प्रेस रिव्ह्यू - 'कुलभूषण जाधव वाचण्याची शक्यता कमी'

कुलभूषण जाधव Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव यांच्या विरोधात पाकिस्ताननं खूप पुरावे जमा केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानातील कारागृहात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची वाचण्याची शक्यता कमी आहे.

जाधव यांच्या विरोधात पाकिस्ताननं खूप पुरावे जमा केल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानं केला आहे.

पाकिस्तानातील रोजनामा एक्सप्रेस या वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे. जाधव यांच्याविरोधात पाकिस्तानात ठिकठिकाणी हल्ले केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पाकिस्तानी अॅटॉर्नी जनरलच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या समितीत तिथल्या संरक्षण, गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ही समिती जाधव यांच्याविरोधात जमा केलेले पुरावे 13 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल करणार आहे. त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकन दूतावासानं भारतीय नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियावर आगळीच मोहीम सुरू केली आहे.

एक चुटकी सिंदुर...

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, अमेरिकन दूतावासानं भारतीय नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियावर आगळीच मोहीम सुरू केली आहे.

अमेरिकन दूतावासाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख मेरीके लॉस कार्लसन यांनी भारतीय संस्कृतीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.

यासाठी सोशल मीडियावर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बॉलीवूड राग आळवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दूतावासातील अधिकारी बॉलीवूड अभिनेते-अभिनेत्रींचा पेहराव करून त्यांचे प्रसिद्ध हिंदी संवाद त्यांच्या लहेजात सादर करत आहेत.

कार्ल अॅडम या अधिकाऱ्यानं शशी कपूर यांचा सादर केलेला 'मेरे पास मा है' हा संवाद आणि अलियाना या महिला अधिकारीनं ओम शांती ओम चित्रपटातील दिपीका पदुकोणचा 'एक चुटकी सिंदूर' आणि त्यांच्या सारखे केलेले पेहराव यांचे व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Image copyright ROMEO GACAD/GETTY IMAGES

चीनमधील कच्चा माल नको

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारत आणि चीनमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात तणाव वाढीस लागला आहे.

औषध निर्मितीत उपयोगी येणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत सध्या चीनवर अवलंबून आहे. पण, आरोग्य मंत्रालय आणि ड्रग नियामक प्राधिकरणानं हे अवलंबित्व कमी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

चीनमधून येणारा माल हा गुणवत्तापूर्ण असेल तरच तो भारतीय बाजारपेठेत येऊ दिला जाण्यावरही त्यांच्यात एकमत झालं आहे.

सध्या भारत औषध निर्मितीसाठी लागणारा 70 ते 80 टक्के कच्चा माल हा चीनमधून आयात करतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सीमा शुल्क गोदामाच्या अधिकाऱ्यांनी उंदरांनी अमली पदार्थ खाल्ल्याचा दावा केला आहे.

'अंमली पदार्थ उंदारांच्या घशात'

सकाळ मधील वृत्तानुसार, महसूल गुप्तचर संचलनालयानं (डीआरआय) जप्त केलेले 34 किलो अंमली पदार्थ गायब सध्या गायब झाले आहेत. त्याचा पत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाही.

त्यामुळे या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे. परंतु चौकशीत सीमा शुल्क गोदामाच्या अधिकाऱ्यांनी उंदरांनी अंमली पदार्थ खाल्ल्याचा दावा केला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत 3.4 कोटी रुपये आहे. गोदामातील काही पाकिटं कुरतडलेली आढळल्यानं त्यांनी हा दावा केला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय उद्योगपती अदानी यांच्या ऑस्ट्रेलियातील कोळशाच्या खाणींविरोधात स्थानिकांनी शनिवारी निदर्शने केली.

अदानीच्या कोळसा खाणीविरोधात ऑस्ट्रेलियात निदर्शनं

बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या ऑस्ट्रेलियातील कोळशाच्या खाणींविरोधात स्थानिकांनी शनिवारी निदर्शने केली. ही निदर्शनं जवळपास ४५ ठिकाणी झाली.

यासाठी 'स्टॉप अदानी' चळवळ उभारण्यात आली आहे. 'अदानी एन्टरप्रायझेस' या खाण उद्योगातील भारतीय कंपनीच्या कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शनं करण्यात आली.

कारमायकेल कोळसा खाण ही ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी खाण ठरली असती. मात्र पर्यावरणाच्या प्रश्नांमुळे तिला विलंब झाला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)