पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर ट्रोल्सना का फॉलो करतात?

प्रसिद्धिपत्रक Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अमित मालवीय यांचं प्रसिद्धिपत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रोल्सला का फॉलो करतात? असा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक जण विचारत होते.

त्या यादीमध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता प्रकाश राज देखील सामील झाले आहेत. काही लोक ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांची मैत्रीण गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आनंदोत्सव साजरा करताना त्यांना दिसले. हे पाहून आपण निराश झालो असं त्यांनी म्हटलं.

"आपले पंतप्रधान ज्या लोकांना ट्विटरवर फॉलो करतात ते अतिशय निर्दयी आहेत आणि पंतप्रधानांनी मात्र डोळे झाकले आहेत. या गोष्टीमुळं मला अतोनात दुःख झालं आहे. तसंच पंतप्रधानांच्या शांत राहण्याची मला भीतीदेखील वाटते," असं प्रकाश राज म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्याला ट्रोल्सची लवकरच प्रतिक्रिया आली. त्यांनी प्रकाश राज यांच्यावर मोदी विरोधी असल्याचा शिक्का मारला.

ट्विटरवर लोकप्रिय असलेल्या जागतिक नेत्यांमध्ये मोदींचं स्थान वरचं आहे. त्यांना साडेतीन कोटी लोक फॉलो करतात.

Image copyright Suhami abdullah
प्रतिमा मथळा अभिनेता प्रकाश राज

मोदी हे ट्विटरचा प्रभावीरित्या वापर करतात. त्यांचे बहुतांश ट्विट हे त्यांच्या कामासंदर्भात आणि धोरणांसंबधी असतात. किंवा ज्या गोष्टी त्यांना अतिशय प्रिय आहेत जसं की स्वच्छ भारत मोहीम.

2014 मध्ये सोशल मीडियाचा प्रभावीरित्या वापर केल्यामुळंच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पण, पंतप्रधानांचे ट्विट हे निवडक असतात आणि सर्वसमावेशक नसतात अशी टीकाही त्यांच्यावर होते.

जसं की गोरक्षकांनी राजस्थानमध्ये एका मुस्लीम व्यक्तीची बेदम मारहाण करून हत्या केली होती. त्या घटनेबाबत पंतप्रधानांनी मौन बाळगलं होतं.

आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्टॉकहोममध्ये झालेल्या हल्ल्याचा मात्र त्यांनी निषेध केला, त्यांच्या या कृत्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

पंतप्रधान काय ट्विट करत आहेत यापेक्षा ते कुणाला फॉलो करत आहेत आणि ते काय वाचत आहेत हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे.

"पंतप्रधान ज्यांना फॉलो करतात त्या 1845 जणांपैकी बहुतांश जण हे राजकारणी, पत्रकार, सरकारी अधिकारी आहेत. पण अनेक जण असे देखील आहेत जे मोदींच्या राजकीय विरोधकांना आणि टीकाकारांना असभ्य भाषेत उत्तरं देतात,"

असं ऑल्ट न्यूज या वेबसाइटचे पत्रकार प्रतीक सिन्हा यांनी बीबीसीला सांगितलं. ऑल्ट न्यूज ही वेबसाइट फेक न्यूजला आळा घालण्यासाठी काम करत आहे.

"ज्यांना ते फॉलो करतात त्यापैकी बहुतांश जण हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यासाठी ही सन्मानाची बाब असते."

"आपल्या कामाची दखल पंतप्रधानांनी घेतली असा त्याचा ते अर्थ काढतात. यातील बहुतेक जण हे महिलांचा द्वेष करणारे आणि त्यांना असभ्य भाषेत उत्तरं देणारे आहेत," असं सिन्हा म्हणाले.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा निखील दधीच यांच ट्वीट

उदाहरणार्थ, गौरी लंकेश यांची हत्या झाल्यावर निखील दधीच या सूरतमधल्या व्यावसायिकाने केलेल्या एक ट्वीटची खूप चर्चा झाली -- "एक कुत्री कुत्र्यासारखं काय मेली, सगळी पिल्लं विव्हळायला लागली आहेत."

