आईसोबतच्या भांडणातून त्याला सापडलं 'हॉटेल'

मुनफ कपाडिया आणि नफिसा कपाडिया Image copyright Empics
प्रतिमा मथळा मुनफ आणि त्याची आई नफिसा कपाडिया.

मुनफ कपाडियाला 2014 मधली ती दुपार अजूनही लख्ख आठवते. त्या दुपारीच त्याचं आणि त्याच्या आईचं कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र, त्या भांडणानंतर त्याचं आणि त्याच्या आईचं आयुष्य पार बदलून गेलं.

खरंतर त्या वेळी गुगल सारख्या नामांकित कंपनीत काम करणारा 25 वर्षीय मुनफ टीव्हीवर आपला आवडता अमेरिकी कार्टून शो 'द सिम्पसन्स' बघत होता.

मात्र, त्याच्या आईला एक भारतीय टीव्ही शो बघायचा होता. मुनफच्या आईनं टीव्हीचं चॅनल बदलून आपला आवडता कार्यक्रम लावला. आपला आवडता टीव्ही शो बदलल्यानं मुनफ वैतागला.

यावरून आई आणि मुलांत भांडणाला सुरुवात झाली. मात्र, या भांडणातून एक वेगळीच 'आयडिया' जन्माला आली. या कल्पनेच्या जोरावर मुनफनं स्वतःचं 'पॉप-अप रेस्टॉरंट' सुरू केलं आहे.

आणि या रेस्टॉरंटची 'हेड शेफ' मुनफची आई नफिसा आहे.

आईच्या जेवणाचे प्रयोग

आपल्या आईच्या हातची चव खूपच चांगली आहे आणि ती उत्तम स्वयंपाक करते याची मुनफला खात्री होती. पण, केवळ टीव्ही बघण्यात ती वेळ घालवते असं मुनफला वाटायचं.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा बोहरी किचनमध्ये खवय्यांना मोठी थाळी सगळ्यात जास्त आवडते.

मुनफची आई नफिसा 'बोहरी' पद्धतीचे पदार्थ देखील छान बनवते. 'बोहरी' पद्धतीचे काही पदार्थ आता मुंबईत मिळणं कठीण झालं आहे.

यावर मुनफनं एक नवीन युक्ती शोधून काढली. त्यानं आपल्या ५० मित्रांना घरी जेवायला बोलवलं.

याबाबत सांगताना मुनफ आठवणींमध्ये गढून गेला.

तो आठवणी सांगताना म्हणाला, ''माझे ८ मित्र पहिले घरी जेवायला आले. आईनं बनवलेला खास मेनू त्या दिवशीच्या जेवणाचं खरं आकर्षण होतं. त्या दिवशी हा प्रयोग यशस्वी झाला."

"मग, आम्ही दर शनिवार-रविवारी मित्रांना बोलवून घरी जेवणाचा कार्यक्रम करू लागलो. हळूहळू हेच जेवण रेस्टॉरंटच्या भावात लोकांना विकू लागलो. यातूनच 'बोहरी किचन'चा जन्म झाला."

'आईच्या हातात जादू आहे'

'बोहरी' पद्धतीचे पदार्थ दाऊदी बोहरा समाजात जास्त प्रचलित आहेत. भारत आणि पाकिस्तानात राहणारा हा एक छोटासा मुस्लीम समाज आहे. त्यांचे पदार्थ या भागात विशेष प्रचलित नाहीत.

त्यामुळे हेच पदार्थ मुनफच्या पॉप-अप रेस्टॉरंटमध्ये मिळतात. या रेस्टॉरंटच्या पहिल्या ऑर्डरसाठी मुनफनं एका व्यक्तीसाठी ७०० रूपये दर ठेवला होता.

Image copyright RAHUL AKERKAR

"आईच्या हातचं जेवण लोकांना आवडू लागलं. तुमच्या आईच्या हातात जादू आहे, अशी प्रतिक्रिया जेवण करणारे देऊ लागले." असं मुनफनं सांगितलं.

