अमेठीतल्या पराभवाची परतफेड करणं भाजपचं उद्दिष्ट

काँग्रेस, भाजप, गुजरात, उत्तर प्रदेश Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या गुजरातमधील वर्चस्वाला राहुल गांधी यांनी आव्हान दिलं आहे.

गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातली खरी लढाई उत्तर प्रदेशातल्या अमेठीत रंगणार आहे.

गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा गड आहे तर अमेठी गांधी परिवाराचा बालेकिल्ला.

भाजप विरुद्ध काँग्रेस

राहुल गांधी यांनी गुजरातेत मोदी-शाह यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आहे. याला प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पक्षाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी काँग्रेसविरुद्ध बिगुल फुंकलं आहे.

गुजरातच्या विकासाची खिल्ली उडवत राहुल गांधींनी विकास वेडा झाल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे तीन पिढ्यांपासून गांधी घराण्याकडे अमेठीची सत्ता असूनही लोक विकासापासून वंचित का? असा सवाल अमित शाह यांनी केला आहे.

गुजरातमध्ये भाजपला चीतपट केल्यास 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दमदार पाया रचला जाऊ शकतो असं काँग्रेसला वाटतं आहे. पाटीदार समाजाचं आंदोलन, दलित वर्गाची नाराजी तसंच उपेक्षित वर्गापैकी एका गटानं पुकारलेलं आंदोलन, 22 वर्षं साचलेला सत्ताधाऱ्यांविरोधातला सूर हे सगळं भाजपला नमवण्याचा फॉर्म्युला होऊ शकतो अशी काँग्रेसची धारणा आहे.

दोन दशकांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच गटातटांमध्ये विभागल्या गेलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे आणि भाजपला टक्कर देऊ शकतो असा विश्वास प्राप्त झाला आहे.

विकासाच्या मुद्यावर राहुल गांधींनी गुजरातेत भाजपविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्यापुरतं विकासाचं मॉडेल तयार केलं आहे असं सांगत भाजपनं गुजरात आणि देशाच्या विकासाच्या प्रारुपाची मांडणी केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी अमेठीत प्रचारादरम्यान

अमेठी ही काँग्रेस आणि गांधी परिवाराची दुखरी नस आहे. या लोकसभा मतदारसंघात गांधी घराण्याची लोकप्रियता घटते आहे. या वस्तुस्थितीची त्यांनाही कल्पना आहे पण त्यांना हे मान्य नाही.

अमेठी काँग्रेसची दुखरी नस

2014 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीविरुद्ध भाजपने स्मृती इराणींच्या रुपात एका पाहुण्या उमेदवाराला उभं केलं. जशजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसं काँग्रेसला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. अखेर राहुल गांधींना सगळी सूत्रं स्वत:कडे घ्यावी लागली.

एवढं होऊनही त्यांची बहीण आणि काँग्रेसचा भविष्यातील चेहरा प्रियांका गांधी यांच्याकडे राहुल यांच्या प्रचाराची जबाबदारी होती. सोनिया गांधींपासून रॉबर्ट वाड्रापर्यंत सगळ्यांनी राहुल यांच्यासाठी प्रचार केला.

राहुल गांधी हरता हरता जिंकले की स्मृती इराणी जिंकता जिंकता हरल्या यावर निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चा रंगली होती. दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्मृती इराणी यांचा पराभव झाला आणि राहुल गांधी विजयी झाले मात्र त्यांचं मताधिक्य घटलं. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने या निवडणुकीत उमेदवार न देताही ही परिस्थिती होती.

समाजवादी पार्टीने राहुल गांधींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं. त्याचाही फायदा राहुल गांधींना मिळाला.

गांधी कुटुंबीय जनतेला काहीही देण्याच्या स्थितीत नाहीत

अमेठीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतरही स्मृती इराणी यांनी मतदारसंघासाठी काम करण्याचं आश्वासन मतदारांना दिलं होतं. गेल्या साडेतीन वर्षात स्मृती इराणींच्या अमेठी दौऱ्यांची संख्या राहुल गांधींच्या दौऱ्यापेक्षा जास्त नाही मात्र कमी नक्कीच नाही.

