दिवाळी : भल्या पहाटे गोव्यात होतं अक्राळविक्राळ नरकासुराचं दहन

गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं. Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.

गोवा म्हटलं की आपल्याला ख्रिसमस आठवतो. पण इथल्या दिवाळीचं एक वेगळेपण आहे. इतर राज्यांप्रमाणे दिवाळीत इथं झगमगाट दिसणार नाही. पण उत्तर भारतात दसऱ्याला जसं रावण दहन असतं, त्याचधर्तीवर गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.

गोव्यात दिवाळीचा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'. या दिवशी नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन हा मोठा आकर्षणाचा भाग होऊ लागला आहे.

चौकाचौकात नरकासूर

गोव्यात घराघरात नरक चतुर्दशी पारंपरिक पद्धतीनं साजरी होते. पण गेल्या काही वर्षांत 'नरकासुरानं' या दिवसाला एक वेगळंपण दिलं आहे. इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.

Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासुर दिसतात.

दिवाळीत याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. गोव्यातील संस्कृती आणि संदर्भ बघता या दिवशी मोठ्या अक्राळविक्राळ नरकासुराचं दहन करण्याचा कार्यक्रम थोडा अजब वाटू शकतो.

गोव्यालगतच्या राज्यांत नरकासूर दहनाची परंपरा नाही. पण गोव्यातच नरकासूर दहनाची प्रथा कशी सुरु झाली? याबाबत लोकांना कायम उत्सुकता वाटते.

गोवा मुक्ती संग्रामानंतरची प्रथा?

गोव्यातील लोकसाहित्याचे अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर यांच्यामते गोव्यात नरकासुराच्या प्रतिमेचं दहन करण्याची परंपरा तशी जुनी नाही.

"प्रतिमांच्या दहनाची परंपरा गोवा मुक्ती संग्रामानंतर प्रचलित होऊन अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गोवा अगदी पूर्वीपासून शेतीप्रधान राज्य. याच काळात भाताचं पीक तयार झालेलं असतं. शेतातील कामं संपलेली असतात. त्यामुळं शेतातून भाताचं पीक काढून झालं की उरणारं तण नरकासूर बनवायला वापरलं जायचं."

Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा शेतातून भाताचं पीक काढून झालं कि उरणारं तण नरकासुर बनवायला वापरलं जायचं.

केरकर म्हणतात, "घराघरात नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान झालं की आई सर्वांनां ओवाळायची आणि प्रत्येकाच्या पायाखाली कारिटाचं कडू फळ तुडवायला दिलं जायचं. हेच फळ नरकासुराचं प्रतीक असायचं. त्याला पायाखाली तुडवणं म्हणजे वाईट प्रवृत्तींना नष्ट करणं असा त्याचा अर्थ आहे."

"मग कालांतराने शेतातील तण, घराच्या आजूबाजूचं गवत, सुका पालापाचोळा यापासून नरकासुराचा पुतळा तयार करू लागले. यातूनच सध्या प्रचलित असलेलं महाकाय नरकासुराचं रूप तयार झालं."

"गोव्यातील वाढत गेलेलं पर्यटन आणि खाण व्यवसाय यातून अमाप पैसा हाती आला. त्यातून नरकासुराचं उदात्तीकरण करायला अनेकजण पुढे आले", असं राजेंद्र केरकर यांचं मत आहे.

नरकासुरांना राजकीय आश्रय

हातातली सगळी काम संपवून तरुण मुलं दिवाळीच्या आधी काही दिवसांपासून कागदाचे नरकासूर बनवण्यात दंग असतात. त्यासाठी आजूबाजूच्या घरांतून रद्दीतली वर्तमानपत्रं आणि कागद गोळा केले जातात.

Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा प्रायोजित नरकासुरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

युवा पिढीवर नरकासूर बनवण्याचा वाढता प्रभाव बघून अनेक राजकीय नेतेसुद्धा आता त्यांना आर्थिक सहाय्य देऊ लागले आहेत. त्यामुळं प्रायोजित नरकासुरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

नरकासुरांची स्पर्धा ठेवली जाऊ लागली आहे. आता यात 'डीजे' आणले जातात. पुण्यातील गणपती मिरवणुकीसारखी भली मोठी मिरवणूक प्रत्येक गावातून काढली जाते. फक्त हिंदूच नव्हे तर कॅथलिक आणि आता मुस्लिम मुलंसुद्धा नरकासूर बनवू लागले आहेत.

Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा फक्त हिंदूच नव्हे तर कॅथलिक आणि आता मुस्लिम मुलं देखील नरकासुर बनवू लागले आहेत.

नरकासूर दहन वेगळ्या वळणावर

पण सध्याच्या नरकासूर दहनाविषयी अनेकांचं नकारात्मक मत आहे. याबाबत राजेंद्र केरकर म्हणतात, "नरकासुराच्या निमित्तानं होणारी पैशांची उधळण, दारूचा पुरवठा, डीजेमुळं आलेलं विकृत रूप या सगळ्यानं युवा पिढी बिघडतेय असं अनेकांना वाटतं."

Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा हे महाकाय दिसणारे नरकासुर कागदाचे बनवले जातात. त्यासाठी आजूबाजूच्या घरातून रद्दीतले वर्तमानपत्र, कागद गोळा केले जातात.

"गोव्यातील नरकासूर दहनात निसर्ग स्वच्छ राखला जावा, असा एकेकाळी असलेला उद्देश आता काळाच्या ओघात हरवू लागला आहे. नरकासुराच्या निमित्ताने कचऱ्यात अधिक भर पडते. राजकीय पुढारी या पिढीला हाताशी धरू पाहत आहेत." असा आरोपही ते करतात.

गोमंतकीय दिवाळी फराळ

गोव्यात दिवाळीच्या फराळाची लज्जत काही निराळी असते. इथं फराळाच्या पदार्थांऐवजी शेतातून नुकताच आलेल्या तांदुळाचे पाच प्रकारचे पोहे बनवले जातात. या पोह्यांना इथे 'फोव' म्हणतात.

Image copyright Nihar K
प्रतिमा मथळा सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे पर्यटक देखील मुद्दाम नरकासुर मिरवणूक बघण्यासाठी येत असतात.

पहाटे नरकासुराचं दहन झालं की घरी येऊन अभ्यंग स्नान करून सगळेजण या 'फोव' चा फराळ करतात. गोडाचे फोव (ज्यात गूळ, ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं घातलेलं असतं), तिखशे फोव (यात हिरवी मिरची ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं घातलं जातं), ताकाचे फोव (ताकात कालवलेल्या पोह्यांमध्ये हिरवी मिरची बारीक वाटून, कोथिंबीर घालून तयार केले जातात), कडीचे फोव (म्हणजे सोलकडी करून त्यात कालवलेले पोहे) आणि फोण्णे फोव (फोडणी घालून केलेले पोहे) असे ते प्रकार.

पाकातले फोव, फोंवा खीर, रोसा फोव, फोवा चिवडो या अनेक प्रकारातील किमान पाच प्रकार तरी घराघरात नरक चतुर्दशीला बनवले जातात. वर्षभरात घरात कधी पोहे केले जात नाहीत, पण दिवाळी आणि पोहे हे एक समीकरण आहे. आता सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे पर्यटकसुद्धा मुद्दाम नरकासूर मिरवणूक बघण्यासाठी येत असतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या