नांदेड निवडणुकीचा अर्थ काय? पाच तज्ज्ञांचं झटपट विश्लेषण

नांदेड-वाघाळा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नांदेड-वाघाळा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

नांदेड-वाघाळा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तिथे यापूर्वीही काँग्रेसची सत्ता होती, पण आता मिळालेला विजय हा पूर्वीपेक्षा खूपच महत्त्वाचा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि MIMचे असदउद्दीन ओवेसी यांनी जातीने लक्ष घालूनही त्यांच्या पक्षांच्या जागा आधीपेक्षा कमी झाल्या.

काय आहे या निवडणुकीचा अर्थ? यामुळे काँग्रेसला उभारी मिळेल? या निकालाचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होईल? पाहूया पाच तज्ज्ञांचं थोडक्यात आणि झटपट विश्लेषण:

1. काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली - मृणालिनी नानिवडेकर

"हा जनादेश अशोक चव्हाणांच्या बाजूने आणि सरकारचा विरोध करणारा आहे. जनता नवा पर्याय शोधतेय. मात्र, या असंतोषाला वाट करून देण्यासाठी काँग्रेससारखा पक्ष आणि चव्हाणांसारखा नेता असण्याची गरज आहे."

"केवळ पोकळ गप्पांना नाकारत मोदींचा करिश्मा ओसरतोय, हे दाखवणारा हा निकाल आहे. या निकालानं अर्थात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे."

Image copyright AMEYA PATHAK
प्रतिमा मथळा निवडणुकीदरम्यान सभेला झालेली गर्दी

"त्याचवेळी, भाजपला महाराष्ट्रात मोदी करिश्म्याचा फायदा संघटना बांधणीसाठी करता आला नाही, हेही दिसून येतंय. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांचा साहसवाद नडला."

"दुसरीकडे GST आणि नोटाबंदीचाही प्रभाव नांदेडसारख्या शहरी भागातील मतदानावर पडला असावा. दुसरीकडे, MIM हे मुळात अशोक चव्हाणांनी उभं केलेलं भूत त्यांची रसद संपल्यानं नष्ट झालं. शिवाय, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवणं, भाजपचा छुपा हिंदुत्ववादी अजेंडा, यांमुळे मुस्लीम समाजानंही MIMपेक्षा काँग्रेसवर विश्वास टाकला."

"मुंबईवर ताबा ठेवण्याच्या नादात शिवसेनेची मराठवाड्यावरची पकड ढिली पडत चालल्याचं या निवडणुकीनं दाखवलं. तुमचेच आमदार सरळ सरळ भाजपचा प्रचार करतात हे नेतृत्वाच्या दृष्टीनं भूषणावह नाही. बाळासाहेब असते तर असं झालं नसतं."

"शिवसेनेचा ब्रँड यामुळे ठिसूळ होऊ लागलाय. एकूणच या साऱ्या घडामोडींमुळे आता चव्हाणांचं काँग्रेसमधलं स्थान भक्कम झालंय. २०१९साठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. त्यांना आता असलेला अंतर्गत विरोधही मावळेल,'' असं सकाळ न्यूज नेटवर्कच्या सहसंपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी सांगितलं."

2. अशोक चव्हाण आता फडणवीसांचे तगडे प्रतिस्पर्धी - प्रताप आसबे

''नांदेड महापालिकेच्या निकालाचा कल पाहता अशोक चव्हाण आणि काँग्रेसला बहुसंख्य समाजासह दलित-ओबीसी आणि मुस्लिमांनी स्पष्ट पाठिंबा दिल्याचं दिसतं. काँग्रेसच्या बाजूनं झालेलं हे ध्रुवीकरण महत्त्वाचं आहे. हिंदू बहुसंख्य समाजातलं भाजपचं अपील आता कमी होताना किमान नांदेडमध्ये तरी दिसतंय".

Image copyright PUNIT PARANJPE
प्रतिमा मथळा नांदेड महापालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारलं आहे.

"या परिणामाला केंद्र आणि राज्य सरकारची गेल्या तीन वर्षातली कामगिरीही कारणीभूत आहे."

"मोदींबद्दल अजूनही विश्वास काही प्रमाणात असला, तरी राज्यात विश्वासार्हता कमी होतेय. देवेंद्र फडणवीस फक्त बोलतात, पण करत काहीच नाही अशी लोकांची भावना आहे. गेल्या काही काळात मराठा समाजाच्या मोर्चानंतर अन्य समाजाचं ध्रुवीकरण, शेतकरी किंवा अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात फूट पाडणं लोकांच्या डोक्यात गेलंय."

