यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांची प्रात्याक्षिकं

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
यवतमाळ : शेतकऱ्यांना फवारणीची साधनं आता तरी मिळणार का?

यवतमाळहून धामणगांवकडे जातांना बाभूळगाव लागतं. इथं पोहोचल्यावर समजतं की १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूंनंतर सरकारी यंत्रणा कशी हलली आहे. शेताच्या बांधावर जाऊन तहसीलदार कीटकनाशक फवारणीचं प्रात्यक्षिक करताना दिसतात.

इकडं राज्य सरकारनं बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीवर कारवाई सुरू केली आहे. फवारणीवेळी शेतकऱ्यांना सुरक्षासाधनं देणं बंधनकारक केलं आहे.

"जीवाला धोका आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे" असं खांद्यावर फवारणीचं यंत्र घेतलेला अवधूत हा शेतमजूर गांभीर्यानं बोलत होता.

प्रतिमा मथळा यवतमाळमध्ये आजही सुरक्षा साधनांशिवाय शेतात फवारणी केली जाते.

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरच सरकारी यंत्रणेनं सुरक्षा बाळगण्यासंबंधीची पावलं उचलल्याचं तो पोटतिडकीनं सांगत होता.

प्रश्न इतकाच आहे की १९ मृत्युंनंतर ही जाग का यावी? अगोदर सुरक्षेचे उपाय केले असते तर इतक्या जणांचे जीव वाचले असते का? याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता इथल्या सामान्य शेतकऱ्यांच्या मनात उभे राहत आहेत.

'प्रश्न रोजीरोटीचा आहे'

शेतांमध्ये जाऊन शेतमजुरांना आम्ही विचारलं. कुणी कृषी अधिकाऱ्यानं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ते काम करतात त्यांनी काही सुरक्षेचे उपाय सांगितले आहेत का? ते काय करतात?

"आम्हाला इतकंच सांगितलं जातं की सुरक्षा करा. आम्ही मग आमच्या पद्धतीनं ती करतो. जेवतांना हात मातीनं धुऊन घेतो आणि फवारणी करतांना हे कापड तोंडावर बांधून घेतो."

"बाकी सर्व उघडं असतं, डोळ्यात जातं, त्वचेवर असतं, शरीराचा असा एकही भाग नाही औषध (कीटकनाशक) तिथं लागत नाही. आम्हाला त्रास तर अजून काही झाला नाही. पण बाकी सगळं ग्लोव्ह, गॉगल ते तर काही शेतकऱ्यांपाशी सुद्धा नाही."

प्रतिमा मथळा शेतमजुरांपर्यंत अजूनही सुरक्षेसंदर्भातल्या सूचना पोचलेल्या नाहीत.

"मग आम्ही ते कुठून आणू? जीवाला धोका आहे हे आम्हाला माहीत आहे. पण प्रश्न रोजीरोटीचा आहे. मग काय करू?" अवधूत दुनगुणे त्यांची व्यथा मांडतात.

गेल्या वर्षीही दीडशेहून अधिक घटनांची नोंद झाली होती. पण मग धोक्याची घंटा वाजूनही वेळीच उपाय का केले गेले नाहीत? जबाबदारी कृषी विभागाची आहे.

मात्र शासनाचा दावा आहे की सारे उपाय केले गेले होते, पण शेतकरी ऐकत नाहीत.

'बीबीसी मराठी'ने विचारलेल्या प्रश्नावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, "आम्ही सांगितलं होतं, आमच्या कृषी विभागानं पत्रकं वाटली, मेळावे घेतले. इतकं सगळं करून जर शेतकरी ऐकत नसतील तर त्याला तुम्ही काय करणार?"

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)