BBC Innovators: बाळांचा जीव वाचवणारी शँपूची बाटली

डॉ. मोहम्मद जोबायेर चिश्ती
प्रतिमा मथळा डॉ. मोहम्मद जोबायर चिश्ती

बांगलादेशच्या एका अवलिया डॉक्टरनं शँपूच्या बाटलीतून कमी किंमतीचं जीवनरक्षक यंत्र तयार केलं आहे. ज्या यंत्रानं आतापर्यंत अनेक बालकांचे प्राण वाचवले आहेत. विकसनशील देशांमधील हॉस्पीटलमध्ये व्हेंटिलेटरसारख्या यंत्रांवर लाखो रूपये खर्च करण्याची क्षमता नाही.

मात्र त्यावर पर्याय म्हणून डॉ. मोहम्मद जोबायर चिश्ती यांनी विकसित केलेलं यंत्र हॉस्पीटलचा लाखोंचा खर्च आणि मुके जीव असं दोन्हीही वाचवत आहे.

"प्रशिक्षणार्थी (इंटर्न) म्हणून ती माझी पहिली रात्र होती आणि तीन मुलांना मी हे जग सोडताना पाहिलं. मी स्वत: इतका हतबल झालो की मला अश्रू अनावर झाले."

1996 साली, डॉ. मोहम्मद जोबायर चिश्ती हे बांगलादेशातील सिल्हेट मेडिकल कॉलेजच्या बालरोगविभागात काम करत होते. न्यूमोनिया मुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची त्या संध्याकाळी त्यांनी शपथ घेतली.

न्यूमोनियामुळे दरवर्षी अंदाजे 9,20,000 बालकं आणि छोटी मुलं दक्षिण आशिया आणि उप-सहारन अफ्रिकेत मृत्यूमुखी पडतात.

दोन दशकांच्या संशोधनानंतर डॉ.चिश्ती यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि कमी किमतीचं उपकरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. ज्यामध्ये हजारो बालकांचा जीव वाचवण्याची क्षमता आहे.

महागडी यंत्रं

न्यूमोनिया फुप्फुसांवर परिणाम करतो. स्ट्रेप्टोकोकस (स्ट्रेप थ्रोट) बॅक्टेरिया किंवा रेस्पीरेटरी सिंकीटिअल वायरस (आरएसवी) फुप्फुसांना बाधित करतो.

त्यामुळे फुप्फुसांना सूज येते. आणि द्रव्य किंवा पू नी भरल्यामुळे त्यांची प्राणवायू आत घेण्याची क्षमता कमी होते.

प्रतिमा मथळा डॉ. चिश्ती यांनी तयार केलेले यंत्र

विकसनशील देशांच्या हॉस्पिटल्समध्ये न्यूमोनिया असणाऱ्या मुलांना श्वास घेता यावा म्हणून व्हेंटिलेटरचा वापर करतात. पण, अशा प्रत्येक मशीनची किंमत 9 लाख 70 हजाराच्या जवळपास असते.

तसंच खास प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत ते चालवावं लागतं. बांगलादेशसारख्या विकसनशील देशात हे खूप महाग पडतं.

जागतिक आरोग्य संघटनेनं गंभीर स्थितीत पोहोचलेल्या न्यूमोनियासाठी ऑक्सिजनची कमी मात्रा देण्याचं सुचवलं आहे. पण, तरी सुद्धा न्यूमोनिया झालेल्या सात पैकी एका बालकाचा मृत्यू होतो.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मध्ये काम करत असताना डॉ.चिश्ती यांनी बुडबुड्यांचं सीपॅप यंत्र पाहिलं.

या यंत्रात सततचं अर्थात कंटिन्यूअस पॉजिटीव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) दिलं जातं. ज्यामुळे फुप्फुस बंद होण्यापासून वाचवलं जाऊ शकतं. या यंत्रामुळे आपलं शरीर सुद्धा पुरेसा प्राणवायू शोषून घेऊ शकतं. पण हे यंत्र महागडं असतं.