तो पुढे म्हणाला, ''मी आईच्या डोळ्यातला आनंद त्यावेळी पाहत होतो. पहिल्यांदाच तिच्या जेवणाचं कुणीतरी भरभरून कौतुक करत होतं."

मुनफनं यानंतर खाद्य व्यवसायात उडी घेण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयानं फायदाच होईल हे त्याच्या तोपर्यंत लक्ष आलं होतं.

अखेर जानेवारी २०१५ मध्ये त्याने गुगलमधली चांगली नोकरी सोडून घरीच 'द बोहरी किचन'ची सुरुवात केली.

बोहरी पदार्थांची चव लोकांना हळू-हळू आवडू लागली. त्यामुळे मुनफ आता प्रत्येक जेवणाचे १५०० रूपये देखील घेतो. यात लंच आणि कधी-कधी डिनरचा सुद्धा समावेश असतो.

Image copyright RAHUL AKERKAR
प्रतिमा मथळा 'द बोहरी किचन'चा विशेष समोसा.

याशिवाय मुनफनं आता केटरिंगचा वेगळा व्यवसायही सुरू केला आहे. यासाठी त्यानं तीन माणसांना कामावरही ठेवलं आहे.

केटरिंग व्यवसायातली आव्हानं

मुनफचा हा व्यवसाय आता यशस्वी होऊ लागला आहे. त्याला आता देशाच्या इतर भागात हा व्यवसाय वाढवायचा आहे.

हे सगळं करणं इतकं सोप नाही याची मुनफला जाणीव आहे. अनोळखी लोकांना घरी जेवायला बोलवणं हेच खूप मुश्किल काम असल्याचं त्यानं सांगितलं.

अनोळखी लोकांसाठी मुनफनं 'नो सिरियल किलर पॉलिसी' या स्वतःच शोधलेल्या फंड्याचा वापर केला.

"म्हणजे जर एखाद्या ग्राहकाला घरी जेवायला यायचं असेल तर त्याला त्याचं बुकिंग करावं लागेल. यावेळी आम्ही त्यांना काही प्रश्न विचारायचो आणि त्यातून त्यांची माहिती मिळवायचो."

"तसंच दुसरं आव्हान म्हणजे की गुगलची नोकरी सोडून हा केटरिंगचा व्यवसाय किती फायदेशीर हे घरच्यांना समजावून सांगणं. हे मला प्रथम करावं लागलं."

"ग्राहकांसाठी जेवणाची गुणवत्ता आणि चव कशी कायम राहील. हे देखील मोठं आव्हान होतं." असं मुनफ सांगतो.

टेक्नोपॅक अॅडवायजर्सचे मॅनेजर रविंद्र यादव सांगतात की, "खाद्य व्यवसायात बांधलेले ग्राहक जमवणं हे खूप मोठं आव्हान आहे."

"हल्ली लोकांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांची आवड जपणं ही कधी-कधी समस्याच होऊन बसते."

Image copyright KINJAL PANDYA-WAGH
प्रतिमा मथळा 'द बोहरी किचन'चा दूधी हलवा.

भारतात गेल्या काही दशकात खाद्य व्यवसायात मोठ्या उलाढाली होऊ लागल्या आहेत. लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे.

तसंच चांगलं खाण्यासाठी लोक पैसे खर्च करण्याचीही तयारी दाखवू लागले आहेत.

'जेवण बनवताना टीव्ही पाहते'

मुनफची आई नफिसा त्यांच्या 'द बोहरी किचन'बद्दल सांगतात, "मी जेवण बनवण्याला कधी उद्योग किंवा व्यवसाय म्हणून पाहिलं नाही. स्वयंपाक करणं मला मुळातच आवडतं."

"जेवल्यावर लोक माझ्या स्वयंपाकाचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा मला प्रचंड आनंद होतो."

पण, तुमच्या मुलानं तुमची टीव्ही बघण्याची सवय बंद केली का? असं विचारल्यावर त्या हसून म्हणातात, "मी आजही जेवण बनवताना माझ्या आवडीचा टीव्ही शो पाहतेच."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)