'राज आणि उद्धव ठाकरे : महाराष्ट्रातले ट्वीडलडम आणि ट्वीडलडी'

राज ठाकरे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची ही "नीच" आणि "भिकार" खेळी असल्याचा आरोप केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतल्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वादाला नवं वळण लागलं आहे.

राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंची ही "नीच" आणि "भिकार" खेळी असल्याचा आरोप केला.

ठाकरे बंधूंमधलं हे भांडण पाहून मला अॅलिस इन वंडरलँड या प्रसिद्ध इंग्रजी कथेतल्या दोन ओळी आठवल्या...

"Tweedledum and Tweedledee

Agreed to have a battle;

For Tweedledum said Tweedledee

Had spoiled his new rattle"

'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' नावाचे दोन भाऊ असतात. ते हुबेहूब एकमेकांसारखे दिसतात आणि वागतात. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं.

त्यांच्यात कायम लुटुपुटूची भांडणं सुरू असतात. पण छोटंसं संकट आलं तरी एकमेकांच्या गळ्यात पडतात.

नागरीकरणाचा प्रवास पुढे सरकत जातो, पण मानवी स्वभाव आणि भांडणतंट्याचं स्वरूप सारखंच राहतं, हे यावरून सिद्ध होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज आणि उद्धव यांच्या नावामागे ठाकरे आडनावाचा वारसा आहे. एक आहे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा तर दुसरा आहे पुतण्या.

राज आणि उद्धव यांच्या नावामागे ठाकरे आडनावाचा वारसा आहे. एक आहे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा तर दुसरा आहे पुतण्या.

राज आणि उद्धव यांच्यातलं राजकीय नातं?

मराठी माणूस हाच दोघांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्या संरक्षणाचे दोघेही कडवे पुरस्कर्ते. या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज हे दोघांचं आद्य दैवत आहे.

दोघांमध्येही विचारसरणीवरून किंवा घराण्यातला असा कोणताही वाद नाही. दोघांच्याही जनाधारामध्ये कमालीचं साम्य आहे.

युवा वर्गाला आकर्षून घेण्यात राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर सरशी असली तरी पारंपरिक मराठी माणसाचा पाठिंबा शिवसेनेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध हा दोघांमधला आता समान धागा आहे. मात्र चार वर्षांपूर्वी राज ठाकरे मोदींची जाहीरपणे भरभरून स्तुती करत होते. मोदी पंतप्रधान होण्याच्या मोहिमेसाठी राज ठाकरे यांनी प्रचार केला होता.

दुसरीकडे 2014 मधल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली. ही युती म्हणजे विश्वासघात असल्याचं राज यांना वाटलं होतं.

मात्र तरीही दोन्ही भाऊ राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मोदीप्रणित भाजपबरोबरंच होते.

मात्र निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी शिवसेना-भाजप युती भंगली. त्यामुळे पुन्हा एकदा 'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' यांच्याप्रमाणे या दोघांची स्थिती सारखीच होती.

राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यापासून या दोघांनी एकमेकांविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं.

वितुष्टाचा फायदा इतरांना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून तर दोघांचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर येत आणि हे दोघं एकमेकांवर यथेच्छ शाब्दिक चिखलफेक करत असत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज आणि उद्धव यांच्यातील वितुष्टाचा फायदा भाजप आणि अन्य पक्षांना मिळतो.

सच्च्या मराठी माणसाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र यावं, असं वाटतं. काहीवेळा हे दोन पक्ष एकत्र चूल मांडणार असं वाटू लागतं, तोच या दोघांचा एकमेकांविरुद्ध वाचाळपणा सुरू होतो.

या दोघांच्या भांडणात मराठी माणसाची राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या हारच होते. या दोघांमधील वितुष्टाचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप यांना मिळतो.

