पुरुषांचंही वेगळं #MeToo: मी तिचा छळ टाळू शकलो असतो...

  • दिव्या आर्य
  • बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
व्हीडिओ कॅप्शन,

निर्मात्याकडून हॉलीवूडमध्ये अभिनेत्रींचा लैंगिक छळ?

हॉलीवूड चित्रपट निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि मारहाणीच्या आरोपांनंतर अनेक महिलांनी सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून स्वत:चे अनुभव मांडायला सुरुवात केली. तो #MeToo सोशल मीडियावर अजूनही ट्रेंडिंग आहे.

घराबाहेरच काय तर घरातही आलेले वाईट अनुभव जगभरातल्या महिला शेअर करत आहेत. पण त्रास देणाऱ्या पुरुषांचं काय?

या हॅशटॅग मोहिमेत पुरूष मंडळी काय म्हणत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

प्रथम, पुरूष वाचकांसाठी एक सूचना. मी पुढे जे लिहिलं आहे ते माझं तुम्हाला सांगणं नाही. पुरुषांनी पुरुषांबद्दल मांडलेल्या गोष्टी आहेत. वाचताना मध्येच सोडून जावंसं वाटलं तर तो विचार मनातून काढून टाका आणि शेवटपर्यंत नक्की वाचा.

कॉलेजमध्ये असताना मुलींच्या अंतर्वस्त्रांकडे तुमची नजर गेली होती का? आणि ते पाहून तुम्हाला गंमत वाटली होती का?

फोटो कॅप्शन,

प्रतिकात्मक छायाचित्र

मुलीचा ठाम नकार असताना तुम्ही असभ्य शब्दांत शेरेबाजी करून तिला सतत त्रास दिला आहे का?

बेशरम लंपट म्हणवून घेणं तुम्हाला आवडतं का?

काहीही गरज नसताना आणि समोरच्या महिलेला अवघडलेपण जाणवत असताना तुम्ही कधी तिला स्पर्श केला आहे का?

ट्विटरवर शरीक रफीक यांनी वर विचारलेल्या अवघड प्रश्नांची होकारार्थी उत्तरं दिली आहेत. महिलांसोबत वाईट वागल्याचं त्यांना वाईट वाटतं आहे. आपल्या हातून घोडचूक घडली, याची त्यांना जाणीव आहे.

फोटो कॅप्शन,

शरीक रफीक यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव मांडला.

#MeToo हॅशटॅग वापरून मुलींचं, महिलांचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यायला मी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना काही पुरुषांनीही हे शेअर केल्याचं मला दिसलं.

पण मुली किंवा महिला काय म्हणतात यात मला स्वारस्य नव्हतं. कारण या म्हणण्याला मी कंटाळले होते. त्रासले होते. अनेकदा मला रागही येऊन गेला होता.

आणखी एक हॅशटॅग, महिलांना स्वत:च्या आयुष्याबद्दल बोलण्याची आणखी एक संधी.

फोटो कॅप्शन,

घराबाहेर पडल्यानंतर होणाऱ्या त्रासाबद्दल महिला सोशल मीडियावर बोलू लागल्या आहेत.

याविषयावर आपण सतत बोलतो आहोत. मात्र बधीर कानांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळेच पुरुष मंडळी काय बोलतात, हे मला बघायचं होतं.

घराबाहेर पडल्यानंतर चालताना, फिरताना कसा त्रास होतो. कुठल्या विकृत नजरांना, स्पर्शांना सामोरं जावं लागतं, या नकोशा अनुभवावर बोलायचं धाडस महिलांनी दाखवलं.

पण आम्ही चूक केली. त्रास दिला हे कबुल करण्याचं धैर्य किती पुरुषांकडे आहे.

किती भयंकर त्रास, वेदना दिल्या आहेत, याची त्यांना जाणीव होईल का? आपण किती विकृत वागलोय हे त्यांना समजेल का?

वाईट माणसं वाईट वागताना पाहून त्यांनी डोळे मिटून घेतले तर?

चुकीचं वागलो हे मान्य करणारे शरीक रफीक एकमेव नाहीत. पॉप्युलर कल्चर अर्थात समाजात रूढ झालेल्या गोष्टी योग्य आहेत, हे मानल्यामुळे महिलांना त्रास दिला असं अनेकांनी मान्य केलं आहे.

ओमर अहमद यांनीही ट्वीट करून आपल्या वागण्यातली चूक मान्य केली आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची घटना टाळणं शक्य होतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

फोटो कॅप्शन,

ओमर अहमद यांनीही आपला अनुभव मांडला.

ऑफिसमधल्या सहकारी महिलेने लैंगिक छळ होत असल्याचं ओमार यांना सांगितलं. मात्र छळ करणाऱ्या व्यक्तीची बाजू घेतल्यानं महिला सहकारी नाराज झाली. त्यावेळच्या स्वत:च्या वागण्याचं त्यांना आता वाईट वाटत आहे.

पुरूष सहकाऱ्यानं मैत्रीची मर्यादा ओलांडल्याचं कळलं होतं, मात्र समोर काही घडलं नाही म्हणून त्यावेळी काहीच केलं नाही, ही भावना ओमर यांच्या मनात आहे.

कोट्यवधींच्या प्रकल्पाच्या दृष्टीने हा माणूस महत्त्वाचा असल्यानं तसं वागलो, असंही ओमर यांना वाटतं.

छळ काय, शोषण काय, याचा हा पहिला टप्पा. या त्रासासाठी योग्य ठिकाणी दाद मागणं, हा दुसरा टप्पा.

कारण कधी पैसा महत्त्वाचा असतो, तर कधी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो, आणि कधी करिअरचा प्रश्न आड येतो.

झालेल्या त्रासाविरोधात आवाज उठवणं कधीच सोपं नसतं.

फोटो कॅप्शन,

प्रतिकात्मक चित्र

महिलांचा छळ झाल्याप्रकरणी बोलणाऱ्या पुरुषांवर अन्य पुरूष मंडळी हसतील, याची दाट शक्यता आहे. त्रास झालेल्या महिलांना प्रकरण थंडपणे हाताळून गप्प राहण्याचाच सल्ला पुरूष मंडळी देतात. 'तो फक्त मजा करत होता, थोडी चिल रहा', असंही म्हणत महिलांना गप्प करणारी पुरूष मंडळीही असतेच की.

म्हणूनच #MeTooच्या धर्तीवर पुरुषांनी #SoDoneChilling असा हॅशटॅग टाकून स्वत:च्या चुका कबूल करायला हव्यात.

आणि केवळ लिहून हा विषय सोडून द्यायला नको. आजूबाजूला असणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी त्यांचं ऐकायला हवं.

नशीब म्हणजे मी, म्हणजे एक महिला, हे म्हणत नाही आहे. हे सगळं पुरुषांचं पुरुषांना सांगणं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)