लिंगबदल शस्त्रक्रियेमुळे नौदलातून नोकरीवरून काढलं

सबी Image copyright Sabi
प्रतिमा मथळा मनीष कुमार 2010 मध्ये नौदलात रुजू झाले, आता ते सबी म्हणून ओळखल्या जातात.

भारतीय नौदलातील एका व्यक्तीला लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे.

मनीष कुमार गिरी सात वर्षांपूर्वी नौदलात रुजू झाले होते. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आणि स्त्री बनून आपलं नाव सबी असं ठेवलं.

बीबीसीशी बोलतांना सबी म्हणाल्या, "मला वाटतं ही शस्त्रक्रिया केल्यामुळेच मला नोकरीवरून काढण्यात आलं आहे."

सबीला दिलेल्या नोटीशीत "आपल्या सेवेची आता गरज नाही", असं म्हटलं आहे.

Image copyright Indian Navy

नौदलाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे की, लिंग बदलल्यामुळे मनीष गिरी नौदलात सेवेसाठी पात्र नाही.

मनोरुग्णालयात ठेवलं होतं

सबी सांगत होत्या, "माझी शस्त्रक्रिया दिल्लीत झाली. तेव्हा मी रजेवर होते. जेव्हा मी कामावर रुजू झाले तेव्हा मला इन्फेक्शन झालं होतं. एक महिना मला नौदलाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं.

Image copyright Sabi
प्रतिमा मथळा मनीष यांनी सात वर्ष नौदलात सेवा केली.

जेव्हा इन्फेक्शन बरं झालं तेव्हा मला पाच महिने मला मनोरुग्ण विभागात ठेवलं."

स्त्रीत्वाची जाणीव कधी झाली?

सबी सांगतात, "तो एक तुरुंगच होता. त्यांना माहित होतं की, मी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे. आता मी पुरुष नाही. तरी मला पुरुष सुरक्षारक्षकांबरोबर ठेवण्यात आलं."

सबी पुढे सांगतात, "मी सारखं विचारायचे की, मला कधी बाहेर काढतील. मी डिप्रेशनमध्ये होते. माझ्यावर उपचार सुरू होते. मी विचार करायचे की, मी काय चूक केली म्हणून माझ्याबरोबर असं होतं आहे."

पहिल्यांदा जेव्हा स्त्रीत्वाची जाणीव झाली तेव्हा कसं वाटलं हे सांगताना त्या म्हणाल्या, "मला आधीसुद्धा असं वाटायचं. पण 2011 मध्ये ही जाणीव आणखी तीव्र झाली. हे काय होतं आहे आणि आता मी काय करू असा मी विचार करत रहायचे."

"सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासारख्या काही लोकांना मी भेटले. त्यांना भेटून बरं वाटलं. मला कळलं की मी एकटी नाही. माझ्यासारखे अनेक लोक आहेत. त्या मित्रांनी माझी मदत केली आणि मला सांगितलं की लिंगबदल शस्त्रक्रिया होऊ शकते." सबी सांगत होत्या.

मी अनेकदा नौदलाच्या डॉक्टरांना भेटले, मला खूप वेळा मनोरुग्ण वॉर्डात ठेवलं पण माझी समस्या ते सोडवू शकले नाहीत असं सबींनी स्पष्ट केलं.

"मी न सांगता रजा घेऊन 20 दिवसांसाठी माझ्या मित्रांकडे गेले. जेव्हा मी परत आले तेव्हा मला 60 दिवस कोठडीत ठेवण्यात आलं. नौदलाने मग मला विशाखापट्टणमला पाठवलं.

Image copyright Sabi
प्रतिमा मथळा आता सबी म्हणून त्या आपली ओळख निर्माण करू इच्छितात

"मी पुन्हा एकदा माझ्या कमांडरला ही गोष्ट सांगितली. त्यांनी मला मनोविकार तज्ज्ञाकडे पाठवलं. जेव्हा नौदलाकडून मला कोणतीही मदत मिळाली नाही तेव्हा मी बाहेरच्या डॉक्टरकडे गेले", सबी म्हणाल्या.

बाहेरच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, मला सेक्शुअल आयडेंटिटी डिसॉर्डर आहे .

सबीने जेव्हा ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना सांगितली तेव्हा त्यांनीसुद्धा माझी साथ दिली नाही. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्यांना ही गोष्ट पटली.

कुटुंबानी केला स्वीकार.

सबी सांगतात, "मी गुन्हेगार नाही. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. मी फक्त माझी खरी ओळख घेऊन आली आहे."

Image copyright Sabi
प्रतिमा मथळा सबीचा तिच्या कुटुंबियांनी स्वीकार केला आहे

सबी आनंदानं सांगतात की, त्यांच्या कुटुंबाने आता त्यांचा स्वीकार केला आहे. "ज्या आईनं आपल्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवलं ती कधी आपल्या मुलांना विसरू शकते का?" त्या विचारतात.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर सबी परत आल्या तेव्हा पहिले सहा महिने त्यांना रुग्णालयात ठेवलं होतं. सबी यांचा असा आरोप आहे की, या काळात त्यांना मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न झाला, पण डॉक्टरांनी तसं होऊ दिलं नाही.

हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर त्यांना डेस्कचं काम मिळालं.

नोकरीवरून काढलं

सबीला शुक्रवारी अचानक सांगितलं की, त्यांना नोकरीवरून काढलं आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्याचं उत्तर सबी यांनी आधीच दिलं होतं.

Image copyright Sabi

सबी सांगतात, "मी सात वर्ष वर्दी घालून देशसेवा केली आहे आणि आता मी अचानक बेरोजगार झाली. माझ्या लिंगामुळे माझ्या पोटावर पाय आला आहे."

"मी सरकारला विनंती करते की, माझा विचार करावा. नौदलात अनेक ठिकाणी महिला काम करतात. ते मला असं काम देऊ शकतात पण त्यांनी मला सरळ नोकरीतून काढून टाकलं."

सबी सांगतात, "जर ट्रान्सजेंडर लोकांसोबत असं केलं तर ते काय करतील? एक तर ते भीक मागतील नाहीतर सेक्स वर्कर होतील. खूप ट्रान्सजेंडर अशी कामं करतात. आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने काहीतरी करावं."

न्यायासाठी लढणार

सबी आता न्यायालयात दाद मागणार आहे. सबी सांगतात, "मी आर्मी ट्रिब्युनलमध्ये जाणार आहे. तिथे न्याय मिळाला नाही, तर त्या उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे."

सबी सांगतात, "मी परीक्षा पास झालेली आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मला ही नोकरी मिळाली आहे, तरी ही समस्या उद्भवली. हे नैसर्गिक आहे. हे कोणाहीसोबत होऊ शकतं. मला याची का शिक्षा मिळते आहे याची मला कल्पना नाही."

सर्जरीनंतर सबी नौदलाच्या जहाजावर आणि मग मागचं एक वर्ष त्यांची नेमणूक कार्यालयात झाली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)