकर म्हणाले, "आम्ही सांगितलं होतं. आमच्या कृषी विभागानं पत्रकं वाटली, मेळावे घेतले. इतकं सगळं करून जर शेतकरी ऐकत नसतील, तर त्याला तुम्ही काय करणार?"

प्रतिमा मथळा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

"ग्रामसभा घेतल्या, आकाशवाणीवर सांगितलं. आमचे कृषी विभागातर्फे आदेश असतात, दररोज पंचवीस हजार मेसेज जातात", असं फुंडकर म्हणाले.

अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे म्हणून आम्ही १५ दिवसांत कृषी सहायक आणि मंडल अधिकाऱ्यांच्या जागा भरायचं निश्चित केलं आहे, असंही फुंडकर यांनी सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)