जनमत चाचणीनंतर कुर्दबहुल भागात इराकी सैन्याची कारवाई

इराक, कुर्द, तुर्कस्तान, आयएस Image copyright AFP
प्रतिमा मथळा इराक सैन्य

इराक सैन्यानं वादग्रस्त किरकुक शहरातल्या मुख्य ठिकाणांवर कब्जा मिळवला आहे. इराक सैन्यानं शहराचा ताबा मिळवण्यापूर्वीच हजारो नागरिकांनी शहर सोडले होतं.

काही दिवसांपूर्वीच कुर्दिस्तानमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली होती. इराकपासून विलग होण्याचा कौल इथल्या नागरिकांनी दिला होता. यानंतर तीन आठवड्यांनंतर इराकचं सैन्य किरकुकमध्ये दाखल झालं आहे.

कुर्द भागातून इस्लामिक स्टेटला हुसकावून लावल्यानंतर कुर्दांचं नियंत्रण असलेल्या या प्रदेशावर ताबा मिळवण्याच्या दृष्टीनं इराकचं सैन्य पुढे जात आहे.

मोहीम नक्की काय?

25 सप्टेंबरला घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत किरकुकसहित कुर्द नियंत्रणात असलेल्या प्रांतांनी इराकपासून विलग होण्यासाठी मतदान केलं होतं.

किरकुक कुर्दिस्तानमध्ये येत नाही. मात्र इथं राहत असलेल्या कुर्द लोकसंख्येला जनमत चाचणीत मतदान करण्याची संधी देण्यात आली होती.

इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी या मतदानाला अवैध ठरवलं होतं. मात्र कुर्दिस्तानच्या सरकारनं हे मतदान वैध असल्याचा दावा केला होता.

या प्रदेशातील वातावरण निवळावं यासाठी इराक सरकार आणि कुर्द सरकारशी चर्चा करत असल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जनमताचा कौल देशाच्या एकतेला दुभंगणारा आहे. हे टाळण्यासाठी सैन्यानं किरकुकमध्ये कारवाई केली आहे असं पंतप्रधान अबादी यांनी सांगितलं.

के-1 सैन्याचा तळ, बाबा गुरगुर तेलक्षेत्र, गॅस क्षेत्र आणि सरकारी तेल कंपनीच्या कार्यालयावर सैन्यानं नियंत्रण मिळवलं आहे असं इराक सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किरकुकच्या दिशेने जाणारं इराकचं सैन्य

प्रतिकाराविना किरकुकमधील सैन्यानं माघार पत्करली आहे असं इराकच्या सरकारनं सांगितलं.

मात्र किरकुकच्या दक्षिणेकडच्या भागात दोन्ही सैन्याच्या तुकड्यांमध्ये संघर्ष झाल्याचं वृत्त आहे. बीबीसीच्या कॅमेरामननं एका सुरक्षा चौकीजवळ गोळीबाराचा आवाज ऐकल्याचं कळवलं आहे.

सोमवारी दुपारी दोन्ही सैन्यांकडून होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी हजारो लोक किरकुक सोडून जात असताना इराक सैन्य शहरात दाखल होत होतं.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात इराकचं सैन्य गर्व्हनरच्या कार्यालयात असल्याचं उघड झालं होतं.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार इराक सैन्यानं कुर्द झेंडा काढून घेतल्याचंही स्पष्ट झालं आहे. इराक सैन्य वेगानं दाखल झाल्यानंतर कुर्द नेते आणि सैन्यानं एकमेकांवर धोका दिल्याचा आरोप केला.

कटाचा आरोप

सत्ताधारी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्ष मसूद बर्जानी यांच्या नेतृत्वाखालील पशमर्गा जनरल कमांड या स्वायत्त लष्करांन 'पॅट्रियाटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान' (पीयुके) या पक्षावर कुर्दिस्तानच्या लोकांविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला.

पीयुके पक्षानं या आरोपांचा इन्कार केला आहे. आपलं सैन्य माघारी घेत असल्याचा आरोपही त्यांनी नाकारला आहे. किरकुकच्या लढाईत आमचे अनेक सैनिक मारले गेले आहेत मात्र केडीपीच्या एकाही सैनिकाला काहीही झालेलं नाही, असं त्यांनी म्हंटलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा किरकुकच्या मुद्यावरून इराकचे नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.

दरम्यान तुर्कस्ताननं इराकचं समर्थन केलं आहे. इराकमधून पीकेकेचं अस्तित्व हटवण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची मदत देण्यासाठी तयार असल्याचं तुर्कस्ताननं म्हटलं आहे.

इराकप्रमाणे आपल्या देशातील कुर्द लोकसंख्या स्वतंत्र देशाची मागणी करेल अशी भीती तुर्कस्तानला आहे.

तुर्कस्तानात 1980च्या दशकापासून कुर्द फुटीरतावादी संघटना कार्यरत आहे. पीकेके संघटना फुटीरतावादी असल्याचं युरोपीय देश आणि अमेरिका मानतात.

विवादाचं मूळ काय?

किरकुक इराकमधला तेलसंपन्न प्रदेश आहे. या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी इराक आणि कुर्द सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. या कुर्द बहुल क्षेत्रात मात्र या प्रदेशाच्या राजधानीत अरब आणि तुर्कस्तानच्या वंशाचे नागरिकही राहतात.

कुर्द पशमर्गा संघटनेनं 2014 मध्ये कथित इस्लामिक स्टेटकडून या भागाचा मोठा हिस्सा परत मिळवला. मात्र त्याचवेळी इस्लामिक स्टेटनं उत्तर इराकवरचा बहुतांशी भाग बळकावला.

जनमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर इराकचे पंतप्रधान अबादी यांनी किरकुकसारख्या संवेदनशील भागात सैन्याला पाचारण करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र गेल्याच आठवड्यात संयुक्त सरकारसाठी तयार आहेत. या भागात संघर्ष होऊ नये असं त्यांना वाटतं.

कोण आहेत कुर्द

इराकच्या एकूण लोकसंख्येत 15 ते 20 टक्के कुर्द आहेत. 1991 मध्ये स्वायत्ता मिळवल्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ त्यांना दडपशाहीला सामोरे जावं लागलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)