त्यांच्या या ट्वीटवर खूप टीका झाल्यानंतर त्यांनी आपलं ट्वीट डीलिट केलं. पंतप्रधान या व्यावसायिकाला फॉलो करतात.

मोदी फॉलो करत असलेल्या दुसऱ्या एका अकाउंटवरूनही एक प्रतिक्रिया आली होती. आशिष मिश्रानं गौरी लंकेश यांच्या मृत्यूची बातमीची लिंक शेअर करताना करावे तसे भरावे असं लिहिलं होतं.

लंकेश यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांवर विखारी प्रतिक्रिया आल्या आणि ही गोष्ट देखील समोर आली की पंतप्रधान अशा लोकांना फॉलो करतात.

काही जणांनी ट्वीटरवर 'ब्लॉक नरेंद्र मोदी' ही मोहीम सुरू केली होती. अर्थात या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण, या मोहिमेची काही काळ मात्र चर्चा झाली हे देखील तितकंच खरं आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अमित मालवीय यांचं प्रसिद्धिपत्रक

जेव्हा अनेकांनी पंतप्रधानांना ब्लॉक केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपले विचार मांडले.

पंतप्रधानांनी एखाद्या व्यक्तीला ट्विटरवर फॉलो करणं म्हणजे हे काही चारित्र्याचे प्रमाणपत्र नव्हे असं ते म्हणाले.

मालवीय यांनी प्रसिद्धिपत्रकात असं म्हटलं होतं की, "पंतप्रधान हे अनेकांना फॉलो करतात. तसंच ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक आहेत आणि त्यांनी कधीही कुणाला ब्लॉक केलं नाही."

मालवीय यांचं म्हणणं अंशतः सत्य असल्याचं प्रतीक सिन्हा यांच म्हणणं आहे.

ज्यावेळी डॉ. ज्वाला गुरुनाथ या भाजपच्या कार्यकर्तीनं भाजपच्याच प्रवक्त्यांवर बेजबाबदार वर्तनाचा आरोप केला तेव्हा त्यांना पंतप्रधानांनी ब्लॉक केलं होतं.

हा लेख लिहिण्यापूर्वी मी श्री. मालवीय यांना फोन करून पंतप्रधानांच्या ट्विटर अकाउंटबाबत विचारणा केली होती. पण त्यांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला.

"मला जे काही सांगायचं होतं ते मी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितलं आहे आणि मला त्यात काही अधिक सांगायचं नाही," असं ते म्हणाले.

"पंतप्रधान हे अतिशय व्यग्र असतात. मला नाही वाटत की ते स्वतः आपलं ट्विटर अकाउंट हाताळत असतील," असं सिन्हा यांनी म्हटलं.

पण, असं म्हटलं जातं, की पंतप्रधान झोपेतून उठल्याच्या काही मिनिटानंतरच आपला आयपॅड हातात घेतात आणि सोशल मीडिया फीड पाहतात.

कदाचित या कारणामुळेच गरळ ओकणाऱ्या त्यांच्या फॉलोअर्सबाबतचं त्यांनी पाळलेलं मौन हे काही जणांना त्रस्त करतं.

"गौरी लंकेश यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला आहे. पण, अद्याप कुणाला अटक झाली नाही आणि पंतप्रधानांनी कुणाला अनफॉलो केलेलं नाही."

"मी पण हा प्रश्न विचारतो की पंतप्रधान मोदी या लोकांना अनफॉलो का करत नाही पण आता माझ्या हे लक्षात आलं आहे की हा त्यांच्या राजकीय धोरणाचा भाग आहे," असं सिन्हा म्हणाले.

"हे लोक फक्त ट्रोल्स नाहीत. त्यांचं काम हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. ते पक्षाचे ट्विटरचे सैनिक आहेत."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)