जेव्हा ते कामानिमीत्त बांगलादेशच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर डायरिया डिसीज रिसर्च या संस्थेत परतले तेव्हा ते या सोपं आणि स्वस्त सीपीएपी यंत्र तयार करण्याच्या कामाला लागले.

त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक निरुपोगी प्लॅस्टीकची शॅम्पुची बाटली घेतली. त्यात पाणी भरलं आणि एका बाजूनं एक प्लॅस्टिकची ट्यूब त्यात घातली.

"मुलं ऑक्सिजन टाकीमधून प्राणवायूचं श्वसन करतात आणि एका ट्युब मधून श्वास सोडतात, जो एका पाण्याच्या बाटलीत जातो ज्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होतात." डॉ चिश्ती सांगतात.

बुडबुड्यांमधून येणारा दाब फुप्फुसामधल्या छोट्या हवेच्या पिशव्या खुल्या ठेवतो.

"आम्ही आधी हे इतर चार ते पाच रुग्णांवर वापरून पाहीलं. आम्हाला काही तासांमध्येच त्यात चांगला बदल दिसला."

यशस्वी चाचणी

"डॉक्टरांनी खूप मेहनत घेतली. प्राणवायू घेण्यासाठी एक पाईप, अणि मग त्याला एक पांढरी गोल बाटली जोडली. ज्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होऊ लागले." कोहिनूर बेगम यांनी सांगितलं.

कोहिनूर बोगम यांच्या मुलीवर याच उपकरणानं उपचार करण्यात आला होता.

" या उपचारांनतर जेव्हा माझ्या मुलीला बरं वाटलं तेव्हा मला खूप आनंद झाला."

प्रतिमा मथळा पती आणि मुलीसोबत कोहिनूर बेगम

दोन वर्षाच्या अभ्यासानंतर लॅन्सेट मासिकात डॉ.चिश्ती यांनी त्यांच संशोधन प्रकाशित केलं.

ज्या मुलांवर बुडबुडे असलेल्या सीपीएपी यंत्रणेनं उपचार झाले त्यांचा मृत्युदर लो फ्लो प्राणवायू पद्धतीपेक्षा खूपच कमी होता, हे संशोधनात लक्षात आलं. अवघ्या 81 रूपयांत हे उपकरण मृत्यूदर 75 टक्क्यांनी कमी करत असल्याचं दिसून आलं.

हे उपकरण प्राणवायूचा प्रभावी वापर करतं ज्यामुळे हॉस्पीटलचा प्राणूवायूवरचा वार्षिक खर्च 19 लाख 55 हजारावरून 3 लाख 19 हजारापर्यंत खाली आला आहे.

अद-दिन महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात कार्यरत असलेले डॉ. एआरएम लुथफुल कबीर सांगतात, "राष्ट्रीय स्तरावर याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पण, सुरुवातीचे निकाल प्रेरणादायक आहेत."

"या नावीन्यपूर्ण आविष्कारात मृत्युदर कमी करायची मोठी क्षमता आहे. कारण, कुठल्याही हॉस्पिटलला हे परवडण्यासारखं आहे."

आतापर्यंत कमी किंमतीच्या या जीवनरक्षकामुळे 600 मुलांचे जीव वाचले आहेत.

डॉ. चिश्ती यांना आता बढती मिळाली आहे. ते हॉस्पिटलच्या क्लिनिकल रिसर्च विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना 3 मुलं असून स्वतःच्या मुलांइतकाच ते वॉर्ड मधल्या मुलांसाठी वेळ काढतात.

जेव्हा त्यांना विचारलं जातं की वीस वर्षापूर्वी त्यांनी घेतलेल्या शपथेबाबत काय वाटतं तेव्हा ते म्हणतात, "माझ्याकडे व्यक्त करायला शब्द नाहीत."

विकसनशील देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बबल सीपीएपी यंत्र असायला हवं असं त्यांना वाटतं.

"त्यादिवशी आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो की न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या शून्यच्या जवळ आली आहे."

बीबीसी वर्ल्ड सर्विसची हीनिर्मिती बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशननं पुरस्कृत केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)