ऑनलाइन शॉपिंग करताय... सावधान!

ऑनलाइन शॉपिंग अनेकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. मात्र त्याचवेळी ऑनलाइन घोटाळ्यांचं प्रमाण वाढलं आहे. सणासुदीच्या काळात घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी काय करावं यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेला सल्ला.
दिल्ली पोलिसांनी शिवम चोपडा आणि सचिन जैन नामक दोन व्यक्तींना अटक केली आहे. त्यांच्यावर अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे सब इन्स्पेक्टर विकास कुहार यांनी बीबीसीशी बोलतांना सांगितलं की, "शिवम अमेझॉन वरून फोन विकत घेत असे आणि डिलीव्हरी न झाल्याचा बहाणा करत शॉपिंग पोर्टलकडून पैसे परत मागत असे."
"सचिनवर आरोप आहे की त्याने शिवमला फसवणुकीसाठी 150 प्री अक्टिव्हेटेड सीम कार्ड्स पुरवली. अशा प्रकारे 166 फोन विकत घेतले. हे फोन नंतर या दुकलीने विकले."
पोलिसांनी सांगितलं की, अटकेच्या वेळी दोघांकडे 25 फोन, 12 लाख रुपये, 40 बँकाचे पासबुक आणि दोन मालमत्तेचे कागद सापडले.
पहिलंच प्रकरण नाही
तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुक करण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. वेळेच्या अभावामुळे आजकल ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढलं आहे. सरकारदेखील डिजिटल पेमेंटला उत्तेजन देत आहे.
त्यामुळे लोकांना असलेल्या कमी माहितीचा फायदा घेऊन त्यांना फसवण्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही पोर्टलच्या माध्यमातून लोकांना फसवण्यात येतं तर काही जण पोर्टललाच थेट गंडा घालतात.
पवित्रा वेलपुरी प्रकरण
याच वर्षी जुलै महिन्यात पुण्यात पवित्रा वेलपुरी यांनी प्रसिद्ध वेबसाईट OLX वर लहान मुलांची बाबागाडी विकण्याची जाहिरात दिली होती. एका व्यक्तीने ती विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवलं. पैशाची बोलणी झाल्यावर पवित्रा यांनी त्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती पाठवली.
काही मिनिटांतच पवित्रा यांच्या खात्यात 13500 रुपये जमा झाल्याचा त्यांना मेसेज आला पण तो स्ट्रॉलर फक्त 3500 रुपयांचा होता. पवित्रा यांनी फोन करून त्या व्यक्तीला अतिरिक्त पैसै जमा झाल्याची माहिती दिली.
त्या व्यक्तीने अनवधानाने जास्त पैसै जमा झाल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी दहा हजार रुपये पेटीएमने आपल्या आईच्या खात्यात पाठवायला सांगितलं.
पवित्रा पैसे पाठवणार होत्या, पण सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी एकदा बँक अकाउंट चेक केलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्यांच्या खात्यात पैसै जमा झालेच नव्हते.
ज्या व्यक्तीने स्ट्रॉलर विकत घेतला त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा बँकेकडून कधीकधी उशीर होऊ शकतो, असं कारण सांगितलं.
पण त्याच वेळी आईला खूप गरज असल्यामुळे दहा हजार रुपये आईच्या खात्यात जमा करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली.
पवित्रा यांना या प्रकरणात काहीतरी काळंबेरं जाणवलं. त्यांनी बँकेत फोन केला. बँकेनं त्यांना सांगितलं की, अशी कोणतीही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्याचवेळी ती व्यक्ती पैसे लवकर पाठवण्यासाठी वारंवार दबाव आणू लागली.
बँकेकडून माहिती मिळाल्यावर पवित्रा यांनी त्या व्यक्तीची कसून चौकशी केली. आपली डाळ इथे शिजणार नाही असं त्या ठगाच्या लक्षात आलं. नंतर त्याने पवित्रा यांच्याशी संपर्क केला नाही.
अजाणतेपणी माहिती सादर
बँकेतून बोलतो आहे असं सांगून लोकांना कॉल करून माहिती मागितली जाते. बँकेचं नाव सांगितल्यामुळे विश्वासार्हता निर्माण होते आणि लोक शहानिशा न करता गोपनीय माहिती देऊन टाकतात.
अकाउंटशी आधार कार्ड संलग्न करायचं आहे असं सांगून किंवा कार्ड ब्लॉक झालं आहे ते अनब्लॉक करण्यासाठी सांगून बँक खात्याचा तपशील मागितला जातो.
काम महत्त्वाचं असल्यानं माणसं माहिती देतात आणि सापळ्यात अडकतात. नायजेरिया घोटाळा नावाने प्रसिद्ध असणऱ्या घोटाळा प्रकरणात वन टाइम पासवर्ड किंवा एखादा कोड मागून माहिती मिळवली जाते.
या सगळ्या प्रकरणात ज्या नंबरवरून फोन येतात, ज्या विश्वासानं पलीकडची माणसं बोलतात आणि जी कारणं देतात तो कोणालाही द्विधा मनस्थितीत टाकू शकतं.
ऑनलाइन घोटाळ्यापासून वाचण्यासाठी काय कराल?
ऑनलाइन शॉपिंग करताना किंवा व्यवहारादरम्यान घोटाळ्यात अडकू नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत बीबीसीने तज्ञांशी चर्चा केली. व्हॉयजर इन्फोसेकचे संचालक आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ जितेन जैन यांनी नेटीझन्सकरता सल्ला दिला आहे.
- बक्षीस, लॉटरी, फसव्या ऑफर्स, गिफ्ट्स अशी बतावणी करून येणारे मेसेज, कॉल यांना थारा देऊ नका. बँक खात्याचा तपशील मिळवणं हेच ऑनलाइन घोटाळ्याकर्त्यांचं उद्दिष्ट असतं.
