#MeToo : 1 वर्ष झालं, पण आपल्याकडे या चळवळीने जोर का धरला नाही?

मी टू Image copyright Getty Images

#MeToo चळवळ सुरू होऊन एक वर्ष झालं, पण आपल्याकडे या चळवळीनं जोर का धरला नाही?

बायका सोशल मीडियावर आपले अनुभव सांगत नाहीत का? हाच प्रश्न आम्ही गेल्या वर्षी महिलांना विचारला होता. मागच्या ऑक्टोबरमध्ये जगभरात #MeToo चळवळीनं जोर धरला तर खरा, पण भारतात मात्र या चळवळीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

अमेरिकेत या चळवळीला मोठं केलं ते तिथल्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी आणि सेलेब्रटीजनी. जिने हा ट्रेंड सुरू केला त्या अलिसा मिलानोपासून लेडी गागा, एलन डीजेनेरस, ओप्रा विनफ्रे, रीस विदरस्पून आणि अशा अनेक अभिनेत्रींनी स्वतःच्या लैंगिक छळवणूकीचे अनुभव शेअर केले.

इतकंच नाही तर कान्स, गोल्डन ग्लोब अशा कार्यक्रमांमध्ये एकजुटीचं दर्शन घडवत पुरुषी मानसिकतेला विरोधही केला.

हे घडत असताना राहून राहून वाटतं होतं की हे भारतात का होत नाहीये? लैंगिक छळवणुकीविरूद्ध भारतातल्या महिला, सेलेब्रिटी का रिअॅक्ट का होत नाहीत? त्याचं उत्तर कदाचित तनुश्री दत्ताला जे सहन करावं लागलं त्यात मिळेल.

"आठ वर्षापूर्वीही मी हेच बोलत होते आणि तेव्हा मला वाटलं की मी भिंतीवर डोक आपटत आहे. बाकीच्या अभिनेत्री गप्प का हाही प्रश्न मला पडला आहे," तनुश्री दत्तानं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

Image copyright AFP

आजही ती बोलत आहे आणि तिला त्रास सहन करावा लागत आहे. हा पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हणण्यापासून ते तिच्यावर हल्ला करण्यापर्यंतच्या गोष्टी केल्या जात आहेत. कदाचित हेच कारण नाही ना की आपल्या बायका त्यांच्या बाबतीच जे घडलं त्याविषयी गप्प राहातात?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा Alyssa Milano

#MeToo ची वर्षपूर्ती

सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंड होत असतात, पण 15 ऑक्टोबर, 2017 च्या सकाळी एक वेगळाच हॅशटॅग ट्रेंड होत होता. जगभरातल्या हजारो महिला एकमेकींना सांगत होत्या, तू एकटीच नाही आहेस, हे माझ्याही बाबतीत झालं आहे. #MeToo.

हॉलिवुड अभिनेत्री अलिसा मिलानो हिने लैंगिक छळाविरूद्ध आवाज उठवण्याचं महिलांना आवाहन केलं. तिनं तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं की तुम्ही जर कधी लैंगिक छळवणूकीचा सामना केला असेल तर फक्त दोन शब्द लिहा. #MeToo.

'जर त्या सगळ्या स्त्रियांनी, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आयुष्यात लैंगिक छळवणूक किंवा लैंगिक अत्याचार सहन केला असेल, हे दोन शब्द त्यांचं स्टेटस म्हणून लिहीलं तर कदाचित हा प्रश्न किती गंभीर आहे हे लोकांना लक्षात येईल,' असं अलिसानं तिच्या स्टेटसमध्ये लिहिलं.

Image copyright सुप्रिया सोनर
प्रतिमा मथळा सुप्रिया सोनार आणि मुमताज शेख यांच्या संस्थेनं राबवलेल्या 'Speak Up' या उपक्रमातील एक चित्र

काही तासांतच हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला. स्त्रिया फक्त अलिसाचं स्टेटस शेअर करुन थांबल्या नाहीत तर त्यांनी स्वतःचे अनुभवही लिहिले.

आम्ही जेव्हा या अनुभवांचा धांडोळा घेतला तेव्हा आमच्या लक्षात आलं की भारतीय स्त्रिया हा हॅशटॅग तर वापरत आहेत. पण बऱ्याच जणींचे स्टेटस हे कॉपी पेस्ट आहेत. बऱ्याच भारतीय महिला अजूनही सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करायला संकोच करत आहेत.

म्हणजे त्या सोशल कॅम्पेनचा हिस्सा तर बनायचं आहे. पण, त्यांना स्वतःविषयी फार काही बोलायचं नाही.

Image copyright Facebook

का होत असेल असं? भारतीय स्त्रियांना सोशल मीडियावर अजूनही असुरक्षित का वाटतं? हा हॅशटॅग वापरून पोस्ट केलेल्या काही स्त्रियांशी आम्ही बोललो.

चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी सांगतात की, "हे आजचं नाही आहे. माझ्या कॉलेजच्या दिवसात एका रात्री आम्ही होस्टलवर बोलत बसलो होतो. हाच विषय होता आणि तेव्हा लक्षात आलं की कुठलीच बाई या वाईट अनुभवातून सुटली नाही.

प्रत्येकीनं हे कधी ना कधी हे सहन केलं आहे. हा हॅशटॅग पाहिला तेव्हा ती रात्र आठवली. अजूनही काहीच बदलेलं नाही."

आपल्याकडच्या स्त्रिया अधिक मोकळेपणानं या विषयावर बोलत का नाहीत, असं म्हणाल तर दोन गोष्टी आहेत, त्या पुढे सांगतात.

"एकतर सोशल मीडियावर जास्तीत जास्त पुरुषच आहेत. त्यामुळे मनातलं व्यक्त करायला स्त्रिया संकोच करतात. तिथं त्यांना सुरक्षित वाटत नाही.

आणि दुसरं म्हणजे सोशल मिडीयावर सगळेच असतात. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी. आपल्या आयुष्यातल्या खासगी गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर करणं नको वाटत स्त्रियांना अशावेळेस. कोण कसं प्रतिसाद देईल सांगता येत नाही. आपली बाजू समजून घेणारं सोशल मीडियावर कुणी असेल याची त्यांना शाश्वती नसते."

Image copyright Facebook

पण याच कारणासाठी सोशल मीडियावर व्यक्त होणं आवश्यक आहे, असं दिल्लीच्या मुनमुन चौधरी यांना वाटतं, मुनमुन एका प्रोडक्शन कंपनीत प्रोड्युसर म्हणून काम करतात. त्यांनी नुस्ता हा हॅशटॅग शेअर केला नाही तर त्यांचा एक अनुभवही शेअर केला.

"लैंगिक छळवणुकीबाबातचा मी सगळ्यात पहिला अनुभव शेअर केला. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. इतकी खासगी गोष्ट शेअर करायची की नाही याबद्दल मी खूप विचार केला.

पण मग असं वाटलं की जर मीही फक्त कॉपी-पेस्ट केलं तर काय उपयोग? निदान माझ्या पोस्टकडे बघून कोणाला तरी प्रेरणा मिळाली पाहिजे. जे मी लिहीलं ते वाचून एखादीला स्वतः विषयी बोलण्याची ताकद मिळेल. नुस्ती पोस्ट कॉपी-पोस्ट करणं नाटकी ठरेल."

अश्या मोहिमांमधून पुरूषांना वगळून चालणार नाही असंही त्यांना वाटतं. "आपण जे सांगतोय ते कोणाला? अर्थातच सोबत असणाऱ्या स्त्रियांना पण त्या बरोबरीन पुरुषांनाही."

Image copyright energyy/Getty Images

"ज्या ज्या बाईनं लैंगिक छळवणूक सहन केली आहे त्या प्रत्येक बाईच्या मागे खंबीरपणे उभं राहायला मी हा हॅशटॅग शेअर केला," मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख सांगतात.

"आत्ता तर कुठे बायका या विषयावर बोलायला लागल्या आहेत. मला वाटतं की आपल्या बाबतीत घडलेल्या वाईट गोष्टींविषयी जर बायका मनमोकळेपणानं बोलल्या तर खूप बरं होईल."

पण हे खरं आहे की भारतीय बायका अजूनही सोशल मीडियावर व्यक्त व्हायला संकोच करतात. त्यांना अजूनही तिथं सुरक्षित वाटत नाही.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अलिसा मिलानो यांचे ट्वीट

थिएटर रिसर्चर असणाऱ्या ओजस सुनीती विनय यांना वाटतं की स्त्रियांनी आपल्या खाजगी गोष्टी शेअर करणं किंवा सोशल मीडियावर खुलेपणानं आपली मत मांडण थोडं रिस्की असू शकतं.

"तुम्हाला सतत ऑनलाईन राहावं लागतं. आपल्या पोस्टचा विपर्यास होत नाही ना ते पाहावं लागतं. रिप्लाय करावे लागतात. आपला मुद्दा ठामपणे मांडावा लागतो. एकदा पोस्ट केली आणि गायब झालात, असं चालत नाही."

"दुसरं म्हणजे मला वाटत एक बाई म्हणून आपलंही हे कर्तव्य आहे की दुसरीनं काही पोस्ट केली असेल, स्वतःचा अनुभव शेअर केला असेल तर तिला खंबीरपणे साथ देणं. बोलायला लागा, एवढंच मला सांगायच आहे इतर बायकांना. माझा अनुभव आहे हा. तुम्ही बोलायला लागलात की बाकीच्या बायकांना पण बोलण्याचा हुरूप येतो."

( हा लेख 17 ऑक्टोबर 2017 रोजी बीबीसी मराठीवर प्रकाशित झाला होता. त्यात आता नव्याने काही अपडेट करण्यात आले आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)