1909 सालच्या पहिल्या दिवाळी अंकातल्या या 10 गोष्टी माहीत आहेत का?

दिवाळी अंक मुखपृष्ठ
प्रतिमा मथळा दिवाळी अंक मुखपृष्ठ

दिवाळीच्या दिवसात जशी घरोघरी खरेदीची यादी तयार होते किंवा फटाके किती आणि कोणते आणायचे, पदार्थ कुठले आणि कसे बनवायचे याची चर्चा होते, तशीच चर्चा अनेक मराठी घरात होते ती म्हणजे दिवाळी अंक कुठले घ्यायचे?

महाराष्ट्राला सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा आहे आणि दिवाळी अंक ही त्यातलीच एक समृद्ध करणारी अनुभूती आहे. मौज, दीपावली, माहेर, हंस, अक्षर असे अनेक दिवाळी अंक अनेकांनी आपल्या पुस्तक खजिन्यात जपून ठेवलेले असतील.

दिवाळीच्या निमित्ताने आज आपण या दिवाळी अंक परंपरेला थोडासा उजाळा देणार आहोत. पण, फ्लॅशबॅकमध्ये जाऊन... म्हणजे ही परंपरा सुरू झाली... 1909मध्ये, त्या काळात आपण जाणार आहोत.

पहिल्या दिवाळी अंकाचा मान जातो मनोरंजन वार्षिकाकडे. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मुंबईतून प्रकाशित केलेला हा अंक आहे. या पहिल्या दिवाळी अंकातल्या काही रंजक गोष्टी इथे मांडत आहोत.

1) जाहिराती

1900चं हे दशक आहे. म्हणजे ब्रँड हा शब्द लोकांना ठाऊकही नव्हता. पण तरीसुद्धा 207 पानांच्या या अंकात तब्बल 129 जाहिराती आहेत. पहिलं पानच मुळी जाहिरातीचं आहे.

जाहिरातीही कसल्या, तर स्वदेशी साखर, नवीन शिलाई मशीन, सर्व तापांवरचे ज्वरबिंदू औषध, शाईचे नाही तर देशी शाईचे कारखानदार(स्वदेशी वस्तूंचा नारा तेव्हापासून होता).

एक जाहिरात रासायनिक प्रक्रियेनं शुद्ध केलेल्या तेलाची आहे. हल्ली घाणीच्या तेलाच्या जाहिराती दिसू लागल्या असताना त्या वेळी नवीन असलेल्या रासायनिक प्रक्रियेचा वापर करून शुद्ध केलेल्या तेलाची जाहिरात विशेष वाटते.

एक जाहिरात आहे ती नाटकी सामान विक्रेत्यांची. त्यांचं नाव आहे 'प्रिन्स ऑफ वेल्स हेअर सलून'. आणि जाहिरात काहीशी अशी आहे,

प्रतिमा मथळा दिवाळी अंकातील जाहीराती

स्त्री व राजे पार्टीचे टोप व पट्ट्या,

ऋषींचे जटांचे टोप व दाढ्या,

रजपूत, मारवाडी दाढ्या,

हाताने हजामत करण्यासाठी सेफ्टी

वगैरे सामान मिळण्याचे ठिकाण.

बरं या सलूनमध्ये विदेशी अत्तरं आणि साबण मिळतात. इथं स्वदेशीची भानगड नाही.

पुण्याच्या सोमवार पेठेत एक गृहस्थ आप्पासाहेब घोरपडे मॅट्रिमोनिअल ब्युरो चालवत होते आणि त्यांनीही 'फक्त लग्न होणाऱ्या मुलं आणि मुलीं'ची जाहिरात दिली आहे.

जाहिरातीतील मजकूर आज वाचला तर थोडासा विनोदी वाटतो. कारण, भाषा सरळ पण, बाळबोध आणि मजकूर शब्दबंबाळ आहे. पण, तेव्हा दिवाळी अंक हे जाहिरातींवर चालत होते.

जाहिरातींमुळे ते स्वस्तात काढणं प्रकाशकांना शक्य होतं होतं. मराठी साहित्याचे अभ्यासक शशिकांत सावंत यांच्याशी याविषयी बोलणं झालं. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील एक चळवळ आहेत.

अगदी सुरुवातीपासून 3000 ते 5000 असा त्यांचा खप होता. एक अंक अनेक जण वाचत असत. या हिशोबाने दिवाळी अंकांचा वाचकवर्ग लाखांमध्ये होता, असं शशिकांत सावंत म्हणाले.

ही चळवळ सुरु रहावी यासाठी जाहिरातदारांनी जाहिराती दिलेल्या असत, असंही सावंत म्हणतात.

या जाहिरातींमध्ये ब्रँडिंग हा प्रकार नव्हता. कारण, ती संकल्पनाच पुढे आली नव्हती. पहिली ब्रँडिंग केलेली जाहिरात पिअर्स साबणाची होती. जी युरोपात 1910मध्ये आली. भारतात त्यानंतर काही दशकांनी आली.

