प्रेस रिव्ह्यूः अयोध्येत रामाचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव

अयोध्येत शरयू नदीच्या किनारी रामाचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव; नांदेडमध्ये शिवसेना ही काँग्रेसची बी टीम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले; स्पेनचे विभाजन होऊ देणार नाही, असा स्पॅनिश पंतप्रधानाचा इशारा, या आजच्या प्रमुख बातम्यांचा हा आढावा.

Image copyright NOAH SEELAM/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा अयोध्येत भगवान रामचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव

अयोध्यात उभारणार रामाचा भव्य पुतळा

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर भगवान रामचा भव्य पुतळा उभारण्याची योजना आखली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प असल्याचं म्हटलं आहे.

सरकारच्या प्रेझेंटेशनमध्ये हा पुतळा 100 मीटर असल्याचं दर्शविण्यात आलं आहे. पर्यटन खात्याचे प्रधान सचिव अविनाश अवस्थी यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी हा संकल्पा प्रस्ताव असून अद्याप त्यास पर्यावरणाची परवानगी घ्यायची असल्याचं सांगितलं.

शिवसेना काँग्रेसची बी टीम

"नांदेडमधील शिवसेना म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे. शिवसेनेला या शहरात सत्ता तर सोडा दोन आकडी नगरसेवकही निवडून आणता येणार नाही," अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

11 ऑक्टोबरला नांदेड महापालिकेची निवडणूक आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार फडणवीस नांदेडमध्ये झालेल्या एका सभेत बोलताना म्हणाले, "अशोक चव्हाण यांनी मुंबईत फ्लॅट घेतले आणि दुसरीकडे नांदेडमधील पन्नास हजार कुटुंबांना अजूनही हक्काचे घरे नाहीत. मग काँग्रेसचे नाते विकासाशी कसे?"

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

दुसरीकडं सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. "नोटाबंदीमुळे श्रीमंतांचे अजिबात नुकसान झाले नाही. त्यातून काही मंडळींच्या संपत्तीची कशी भरभराट झाली, हे आता उघड झाले आहे."

"नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत. आम्ही परखड गडकरींचे अभिनंदन करीत आहोत," असं शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटलं आहे.

स्वतंत्र कॅटलोनियाचा वाद शिगेला

स्पॅनिश पंतप्रधान मारीयानो रहॉय यांनी सोमवारी स्पेनला कॅटलोनियातून स्वातंत्र्य घोषित केले तर याद राखा, अशी चेतावणी दिली.

वेगळं होण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना प्रतिसाद देण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं ते म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॅटलोनिया स्वतंत्र देशाची मागणी करीत आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, कॅटलन प्रदेशाचे अध्यक्ष कॅलस पुजडिमाँ हे मंगळवारी सायंकाळी कॅटलन संसदेत मार्गदर्शन करणार आहेत. विभाजनवादी राजकीय नेते म्हणतात की या सेशनदरम्यान स्वांतत्र्याची घोषणा केली जाऊ शकते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)