आणि हा फायदा मिळवून देण्यात सोशल मीडियाचा वाटा कळीचा आहे. राज आणि भाजप यांचा छुपा समझोता आहे, असा शिवसेनेचा आरोप आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करायची आणि त्याचवेळी सत्तेत भाजपबरोबरचा घरोबा कायम राखायचा, ही शिवसेनेची दुतोंडी भूमिका आहे अशी टीका राज करतात.

मुख्यमंत्री फडणवीसांचं सरकार अस्थिर व्हावं, हा अंतस्थ हेतू असल्यानं राष्ट्रवादी कधी राजची तर कधी उद्धवची भलामण करतं. शिवसेना आणि मनसे- दोन्ही पक्षांनी मोदीविरोधी पवित्रा घेतल्याने काँग्रेसला आनंद होतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काही दिवसांपूर्वीच भाजपप्रणीत एनडीए आघाडीत राणे आणि पर्यायाने त्यांचा नवीन पक्ष सामील झाला आहे.

हे किचकट समीकरण आता आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. 'डंख मारणारा साप' हे शिवसेनेचं नारायण राणेंबद्दलचं मत आहे.

राणेंच्या एनडीए प्रवेशावरून अधिक गुंतागुंत

काही दिवसांपूर्वीच भाजपप्रणीत एनडीए आघाडीत राणे आणि पर्यायाने त्यांचा नवीन पक्ष सामील झाला आहे. उद्धव आणि शिवसेनेला काटशह देण्यासाठीच भाजपनं केलेली ही खेळी आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बरोबरीनं राणे कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत कसे सहभागी होतील?

हे अवघड जागचं दुखणं लक्षात घेऊन, शिवसेना भाजपची साथ सोडेल अशी आवई जाणीवपूर्वक सेनेचा बालेकिल्ला आणि उद्धव यांचं निवासस्थान असणाऱ्या 'मातोश्री'वरून उठवण्यात आली.

मात्र भाजपवर याचा परिणाम झाला नाही. याचं कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपा तह केला आहे. प्रफुल्ल पटेल या तहाचे मध्यस्थ आहेत.

अमित शहांचा पुढाकार आणि शरद पवारांनी अनुल्लेख केल्यानंतरच भाजपने 2014 मध्ये शिवसेनेशी युती तोडली होती.

शिवसेनेला कह्यात ठेवण्यासाठी, राणेंना NDAचा घटक बनवून राज्य सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊ करणं, हे अमित शहांचंच चातुर्य होतं.

विश्वासघाताचा पहिला दणका 1990 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेनेला दिला. या बंडामागे शरद पवारांची कुटिल नीती होती.

1995 साली राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि एकेकाळी सेनेचा ढाण्या म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे सरकारचे कट्टर विरोधक झाले.

भुजबळ सध्या जेलमध्ये आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिजवण्यासाठी भुजबळ अस्त्राचा वापर भाजपकडून होतो.

राणे भाजपप्रणीत NDA कंपूत गेल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या काही जणांचं धाबं दणाणलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज्यातलं राजकीय वातावरण इतकं खालच्या थराला गेलं आहे की कोण कुणासोबत जाईल, हे समजणं अवघड आहे.

त्यामुळे कोण कोणाला अडचणीत आणतं आणि कोण कोणाचा फायदा घेतं? हे म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे असं काहीसं आहे.

राजकारण खालच्या थराला...

राज्यातलं राजकीय वातावरण इतकं खालच्या थराला गेलं आहे की कोण कुणासोबत जाईल, हे समजणं अवघड आहे.

'गवताच्या गंजीत सुई शोधणं' अशा आशयाचे उद्गार ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्ट्न चर्चिल यांनी काढले होते. त्यांच्या उद्गाराचा संदर्भ वेगळा होता. मात्र महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती काहीशी तशीच आहे.

कदाचित गणितीय विश्वातल्या रेइमन गृहितकावर आधारित क्लिष्ट समीकरणांची उकल करता येईल.

पण महाराष्ट्रातल्या राजकारणातले 'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' ठरलेल्या राज आणि उद्धव यांच्यातल्या तिढ्याची उकल करणं कदाचित शेरलॉक होम्सलाही जमणार नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)