केंद्र सरकारच्या अनेक योजना सादर करण्यासाठी इराणी अमेठीत जातात. आता राज्यात भाजपचं सरकार आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचंच सरकार असल्याने इराणी मतदारसंघातलं काम हाती घेऊन तडीस नेऊ शकतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी

गांधी कुटुंबीयांकडे जनतेसाठी करण्यासारखं काही नाही अशा आशयाच्या चर्चा लोकसभेच्या निवडणुका आणि 2017 विधानसभेच्या वेळी होत्या. गांधी कुटुंबीय जनतेला वेळही देत नाहीत असा आरोपही आहे.

तुम्ही फक्त निवडणुकीच्या वेळी अमेठीत दिसता असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका यांना थेट सांगितलं होतं. यानंतर आले तर माझ्या राजकारणात एंट्रीच्या गप्पांना ऊत येईल असं सांगत प्रियांका यांनी मूळ विषयाला बगल दिली होती.

अमेठीत प्रियांकाविरोधात काळे झेंडे

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रियांका गांधी प्रचारादरम्यान

2017 विधानसभेच्या निवडणुकीवेळी पहिल्यांदाच गांधी कुटुंबीयांपैकी कोणाचं स्वागत निषेधाच्या काळ्या झेंड्यांनी झालं. विधानसभा निवडणुकांवेळी काँग्रेसनं समाजवादी पक्षाशी केलेल्या यशस्वी वाटाघाटींनंतरही अमेठीतल्या पाचपैकी चार जागांवर भाजपने बाजी मारली.

भाजपचे नेते वारंवार अमेठीत ठाण मांडून का असतात हा प्रश्न सातत्याने अधोरेखित होतो.

खरंतर 2014 लोकसभा निवडणुकीत अमेठीत झालेल्या पराभवाची परतफेड करणं भाजपचं अपूर्ण स्वप्न आहे.

2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींचा पराभव काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांच्या मनोवृत्तीवरचा मोठा घाव असेल. 2014 मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड 2019 निवडणुकीत होऊ शकते, असं स्मृती इराणी आणि पर्यायाने भाजपला वाटतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेठी मतदारसंघातील नागरिक

भाजपच्या आक्रमक प्रचारतंत्राचा काँग्रेसने धसका घेतला आहे. राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवू नये, अशी राहुल गांधींच्या निकटवर्तीयांची इच्छा आहे. पण असं ते स्पष्टपणं सांगत नाहीत.

यासाठी एक प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर 2019 निवडणूक लढवणार नाही असं राहुल यांनी जाहीर करावं, जेणेकरून काँग्रेसला सत्ता मिळवून देण्याच्या उद्देशाने काम करावं. मात्र याचा अर्थ निवडणुकीच्या रणांगणातून पळ काढला असा घेतला जाईल म्हणून हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.

अमेठीचा गड राखणं राहुल यांची परीक्षा

यामुळे 2019 लोकसभा निवडणुकांपर्यंत अमेठी चर्चेत राहणार आहे. मागच्या निवडणुकीत वेळी स्मृती इराणी मोक्याच्या क्षणी सहभागी झाल्या. तत्कालीन भाजप अध्यक्षांनी त्यांना फोन करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला.

कुठल्या मतदारसंघातून असं स्मृती यांनी विचारलं. त्यांना 'अमेठी' असं उत्तर मिळालं. स्मृती यांनी विचार करून सांगते, असं सांगितलं. स्मृती यांनी निवडणूक लढवण्यास होकार दिला मात्र भाजप विजयापासून दूरच राहिला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

स्मृती यांना अमेठीतून तर रायबरेलीतून उमा भारती यांनी निवडणूक लढवावी असं भाजपला वाटत होतं. मात्र उमा भारती यांनी झाशी मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. त्यामुळे अमेठीतून त्यांचं नाव कमी झालं.

त्यानंतरच स्मृती यांना अमेठीतून निवडणूक लढवण्याचा आदेश देण्यात आला. 2019 मध्ये स्मृती यांच्या पराभवाला पाच वर्ष पूर्ण होतील. यावेळी त्यांच्या साथीला भाजपचं राज्य सरकार असेल. त्यामुळे राहुल गांधींनी अमेठीचा गड राखणं आणखी अवघड असेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)