यंदा दिवाळीची शॉपिंग फेसबुक, इन्स्टाग्रामवरही

  • समृद्धा भांबुरे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोशल मीडियाचा वापर तसा एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी केला जातो. पण सध्या तरुणाई सोशल मीडियाचा बिझनेस करायला पुरेपूर वापर करताना दिसत आहे. जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी सोशल मीडियावरची एक पोस्ट आता त्यांच्या कमाईचं माध्यम बनली आहे.

ई-दिवाळीचा ट्रेंड आपल्यासाठी तसा नवीन नाही. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलच्या बंपर ऑफर्समुळे घरबसल्या दिवाळीची खरेदी करणं खूप सोपं झालं आहे.

त्यात स्मार्टफोन आणि डेटा प्लॅनही स्वस्त झाल्यामुळे फक्त शहरातच नाही तर अगदी गावागावांत आता इंटरनेट पोहोचलं आहे.

आजकाल फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर जवळपास प्रत्येकाचं अकाऊंट आहे. त्यामुळे यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सोशल मीडिया ही एक नामी संधी आहे.

तसं तर कोणताही बिझनेस करायचा असेल गरज असते एका भन्नाट आयडियाची. सोबतच लागतो भरपूर पैसा.

पण आता तुमच्याकडे जर कल्पना असेल तर तुम्हाला गरज आहे ती सोशल मीडियाच्या एका बिझनेस अकाऊंटची. हे अकाऊंट सुरू झाल्यानंतर कोणतीही पायपीट न करता तुम्ही अगदी घरबसल्या पैसे कमवू शकता.

सध्या सोशल मीडिया शॉपिंग करण्यासाठी एक सोपं माध्यम झालं आहे. कपडे असो किंवा शोभेच्या वस्तू, ग्राहकांबरोबरच विक्रेत्यांसाठीही आता हे जास्त सोयीचं माध्यम बनलं आहे.

फराळासोबतच सोशल मीडियावरचा हा बिजनेस यंदा अनेकांची दिवाळी मोठी करत आहे.

'यंदाची दिवाळी जोरदार!'

डोंबिवलीत राहणारी श्वेता चावरे ही एक आर्टिस्ट आहे. तिच्या घरी गेल्या 40 वर्षांपासून घरातच कंदील तयार केला जोतो.

यंदा घरातल्या या पंरापरेला बिझनेसमध्ये रुपांतर करायचं तिने ठरवलं आणि ती कामाला लागली.

"कंदील बनवणं तसं सोप होतं. पण तो विकायचा कसा, हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियामुळे हे फारच सोपं झालं. मला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि यातून मला तब्बल 10 हजार रुपयांचा फायदा झाला. त्यामुळे यंदा घरबसल्या आमची दिवाळी जोरदार झाली," असं श्वेता सांगते.

फायदे तसे तोटेही

श्वेता सारखंच मुंबईतल्या शलाका पाटकरलाही इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या बिझनेस अकाऊंटचा चांगलाच फायदा झाला आहे.

शलाकाने एक वर्षापूर्वी 'कोरल ब्लश' या नावे तिने पर्स आणि बॅग्सचा बिझनेस सुरू केला. ती स्वत: या पर्सेस डिझाईन आणि तयार करते. पण त्या पर्सेस विकायला दुकान टाकायचं नाही, असं तिनं आधीच ठरवलं होतं.

मग दुकानात पैसे गुंतवण्याऐवजी तिने तेच पैसे सोशल मीडियावर ब्रँडिंगसाठी वापरले. तिने प्रत्येक पोस्टवर भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे ती कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली.

आपला अनुभव शेअर करताना ती सांगते - "मी एक वर्षापासून हा बिझनेस करत आहे. सणांच्या दिवसात मला चांगला प्रतिसाद मिळतो."

"पण सोशल मीडियावर नंबर शेअर केल्यामुळे कुणाचेही, कधीही कॉल येतात. कधी कधी तर लोक उगाच त्रास द्यायला फोन करतात. त्यामुळे सोशल मीडियाचा फायदा होतो, पण नको त्या लोकांचा त्रासही होतो."

'जाहिरातींसाठी सोशल मीडियाचा वापर'

पण दिवाळीत सोशल मीडियाचा आणखी एक चांगला उपयोग केला तो प्रियंका देसाईने. मुंबईच्या वर्सोवात असलेल्या 'द लिटिल हाऊस'ची प्रियंका को-फाउंडर आहे. इथे ती वेगवेगळे उपक्रम राबवते.

यंदा 'द लिटिल हाऊस'मध्ये तिने दिवाळीदरम्यान लागणाऱ्या सर्व गोष्टीचं प्रदर्शन लावलं. याच्या प्रमोशनसाठी तिने सोशल मीडियासोबतच पारंपारिक पॅम्फलेटही वापरले.

पण जास्त लोकं हे फेसबुकवर पोस्ट वाचून आले, हे ती आवर्जून सांगते.

एकंदरीत काय तर आधी घरातले आपल्याला काय अख्खा दिवस फोनवर वेळ वाया घालवतो म्हणून ओरडायचे. पण आता हे फोनच तरुणाईसाठी कमाईचं साधन ठरत आहे.

भारतातील सोशल मीडीयावर वाढत्या मार्केटिंगची दखल मार्क झुकरबर्गने सुद्धा घेतली आहे. याचाच फायदा घेण्यासाठी त्याने 'फेसबुक फॉर बिझनेस', 'इन्स्टाग्राम बिझनेस', व्हॉट्स अॅप फॉर बिझनेस' असे नवीन अॅप्स आणले आहेत.

या अॅप्समधून किती लोकांनी तुमच्या पोस्टला लाईक, कॉमेंट आणि शेअर केलं आहे, ही आकडेवारी तर मिळतेच. शिवाय या उगवत्या उद्योजकांना जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधीही या व्यावसायिक अॅप्स देतात.

एकेकाळी आईबाबा आपल्याला आवर्जून बाजारपेठेत न्यायचे... दिवाळीचे नवीन कपडे घ्यायला. आज सर्वच किती सोपं झालं आहे ना - मित्रांचे अपडेट्स घेता-घेता, लाईक आणि शेअर करता-करता दिवाळीची शॉपिंगही होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)