जय शहा प्रकरणाचा फायदा राहुल गांधी उठवणार का?

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, सोशल मीडिया, ट्रोल्स Image copyright Google
प्रतिमा मथळा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लढाई खऱ्या अर्थानं तीव्र झाली आहे.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातली लढाई जय शहा प्रकरणानंतर तीव्र झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यापक दौरा हाती घेतला.

त्याचवेळी अमित शहा गांधी घराण्याचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात तळ ठोकून आहेत. 2014 लोकसभा निवडणुकांवेळी राहुल गांधी यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांना नमवत बाजी मारली होती.

काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बरोबरीनं अमेठीतील काही प्रकल्पांचं अनावरण केलं.

औचित्य जनतेसाठीच्या प्रकल्पांचं लोकार्पण असलं तरी याप्रसंगी शहा यांचं उपहास आणि कोपरखळ्यांनी भरलेलं भाषण राहुल गांधींना उद्देशून होतं.

अमेठीच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी काँग्रेसचे युवराज अर्थात राहुल गांधी गुजरात मुक्कामी आहेत असा टोला शहा यांनी लगावला.

गेल्या काही वर्षांमध्ये राहुल गांधी यांना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे. शहा यांच्या शेलकी विशेषणांमध्ये म्हणूनच नाविन्य नाही.

पण, अशा उद्गारांना राहुल देत असलेलं प्रत्युत्तर नवीन आहे. 2014 लोकसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाब्दिक टोलेबाजी सुरू केली आहे.

Image copyright Getty Images

2014मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या संपत्तीत 16 हजार टक्क्यांची वाढ झाली.

जय यांचं व्यवसायातली कोटीच्या कोटी उड्डाणांचं प्रकरण एका वेबसाइटनं समोर आणलं. याप्रकरणानं अमित शाह यांच्याविरुद्ध बिगुल फुंकण्यासाठी राहुल यांना मोठंच बळ मिळालं.

समोर आलेल्या आयत्या संधीचा राहुल यांनी शहांविरुद्ध बोलंदाजी करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. भाजपनं अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींना टार्गेट केलं होतं.

त्याच अस्त्राचा वापर करत राहुल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींवर टीका करताना राहुल यांनी वापरलेली भाषा अनेकांना धक्का देणारी होती.

तूर्तास तरी पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांच्या टीकेला उत्तर दिलेलं नाही. पण एरव्ही आक्रमक असणारे अमित शाह यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून शहा पहिल्यांदाच बॅकफूटवर गेले आहेत.

Image copyright Google
प्रतिमा मथळा नोटाबंदीप्रकरणाचा राजकीय फायदा उचलण्यात काँग्रेस अपयशी ठरलं असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

राहुल यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांचाच गड असणाऱ्या अमेठीत ठाण मांडण्याचा चुकीचा सल्ला शहा यांना देण्यात आल्याचा दावा काहीजण करतात. राहुल गांधींवर टीका करून त्यांच्या अमेठीतल्या वर्चस्वाला धक्का देऊ शकतो का?

राहुल गांधींसाठीही असाच एक सवाल आहे. निवडणुकांपर्यंत ते सर्वबाजूंनी भाजपवर दबाव आणणार की फक्त शाब्दिक चकमकीतच त्यांना स्वारस्य आहे?

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा राहुल गांधींनी ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जय शहा प्रकरण उघड झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं स्वीकारलेला आक्रमक पवित्रा त्यांच्या बदललेल्या डावपेचांचं प्रतीक आहे.

राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांना हैराण करत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल पत्रकार परिषदेत भाजपला अडचणीत आणणारे प्रश्न विचारत होते.

त्याचवेळी जुनेजाणते नेते आनंद शर्मा यांनी जय शाह प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी मौन सोडावं आणि न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसनं भाजपला बॅकफूटवर ढकललं आहे. मात्र काँग्रेस हा दबाव 2019 निवडणुकांपर्यंत कायम राखू शकेल का?

या प्रश्नाचं उत्तर द्यायला काँग्रेसमधलं कुणीही तयार नाही. नोटाबंदीच्या वेळी मोदी सरकारला अडचणीत आणण्याची मोठी संधी काँग्रेसनं दवडली यावर राजकीय विश्लेषकांचं एकमत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुलगा जय शहा यांचं अवाजवी संपत्तीचं प्रकरण अमित शहा आणि पर्यायाने भाजपला भोवण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेस पक्षातील एका गटाचा विश्वास नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडियावर 'पप्पू' या नावानं खिल्ली उडवत भाजपनं काँग्रेसच्या भावी नेतृत्वाला दणका दिला आहे. पप्पू अशी संभावना झालेले राहुल गांधी मोदी यांच्या नेतृत्वाला टक्कर देऊ शकतात का अशी शंका सामान्य माणसाला आहे.

मात्र गेल्या काही महिन्यात राहुल यांनी आपल्याविरुद्धची बाजी पलटवायला सुरुवात केली आहे.

अमेरिकेतल्या बर्कले विद्यापीठात राहुल यांनी केलेल्या भाषणाचं त्यांच्या समर्थकांनी तसंच राजकारणापासून अलिप्त असलेल्या लोकांनीही कौतुक केलं आहे.

राहुल यांच्या भाषणाचा समाचार घेण्यासाठी भाजपनं 13 कॅबिनेट मंत्र्यांना मैदानात उतरवलं. मात्र जनतेवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

राहुल गांधींविरुद्ध जाणीवपूर्वक पुकारलेल्या मात्र फारसं तथ्य नसलेल्या या मोहिमेमुळे भाजपवरच बुमरँग उलटलं.

प्रतिमा मथळा सद्यस्थितीवर बीबीसीने केलेलं भाष्य

राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राहुल यांची आई आणि सध्याच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सल्लागार म्हणून पडद्यामागची भूमिका घेतली असा होरा आहे.

काँग्रेसच्या दिल्ली तसंच जम्मू काश्मीर विभागांनी राहुल यांनी पक्षाचं नेतृत्व हाती घ्यावं अशी आग्रही मागणी केली आहे. राहुल यांना पक्षांतर्गत विरोध होण्याचा मुद्दा आता निकाली निघाला आहे.

युपीएच्या घटक पक्षांनाही काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे राहुल गांधी हे समीकरण पक्कं केलं आहे.

काँग्रेसचे युवराज राहुल यांचं आता पक्षाचे अधिकृत राजेपदी संक्रमण होण्यासाठी सगळी परिस्थिती अनुकूल आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)