प्रेस रिव्ह्यू - टाटा टेलिसर्विसेस भारती एअरटेलमध्ये विलीन होणार

एअरटेल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा टाटा उद्योगसमूहाचा मोबाईल सेवा देणारा उद्योग भारती एअरटेल समूहात विलीन होणार आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, टाटा उद्योगसमूहाचा टाटा टेलिसर्विसेस लिमिटेड आणि टाटा टेलिसर्विसेस महाराष्ट्र लिमिटेड हा मोबाईल सेवा देणारा उद्योग भारती एअरटेल समूहात विलीन होणार आहे.

भारती एअरटेल आणि टाटा समूहातर्फे गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. या विलीनीकरणाशी निगडीत परवानग्या ट्रायकडून अद्याप मिळालेल्या नाहीत.

तसेच या विलीनकरणाच्या व्यवहाराची किंमतही या कंपन्यांनी घोषित केलेली नाही.

Image copyright ROUF BHAT/Getty Images
प्रतिमा मथळा 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या सरकारी अभियानाच्या बॅनरवर फुटीरतावादी महिला नेत्याचा फोटो लावल्याबद्दल एका अधिकाऱ्याचे निलंबन.

बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, भारत प्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या सरकारी अभियानाच्या बॅनरवर फुटीरतावादी महिला नेत्याचा फोटो लावल्याबद्दल एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

दक्षिण काश्मीरमधील कोकरनागमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कश्मीर आणि देशातील इतर यशस्वी महिलांचे फोटो या बॅनरवर होते. त्यात फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांचाही फोटो होता.

हा फोटो लावल्याच्या आरोपावरून कश्मीरमधील 'इंटीग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विस'च्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतात नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी 23 लाख नागरिक विस्थापित होतात.

देशात 23 लाख विस्थापित

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारतात दरवर्षी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानं विस्थापित होणाऱ्यांची संख्या अंदाजे 23 लाख इतकी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी 'आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निर्मूलन' दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे.

भूकंप, पूर आणि वादळं यासारख्या आपत्तींमुळे 23 लाख नागरिक विस्थापित होत असल्यानं भारत हा जगात सर्वाधिक विस्थापित होणाऱ्यांचा देश झाल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसंच, विस्थापितांची संख्या वाढत असल्यानं बेघर होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारत येत्या 3 ते 5 वर्षात सरकारच्या विशेष कौशल्य कार्यक्रमांतर्गत जपानमध्ये 3 लाख भारतीय तरूणांना पाठवणार आहे.

तीन लाख तरूण जपानमध्ये जाणार

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, भारत येत्या 3 ते 5 वर्षात सरकारच्या विशेष कौशल्य कार्यक्रमांतर्गत 3 लाख भारतीय तरूणांना जपानमध्ये पाठवणार आहे. अशी घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी केली.

या तरूणांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच तांत्रिक कौशल्य देण्यासाठी येणारा खर्च जपान सरकार करणार असल्याचेही प्रधान यांनी स्पष्ट केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील गोरेगावातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंग तरूणाला आठ मजले चढ-उतार करायला लावल्याचे प्रकरण उघड झालं आहे.

विकलांग तरुणाला त्रास

दैनिक सकाळ मधील वृत्तानुसार, सेरेलब्रल पाल्सी या आजारानं ग्रस्त असलेल्या एका तरूणाला मुंबईतील गोरेगावातील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आठ मजले चढ-उतार करायला लावल्याचं प्रकरण उघड झालं आहे.

पुष्कर गुळगुळे असं तरुणाचं नाव आहे. सोसायटीच्या आवारात गुळगुळे यांनी गाडी ठेवल्याचं निमित्त करून सेक्रेटरींनी गुळगुळेंच्या घरी जाऊन पुष्करला दमदाटी केली आणि गाडी बाहेर ठेव असं सांगितलं.

पण, आपण विकलांग असल्यानं गाडी चालवू शकत नाही, असं सांगितल्यावर तुझ्या आईवडिलांना घेऊन ये, असं सेक्रेटरींनी फर्मावलं.

त्यामुळे ६५ टक्के विकलांग असलेल्या पुष्करला त्या विंगचे चार मजले जिन्यानं उतरून पुन्हा दुसऱ्या विंगचे चार मजले चढावे लागले.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं सकाळमधील या बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)