दिल्लीतील रोहिंग्या मुस्लीम का करत आहेत धर्मांतर?

जॉन सुल्तान Image copyright FACEBOOK/JOHN SULTAN
प्रतिमा मथळा जॉन सुल्तान

म्यानमारमधून भारतात पोहोचलेला मोहम्मद सुल्तान आता जॉन सुल्तान झाला आहे. पाच वर्षांपूर्वी तो त्याच्या कुटुंबासह दिल्लीत आला होता.

दिल्लीतील उत्तम नगर इथल्या रोहिंग्या वस्तीत राहणारा जॉन सुल्तान आता स्वतःला ख्रिश्चन मानतो. तो आता मित्रांमध्ये आणि फेसबुकवर येशू ख्रिस्तांच्या संदेशांचा प्रचार करतो.

फक्त जॉन सुल्तानच नव्हे तर त्याच्या वस्तीतील जवळपास 120 लोक ख्रिश्चन धर्माचं पालन करतात. या वस्तीत एक चर्चही आहे. इथं दररोज येशू ख्रिस्तांची प्रार्थना केली जाते.

भारतात आल्यानंतर या समुदायात जन्माला आलेल्या सर्व नव्या मुलांची नावं ख्रिश्चन धर्मानुसार ठेवली गेली आहेत.

आता नमाज पठण नाही

वस्तीत राहणाऱ्या कबीरला रुबीना, फारमीन आणि सॅम्युअल ही तीन मुलं आहेत. रुबीनाचं वय 13 वर्ष आहे. फारमीन सात वर्षांचा आहे तर सात महिन्यांच्या सॅम्युअलचा जन्म भारतात झाला आहे.

प्रतिमा मथळा या रोहिंग्या वस्तीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

याच वस्तीत राहणाऱ्या हकीम नावाच्या एका व्यक्तीनं सांगितलं की, भारतात आल्यावर त्यांना एक मुलगा झाला. ज्याचं नाव त्यांनी पीटर ठेवलं.

मुलाचं नाव हेच का ठेवलं, असा प्रश्न हकीम यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की, "बायबलमध्ये या नावाचा उल्लेख असल्यान मी हे नाव ठेवलं. आम्ही लोक अजिबात नमाज पठण करत नाही. आम्ही येशू ख्रिस्तांची प्रार्थना करतो."

या वस्ती समोरच एक चर्च आहे. पण ही लोकं तिकडं नाही जात. त्यांच्या वस्तीत असलेल्या चर्चमध्येच प्रार्थना करतात.

झोपडीमध्ये उभारला चर्च

समोर असलेल्या चर्चमध्ये त्यांना प्रवेश नाही अस जॉन सुल्तान सांगतो.

बीबीसीशी बोलताना त्यानं सांगितलं की, "आमच्या वस्तीमध्येच झोपडीत चर्च आहे. आम्ही समोरच्या चर्चमध्ये जात नाही. तो चर्च कॅथलिक ख्रिश्चनांचा आहे. तर आम्ही प्रोटेस्टेंट आहोत. आम्ही येशू ख्रिस्तांना मानतो. तर ते मदरला मानतात."

प्रतिमा मथळा करीमने सांगितलं की दर रविवारी झोपडीतल्या चर्चमध्ये प्रार्थना सभा आयोजित केली जाते.

याच वस्तीत राहणाऱ्या करीम यांनी सांगितलं की, वस्तीतील रहिवाशी दर रविवारी या झोपडीतल्या चर्चमध्ये एकत्र जमतात आणि प्रार्थना करतात.

जॉन फाडफाड इंग्रजी बोलतो आणि लिहतो सुद्धा. आपल्या फेसबुक प्रोफाईलवर तो इंग्रजीमध्येच स्टेटस टाकतो. त्याच्या फेसबुक पोस्ट जास्त करून रोहिंग्यावर होणारे हल्ले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराशी संबधितच असतात.

स्वयंसेवी संस्थांची मदत

धर्म परिवर्तनाशी संबधित एक पोस्ट जॉन सुल्ताननं फेसबुकवर टाकली आहे. ज्यात एक हिंदू कशा पद्धतीनं ख्रिश्चन झाला याची कथा दाखवण्यात आली आहे. तो बायबलमधील उपदेशही पोस्ट करतो.

Image copyright FACEBOOK/JOHN SULTAN
प्रतिमा मथळा जॉन सुल्तानची एक फेसबुक पोस्ट

एका फेसबुक पोस्टमध्ये तो लिहतो, "अनेक लोक फक्त येशू-येशू करत असतात. पण त्यांना आपल्या हृदयात जागा देत नाहीत. येशू ख्रिस्तांना तुम्ही हृदयात जागा दिली तर नक्कीच तुम्हाला एक नवं जीवन मिळेल."

या वस्तीत राहणाऱ्या अनेकांना धार्मिक संघटनांकडून मदत दिली जाते. जॉन सुल्तान अशाच एका संघटनेशी जोडला गेला आहे.

तो तिथं शिक्षणही घेत आहे. त्यानं मुक्त शालेय शिक्षणाच्या माध्यमातून दहावीची परिक्षाही दिली आहे. अभ्यासासोबतच त्याला फुटबॉल खेळायलाही आवडतं.