2) महिलांना महत्त्व

महिलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र पुढारलेलाच होता. पहिली मुलींची शाळा ज्योतिबा फुले यांनी इथंच सुरु केली. त्यामुळे मनोरंजन अंकालाही महिलांचं स्थान महत्त्वाचं वाटत होतं यात शंका नाही. प्रत्येक पानावर तळटीप असावी अशी दोन वाक्यं आहेत.

काही ठिकाणी म्हटलं आहे, की पतीने पत्नीला, पित्याने कन्येला, बंधूने भगिनीला अगत्याने मनोरंजन वाचावयास सांगावं. एके ठिकाणी नेपोलियनचे विचार उद्धृत केले आहेत, राष्ट्राची उन्नती व्हावी अशी इच्छा असल्यास स्त्रियांना सुशिक्षित करा. त्यांच्या हाती मनोरंजन द्या.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली तर महिलांविषयीचे लेखन आहे त्याचप्रमाणे महिलांनी केलेलं लिखाण आहे.

इथं करंज्यातला मोदक ही लक्ष्मीबाई टिळकांची कविता आहे. तसंच श्रीमती माणकबाई कोठारे यांनी महिलांना सुखी होण्याचा मंत्र दिला आहे. कुटुंब व्यवस्था कशी असावी आणि त्यात महिलेने इतर सदस्यांना कसं सांभाळून घ्यावं हा त्याचा विषय आहे.

माणकबाईंनी लेखाची सुरुवातच माझ्या भगिनींनो अशी केली आहे. म्हणजे हा लेख महिलेने महिलांसाठी लिहिलेला आहे. महिलांच्या एकीचं महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे.

पूर्वकालीन भारतीय समाजात स्त्री वर्गाची योग्यता असा थेट विषयाला भिडणारा लेख सौ. क्षमाताई राव यांनी लिहिला आहे. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश त्यांनी पहिल्या ओळीपासून दिला आहे.

प्रतिमा मथळा महाराष्ट्र महिला

ज्येष्ठ साहित्यिक, स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि मिळून साऱ्याजणी हे मासिक चालवणाऱ्या विद्या बाळ यांनी या काळाला क्रांतिकारी म्हटलं आहे. त्या म्हणतात, 'दिवाळी अंकांमधून स्त्रियांना प्राधान्य देण्याचा विचार महाराष्ट्रात आधीपासून होत होता.'

1930मध्ये किर्लोस्कर मासिकात स्त्री कर्मचाऱ्यांना नोकरीतही सामावून घेतलं गेलं होतं. पुरुषांकडून स्त्रियांना वाव देण्याचे प्रयत्न त्या काळात होत होते. स्त्री प्रबोधनाबरोबरच त्यांच्या मनोविकास आणि व्यक्तीमत्व विकासावरही भर दिला जात होता.

3) आंतरराष्ट्रीय भान

माहितीच्या देवाण घेवाणीसाठी त्या काळात तेव्हा फारशी साधनंच नव्हती. वर्तमानपत्रं निघाली तरी सर्वदूर पोहोचत नव्हती. आणि तारांखेरीज जलद मार्ग देवाणघेवाणीसाठी नव्हता. कादंबऱ्या आणि पुस्तकांची छपाई वेगाने होत नव्हती.

अशा वेळी कितीसं जागतिक भान त्या काळातल्या शिक्षित लोकांना होतं? असा प्रश्न मनात येत असेल तर हे वाचा... मनोरंजनाच्या 1909च्या दिवाळी अंकात स्पार्टन लोकांमधील स्त्रीशिक्षण, ग्रीसमधील वसाहतवाद, पीतवर्णी चिनी लोक असे विषय होते.

श्रीयुत गोविंद सरदेसाई यांच्या या लेखात जगभरातील लोकसंख्येची वर्णानुसार वर्गवारी अगदी आकड्यात दिलेली आहे. चिनी लोक कुठून आले, कुठल्या परिस्थितीत वसले याची माहिती गुगलपेक्षा मनोरंजनमध्ये जास्त चांगली मिळेल.

4) भाषेतील गंमती

एवढ्यात हा अंक स्वत: वाचण्याची उर्मी तुमच्या मनात जागृत झाली असेल. तर आधी एक काम करा, तुमच्या जवळ मराठी-टू-मराठी शब्दकोश ठेवा. कारण, उद्विज्ज शास्त्रवेत्ता, दिवसाचा जीवन-कलह, बाईलबुद्धे हे शब्द समजावून सांगता येणं कठीण आहे.

अंकातील भाषा अगम्य आहे, असं अजिबात नाही. पण, अलिकडच्या मराठीपेक्षा निश्चित वेगळी आहे. हल्ली इंग्रजी शब्द सर्रास वापरण्याची आपली सवय इथं मारक ठरते. लेखकांचा कल मराठी प्रतिशब्द तयार करण्याकडे आणि तो रुढ करण्याकडे होता.

5) तेव्हाच्या किमती

आपले आजी, आजोबा आपल्याला नेहमी सांगायचे, आमच्या काळात स्वस्ताई होती. अमुक गोष्ट आण्याला मिळायची.

