प्रेस रिव्ह्यू : केंद्र सरकारतर्फे प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची दिवाळी भेट

भारतातल्या मंदीबद्दल काय म्हणाले अरुण जेटली; दिवाळीनंतर महाराष्ट्रात मंत्रीमंडळ विस्तार होणार का; देशभरातील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची दिवाळी भेट, या आहेत आजच्या काही ठळक बातम्या.

प्राध्यापकांना दिवाळी भेट

केंद्र सरकारनं प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची दिवाळी भेट दिली आहे.

देशभरातील अनुदानित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्राध्यापकांना मिळणार सातवा वेतन आयोग

'सकाळ'च्या वृत्तानुसार देशभरातील 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. यामध्ये 329 राज्य विद्यापीठं आणि १२ हजार १९२ महाविद्यालयांतील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश असेल.

ही वाढ 10 हजार रुपये ते 50 हजार रुपयापर्यंत असेल. प्राध्यापक मंडळींना 22 ते 28 टक्क्यांची वेतनवाढ मिळेल.

भारतात मंदी सल्याची जगात भावना नाही - जेटली

"भारताच्या अर्थव्यवस्थेला मंदीने घेरले असल्याची भावना जागतिक स्तरावर नाही," असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटल्याचं 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अर्थमंत्री अरुण जेटली

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या जेटलींनी न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

"भारतातच अर्थव्यवस्थेसंबंधी सुयोग्य जाण नसलेल्या मंडळींकडून मंदीची ओरड सुरू आहे. GST सारख्या आर्थिक सुधारणांची गोड फळे दीर्घावधीत चाखता येतील," असंही जेटली म्हणाले.

आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेसारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थांनी वर्तवलेल्या भाकितांकडे दुर्लक्ष करत जेटली यांनी नोटाबंदी आणि GST चं समर्थन केल्याचही या वृत्तात म्हटलं आहे.

दिवाळीनंतर मंत्रीमंडळ विस्तार

"मुख्यमंत्री सध्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्यावरून आल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल," अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मंत्रिमंडळ विस्तारासाठी रावसाहेब दानवे यांनी दिली दिवाळीनंतरची तारीख

'लोकमत'च्या वृत्तानुसार, अहमदनगरमध्ये प्रसिद्धी माध्यांशी बोलताना दानवे यांनी "नारायण राणे यांच्यासाठीही मुहूर्त शोधून ठेवलेला आहे" अशी नवीन माहिती दिली.

"ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर नसली तरी निवडणुकीत राजकीय पक्षांचेच पॅनेल होते. त्यामुळे भाजपाला मिळालेला कौल स्पष्ट आहे," असा दावाही दानवे यांनी केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)