पाहा व्हीडिओ : दिल्लीची हवा एवढी प्रदूषित कशी होते?

मंगळवारी दिल्लीच्या हवेत प्रदूषणाचं प्रमाण आणखी घातक झालं आहे. राजधानीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चिंताजनक असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

शहराच्या काही भागात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा दोनशे टक्क्यांनी जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्लीचं धुरकं हे दरवर्षीच्या हिवाळ्याची ओळख आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर उत्तर भारतातील शेतकरी कापणीनंतर शेतात उरलेले बुंधे जाळतात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो.

उत्तरेकडून आणि वायव्येकडून वाहणारे वारे मग हा धूर दिल्लीच्या दिशेने घेऊन येतात. यामुळे आधीच विषारी होत चाललेल्या दिल्लीमध्ये वायू प्रदूषणात आणखीनच भर पडते.

त्यातच वाहनांमधून आणि कारखान्यांमधून निघणार धूर यात मिसळून धोकादायक धुरकं तयार होतं.

हिवाळी वातावरणात अडकून हे धुरकं दिल्लीचा श्वास कोंडत आहे. या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) धोक्याचा इशारा दिलेला असून प्रशासनाने तातडीचं पावलं उचलण्याची गरज आहे. शाळांना सुट्टी देण्यात यावी, आणि काही दिवसांनी आयोजित दिल्ली हाफमॅरेथॉन रद्द करावं, असं IMAने स्पष्ट केलं आहे.

संपूर्ण शहरावर धुरक्याचा दाट पट्टा साचला असून, यामुळे अनेक विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. बहुसंख्य लोकांना डोळे चुरचुरणं, घसा दुखण्याचं तसंच छातीत दुखण्याचा त्रास झाला आहे.

दिवसाला 50 सिगारेट ओढल्यास जेवढं प्रदूषण निर्माण होईल तेवढं प्रदूषण सध्या दिल्लीत आहे, असं एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं.

अॅनिमेशन - निकिता देशपांडे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)