अशी आहे रोहिंग्यांची वस्ती

एका लांबलचक जमिनीच्या तुकड्यावर वसलेल्या रोहिंग्या वस्तीच्या चारही बाजूंनी भिंत आहे. ते त्यासाठी दरवर्षी लाखो रुपये भाडं देतात.

प्रतिमा मथळा वस्तीतील लहान मुलं

हकीम यांनी सांगितलं की, "आम्ही इथं दिड वर्षांपासून राहतो. ही जमीन भाड्यावर घेण्यात आली आहे. आधी दोन लाख रुपये वार्षिक भाडं होतं. नंतर दुसऱ्यावर्षी त्यात वीस हजार रुपये वाढ करण्यात आली. आता दोन लाख वीस हजार रुपये भाडं देतो."

वस्तीत राहणारी सर्व कुटुंब एकत्रितरित्या हे भाडं भरतात. ज्या कुटुंबात जेवढे जास्त सदस्य, तेवढं त्यांना जास्त भाडं आकारलं जातं.

हकीम सांगतात, "महिला, पुरुंषांसोबत लहान मुलांनाही मोजलं जातं. यापद्धतीनं एका व्यक्तीला एका वर्षासाठी दोन हजार रुपये भाडं द्यावं लागतं."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
हैद्राबादमधल्या रोहिंग्या मुस्लिमांच काय होणार?

सुरक्षेचे सर्व उपाय

संपुर्ण वस्तीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कव्हर करण्यात आलं आहे. इथं मुख्य दरवाज्यावर निरक्षणासाठी वॉच टॉवर आहे. या वस्तीत अनोळखी लोकांना प्रवेश नाही.

इथं राहणाऱ्या महिला एकमेकांशी बोलताना बर्मी भाषेचा वापर करतात. बाहेरच्या जगाशी त्यांचा फारसा संबध येत नाही. त्याचवेळी वस्तीतील पुरुषांना कमाईसाठी बाहेर जावं तर लागतं. पण ते स्थानिक लोकांबरोबर फार मिसळत नाहीत.

प्रतिमा मथळा वस्तीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात नाताळ सण साजरा केला जातो.

वस्तीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात नाताळचा सण साजरा केला जातो. इथं राहणारे तरूण आतापासूनच येणाऱ्या नाताळच्या तयारीचं नियोजन करण्यात गुंग आहेत.

जॉन सुल्तानं म्हणाला, "आम्ही दरवर्षी नाताळ साजरा करतो. ज्यात वस्तीतील सर्व जण सहभागी होतात. लहान मुलं तर यादिवशी खूप मस्ती करतात. वस्तीमध्ये पार्टी आयोजित केली जाते."

मजुरी करत सहा जणांच्या कुटुंबाचा गाडा हाकणारे हकीम म्हणतात, "आता आम्ही मुस्लीम नाही. ख्रिश्चन धर्म चांगला आहे. आम्ही आता याच धर्माचं पालन करतो."

आधी मुस्लीम आता ख्रिश्चन

भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास एकूण 40 हजार रोहिंग्या शरणार्थी आहेत. त्यातील 16 हजार शरणार्थींजवळ संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्थेची कार्ड सुद्धा आहेत. ज्यामुळं भारतात त्यांना शरणार्थी म्हणून राहण्याची परवानगी आहे.

पण, देशात राहणाऱ्या रोहिग्यांना परत पाठवलं जाईल असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजूजी यांनी सांगितलं होतं. सध्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत शरणार्थींना म्यानमारला परत पाठवू नये, असं सांगितलं आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

प्रतिमा मथळा रोहिंग्या शरणार्थी आधी स्वतःला मुस्लीम सांगायचे.

उत्तम नगरच्या रोहिंग्या वस्तीत काम करणाऱ्या लोकांचही म्हणनं आहे की, हे रोहिंग्या शरणार्थी आधी स्वतःला मुस्लीम सांगायचे.

एका महिलेने सांगितलं की, "आधी हे लोकं स्वतःला मुस्लीम सांगायचे. पांढरी टोपीही डोक्यावर घालायचे. आता ते चर्चमध्ये जायला लागले आहेत."

हा वैयक्तिक प्रश्न

रोहिंग्या शरणार्थींसाठी काम करणारी संस्था जकात फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सय्यद जफर महमूद हे धर्म परिवर्तनचा विषय हा वैयक्तिक असल्याचं सांगतात.

ते म्हणतात, "जर रोहिंग्यांनी स्वतः धर्मांतरणाचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांच्या वैयक्तिक अधिकार आहे. भारतीय राज्यघटनाही प्रत्येकाला हा अधिकार देते. जोर जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून जर धर्मांतरण केलं जात असेल तर ते संपुर्णतः चुकीचं असून घटनात्मकही नाही."

त्यानी माहिती दिली की, ते संयुक्त राष्ट्राच्या रिफ्यूजी एजेंसीच्या बैठकींनाही हजेरी लावतात. ज्यात अनेक संघटनाही (ज्या रोहिंग्या शरणार्थींसाठी काम करतात) सहभागी होतात. पण तिथं कधी धर्मांतरणाचा मुद्दा उपस्थित झालेल नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)