- विश्वासार्ह वेबसाइट्सच्या माध्यमातूनच व्यवहार करा.
- ऑनलाइन शॉपिंग किंवा व्यवहार करतानाची वेबसाइट सुरक्षित आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी यूआरएल अर्थात वेबसाइटच्या नावात https:// आहे की नाही हे तपासून घ्या.
- वेबसाइटच्या माध्यमातून व्यवहार करताना पेमेंट करण्यासाठी नव्या गेटवेचा पर्याय समोर आल्यास, त्या गेटवेबद्दल माहिती मिळवा. अन्य नेटिझन्सचे रिव्ह्यू आणि फीडबॅक पाहून गेटवेच्या विश्वासार्हतेबद्दल अंदाज येऊ शकतो.
- ऑनलाइन व्यवहार करताना वेबसाइट्सकडे रजिस्टर्ड फोन क्रमांकावर ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड मागवा आणि हा पासवर्ड कोणाबरोबर शेअर करू नका.
- एटीएम तसंच अन्य पिन नंबर कोणालाही देऊ नका. लोकांना नजरेस पडतील किंवा मिळतील अशा ठिकाणी पासवर्ड किंवा पिननंबर लिहून ठेऊ नका. याचे फोटोही काढून ठेऊ नका. पासवर्ड किंवा पिन कोणालाही मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून पाठवू नका.
- कोणतीही बँक ग्राहकांकडे पिननंबर किंवा सीवीवी तपशीलाविषयी ऑनलाइन विचारणा करत नाही. बँकेचं नाव घेऊन अशी माहिती विचारल्यास तात्काळ तक्रार दाखल करावी.
बँक बाजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांचा सल्ला
- वेब ब्राऊजरला नियमितपणे अपडेट करा.
- अँटी व्हायरस आणि मालवेयर यांना रोखण्यासाठी सक्षम अँटी व्हायरस कॉम्प्युटरमध्ये आहे की नाही याची शहानिशा करा.
- नेटकॅफे किंवा कोणत्याही बाहेरच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करू नका. याचं कारण सॉफ्टवेयर कीलॉगरमध्ये तुमची माहिती साठवली जाते.
- सार्वजनिक ठिकाणच्या कॉम्प्युटरचा वापर करावा लागल्यास पासवर्ड, पिन किंवा कोड टाकताना व्हर्च्युअल कीबोर्डचा वापर करा. नेहमीच्या कीबोर्डच्या तुलनेत हा कीबोर्ड सुरक्षित असतो.
- रेल्वेस्टेशन, बसस्टँड, विमानतळ तसंच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणचं वायफाय तसंच हॉटस्पॉट वापरत असताना ऑनलाइन व्यवहार करणं टाळा.
- एखाद्या लिंकवर क्लिक करा अशा आशयाचा मेल किंवा मेसेज आल्यास त्याकडे दु्र्लक्ष करा. चुकूनही त्या लिंकवर क्लिक करू नका. बँक खात्याचा तपशील, पिन या गोष्टी मिळवण्यासाठी अशी लिंक पाठवली जाते.
- मॅग्नेटिक स्ट्रिप असलेलं डेबिट कार्ड तुम्ही वापरत नाही ना हे तपासून घ्या. मॅग्नेटिक स्ट्रिप हे जुनं तंत्रज्ञान आहे आणि अशा कार्डाचा डेटा मिळवणं सोपं असतं. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये बहुतांशी बँकांनी मॅग्नेटिक कार्डांऐवजी चिप कार्ड वितरित केलं.
- हॉटेल, दुकानं, मॉल्स अशा सार्वजनिक ठिकाणी कार्डाच्या माध्यमातून पैसे देताना तुमचं कार्ड नक्की कुठे वापरलं जात आहे याकडे लक्ष ठेवा.
- मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करताना नियमितपणे मेमरी डिलिट करा.
ऑनलाइन घोटाळ्याचा फटका बसल्यास काय कराल?
जितेन आणि आदिल यांनी यासंदर्भात अधिक सल्ला दिला. तुमच्या
- कार्डाचा गैरवापर झाला आहे असं लक्षात आल्यास किंवा गोपनीय माहिती गहाळ झाल्याचं समजताच तात्काळ बँक किंवा संबंधित संस्थेला कळवा. यात जराही उशीर करू नका. पैसे किंवा माहिती गहाळ झाल्यानंतर 24 तासांच्या आत तक्रार केल्यास पैसे परत करणं बँकेची जबाबदारी असते.
- पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करा. तुमच्या घराजवळ किंवा ऑफिसनजीक सायबर सेल विभागाची शाखा असेल तर त्यांच्याकडे तक्रार दाखल करा.
- त्यानंतर बँकेत जाऊन तक्रार दाखल करा. तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारी पावती जपून ठेवा.
- बँकेच्या अधिकाऱ्यांशी झालेलं बोलणं, लेखी फॉलोअप, बँक भेटीचा तपशील नीट नोंदवून ठेवा.
- कार्डाचा वापर वेबसाइटच्या माध्यमातून व्यवहार, मॉल, दुकान अशाठिकाणी झाला असेल तर त्यांना पेमेंट थांबवायला सांगा.
- ऑनलाइन घोटाळ्याशी संबंधित मेसेज, मेल आणि अन्य कागदपत्रं जपून ठेवा.
- ऑनलाइन घोटाळ्याविषयी बँकेत तक्रार दाखल केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्याचा फॉलोअप घ्या. तुमच्या तक्रारीचं निराकरण झालं नसेल तर बँकेच्या ओम्बड्समनशी संपर्क करा.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)