"आधी काँग्रेसला धडा शिकवणाऱ्या अल्पसंख्य समुदायानं MIMला मतदान केलं खरं, पण दादरी हत्याकांड, गोवंश मांस विक्रीला बंदी आणि मुसलमानांसाठी बनत चाललेलं असुरक्षित वातावरण यामुळे या समाजानं पुन्हा काँग्रेससोबत उभं राहायचं ठरवलेलं दिसतंय."

Image copyright RAVEENDRAN
प्रतिमा मथळा मुस्लिम समाज पुन्हा काँग्रंसच्या पाठीशी उभा राहिला आहे.

"या निकालाचा काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनाही मोठा दिलासा आहे. विशेषत: चव्हाणांची आता पत राहिली नाही असं काँग्रेसमध्ये बोललं जात होतं. अशा टीकाकारांची तोंडं आता बंद होतील."

"आदर्श प्रकरण, राणेंचे आरोप आणि प्रतिकूल परिस्थितीतील पक्ष अशी पार्श्वभूमी असतानाही चव्हाणांनी यश मिळवल्यानं फडणवीसांसमोर एक तगडा राजकीय प्रतिस्पर्धी तयार झालाय. त्यादृष्टीनं चव्हाणांना २०१९मध्ये प्रॉजेक्ट केलं जाऊ शकतं."

"नांदेडचा निकाल ही जनमताची चुणूक मानल्यास भाजपसोबत राहायचं की नाही याचा विचार सेना करू शकते."

"या निकालाचं मूळ सूत्र असं की भाजपविरोधी जो पक्ष ज्या जिल्ह्यात सक्षम आहे त्याला लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. उदा. अशीच निवडणूक आज औरंगाबादमध्ये असती तर शिवसेनेला किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला लोकांनी कदाचित असाच प्रतिसाद दिला असता," असं ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

3.काँग्रेसला बळ मिळेल - प्रा. अभय दातार

"अशोक चव्हाण हे प्रस्थापित नेते असल्याने आणि भाजपला नांदेडमध्ये स्थानिक चेहरा नसल्याने नांदेड महापालिकेत काँग्रेसची सरशी झाल्याचं दिसतंय. निवडणुकीच्या प्रचारात नोटाबंदी, महागाई, जीएसटीसारखे राजकीय मुद्दे प्रभावी ठरले नाहीत. प्रचार स्थानिक मुद्द्यांभोवतीच फिरत राहिला."

"नांदडेकरांशी अशोक चव्हाण यांचा संपर्क दांडगा आहे. त्यांनी 'आपण नांदेडचा विकास केला' हा मुद्दा प्रचारात शेवटपर्यंत लावून धरला. या विजयामुळे काँग्रेसमधलं चव्हाणांचं स्थान बळकट व्हायला मदत होईल आणि काँग्रेसलाही त्यामुळे बळ मिळेल."

"मुस्लीम बहुल भागातलं मतदानाचं प्रमाण तुलनेने जास्त होतं. काँग्रेसने आपला पारंपरिक मुस्लीम मतदार MIMकडून परत मिळवला."

"भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची म्हणून लढवली. भाजपने हायप्रोफाईल प्रचारावर लक्ष केंद्रित करत देवेंद्र फडणवीसांनाही प्रचारात बोलावलं होतं, पण त्याचा फायदा झाला नाही. पण या निकालाचा भाजपला राज्य पातळीवर फारसा फटका बसेल, असं वाटत नाही," असं राजकीय विश्लेषक प्रा. अभय दातार यांचं म्हणणं आहे.

4. लोकांचा विश्वास गमावलेल्या पक्षांमुळे काँग्रेसचा विजय! - राही भिडे

''भाजपची लोकप्रियता कमी होतेय हे या निकालानं स्पष्टं होतंय. याची सुरुवात भिवंडी, मालेगाव, परभणीत झालीच होती. काँग्रेसला इथे विजय मिळाला. काँग्रेसची अडचण अशी की नेतृत्व नसतं तिथे भाजपला यश मिळतं.

"मात्र, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी आणि त्यांच्या पत्नी आमदार अमिता यांनी भाजपचं आव्हान परतवून लावलं. आदर्श प्रकरण उकरूनही भाजपला त्याचा फायदा झाला नाही. उलट नोटाबंदी, जीएसटी आणि विविध उपकरांमुळे आणि महागाईनं त्रासलेल्या जनतेनं भाजपला नाकारलं."

"शिवसेनेवरचाही लोकांचा विश्वास उडालाय. सत्तेत राहून सत्ता सोडण्याची भाषा करणारी सेना खुलेपणानं विरोधात का बसत नाही हा लोकांचा सवाल आहे. राष्ट्रवादीचंही तसंच. शरद पवारांची सगळी भिस्तही फक्त तयार झालेलं नेतृत्वावरच आहे."

"राष्ट्रवादीकडे नव्या नेत्यांचा अभाव दिसून येतो. विश्वासार्हतेअभावी या पक्षाला जनमानसात स्थान नाही. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे गेल्यावेळी ११ जागा मिळवणाऱ्या एमआएमला लोकांनी नाकारालं. लोकांना आता भावनिक राजकारण नकोय. मग ते राममंदिराचं असो की कट्टरतावादाचं.''

''मात्र, या निकालाच्या बळावर फडणवीसांसमोर आव्हान उभं राहिलंय असं वाटत नाही. लोकांमध्ये अजूनही त्यांच्याबद्दल विश्वास आहे. अर्थात, चव्हाणांचा मात्र काँग्रेस पक्षांतर्गत खुंटा बळकट झालाय. ज्याचा फायदा त्यांना २०१९ मध्ये होऊ शकतो.''

5. भाजपच्या मोर्चा फोडण्याच्या कामाचा परिणाम - ज्ञानेश महाराव

"महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडे आहे आणि नांदेड हा त्यांचा स्वत:चा मतदारसंघ आहे. त्यामुळे चव्हाणांचे सर्व प्रयत्न कसाला लागले होते."

"नारायण राणे यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडताना अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. 'अशोक चव्हाणांनी पक्ष संपवण्यासाठी काम केलं, त्यांचं सूडाचं, गटबाजीचं आणि स्वार्थाचं राजकारण आहे. त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची पात्रता नाही' अशी विधानं राणे यांनी केली होती. ही विधानं नांदेडच्या निकालाने साफ चुकीची ठरवली आहेत."

"शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या विरोधात भाजप सरकार आहे हे लक्षात घ्यायला हवं. शेतकरी संप हे त्याचंच उदाहरण आहे."

"नोटाबंदीनंतरचे दोन महिने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. नांदेड ही शहरी बाजारपेठ आहे आणि ग्रामीण भागाशी जोडलेली असल्याने तिथलं ग्रामीण अर्थकारण महत्वाचं आहे. अशा निमशहरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची केंद्र असणाऱ्या ठिकाणी नोटाबंदीचा थेट परिणाम जाणवतोय."

"नांदेडमध्ये भाजपचा जो पराभव झाला तो नांदेडसारख्या अनेक लहान शहरांमध्ये आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल. तसंच जीएसटीचा फटका व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना बसला. त्यामुळे लोकांचा राज्य आणि केंद्र सरकारवरील विश्वास उडालेला दिसतोय. लोकांना कळून चुकलंय ही भाजप सरकार आधीच्या सरकारपेक्षा वेगळं नाही. सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी जी स्वप्न दाखवली होती ती खोटी असल्याचं जनतेसमोरही उघडं झालंय.

"नांदेडच्या निकालात एमआयएमचा दारुण पराभव होण्याचं कारण या पक्षाचं धोरण भाजपला पूरक ठरेल असंच राहिलं आहे. एमआयएमचे नेते वापरत असलेली भाषा ही संघ किंवा बंजरंग दलाच्या भाषेपेक्षा वेगळी नाही हे लोकांना कळून चुकलं, नांदेडचा कौल हे मुस्लीम मतदारांनी दिलेलं उत्तरच आहे."

"शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमदार हेमंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांना ताकद देण्याचं काम सेनेने केलंच नाही. शिवसेनेचं आताचं राजकारण हे पराभवाच्या दिशेने वाटचाल करणारं राहणार आहे, असं दिसतंय."

"मराठा मोर्चा, बहुजन मोर्चा, दलित मोर्चा उत्स्फुर्तपणे निघालेला असताना पुढे मॅनेज करण्याचं काम भाजपने केलं. कोपर्डीच्या मराठा मोर्चात सुरुवातील काळ्या टोप्या दिसल्या, नंतर औरंगाबादच्या मराठा मोर्चात त्या भगव्या झाल्या आणि पुढे मुंबईच्या मराठा मोर्चाची तर फरफटच झाली.

"भाजपने मोर्चा फोडण्याचं काम केलं. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार यांच्याविषयीचा असंतोष वाढलाय."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)