त्या 'आण्याचा' उल्लेख तुम्हाला या अंकात दिसेल. कारण, या दिवाळी अंकाची किंमत एक रुपया आहे. तो पोस्टाने हवा असेल तर तुम्हाला दहा आणे जास्तीचे द्यावे लागतील, टपाल खर्च म्हणून. अलिकडे दिवाळी अंकांची किंमत किमान साठ रुपये तरी आहे.

प्रतिमा मथळा तेव्हाच्या किंमती

207 पानी भरगच्च मजकूर असलेल्या या अंकाची किंमत मात्र एक रुपया. अर्थात 1909चा तो काळ.

तेव्हाच्या कादंबऱ्यांच्या जाहिराती इथं खच्चून आहेत. या कादंबऱ्याही एक किंवा फारतर दोन रुपयांत उपलब्ध होत्या.

गंमत म्हणजे 1947मध्ये भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा एका डॉलरचं रुपयांमध्ये मूल्यही एक रुपया इतकंच होतं.

6) कविता

कविता आणि कादंबऱ्यांच्या प्रकाशनावरुन जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक मजेशीर गोष्ट लक्षात आली.

वर्तमानपत्रं आणि तारा याच काय त्या प्रचलित गोष्टी असे ते दिवस होते. कादंबऱ्या घेऊन वाचणार कोण? त्यामुळे कमी किंमतीत वाचनासाठी भरपूर सारा मजकूर असावा, त्यात बहुविध विषय असावेत यासाठी दिवाळी अंकाची कल्पना निघाली.

त्यामुळे साहित्य छापून आणायचं असेल तर लेखक, साहित्यिकांकडे दिवाळी अंक हेच पहिलं आणि सोपं साधन होतं.

त्यामुळे कित्येक कवी आणि लेखकांनी आपलं साहित्य दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित केलं आहे. सिनेमा जसा ब्लॉकबस्टर व्हावा आणि रातोरात स्टारपण यावं, तसे हे लेखक प्रकाशझोतात आलेले आहेत.

मनोरंजनाच्या पहिल्या अंकातलं उदाहरण आहे प्रसिद्ध निर्सगकवी, ज्यांना आपण बालकवी म्हणून ओळखतो, त्या त्र्यंबक बापूजी ठोंबरेंचं. आनंदी आनंद गडे ही कविता पहिल्यांदा इथं प्रकाशित झालीय. लक्ष्मीबाई टिळक यांना लग्नानंतर ना. वा. टिळक यांनी शिकवलं.

पुढे त्यांना साहित्याचा नाद लागला. त्यांची प्रसिद्ध कविता करंजीतला मोदक ही इथंच प्रकाशित झाली. लक्ष्मीबाईंनी याची नोंद त्यांच्या आत्मचरित्रातही केली आहे.

चुंबी चुंबी बालका

करुनी विविध कौतुका

वत्सलता ह्यदयांतलि

मुद्रांकित होऊ भली

अशीही एक लहान बाळावरची कविता आहे.

7) इतके फोटो कशासाठी?

मासिकांमध्ये अलिकडे आपण फोटो फिचर अनेकदा पाहतो. मनोरंजनाच्या पहिल्या दिवाळी अंकात एकूण 78 चित्रं आहेत. पानच्या पानं फक्त चित्रांनी भरलेली.

लक्षात घ्या, पानांचं सेटिंग म्हणजे ती छापणं त्या काळी अतिशय कठीण होतं. अक्षर जुळणी करुन छपाईचे ते दिवस, ऑफसेट प्रिटिंगही आलेलं नव्हतं.

अशा वेळी चित्र जुळवणं कर्मकठीण काम. पण, मनोरंजनमध्ये शहरातील प्रसिद्ध डॉक्टरपासून ते महिला समानतेसाठी काम करणाऱ्या महिला नेत्या, शिक्षण क्षेत्रात काम करणारे अग्रणी, इतकंच कशाला लोकमान्य टिळक यांचे फोटो आहेत.

प्रतिमा मथळा महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध नट

का? तर दळण वळणाचीही साधनं फारशी नसल्याने लोकांना या व्यक्ती माहीत नसायच्या. अशावेळी छायाचित्रांतून त्यांची ओळख व्हावी ही धडपड. एक चित्र तयार करायला महिने लागयचे. पण, मनोरंजनकडून त्यासाठी खास प्रयत्न होत होते.

8) महाराष्ट्रासाठी कोण होते अस्पृश्य?

समाजातील निरक्षितांच्या सहाय्यासाठी एक चळवळ तेव्हा उभी रहात होती. निरश्रित म्हणजे असे लोक यांना समाज आपलं मानत नाही, मुख्यत: दलित. अशा लोकांसाठी काम करणारे लोकही समाजासाठी अस्पृश्य मानले जायचे.

मनोरंजन मासिकाने पुढे होऊन त्यांच्या कामाला प्रसिद्धी दिली. चळवळ उचलून धरली. त्यांच्या वार्षिक सभेचं मिनिटबरहुकूम वृत्तांकन केलं. चळवळ चालवणाऱ्या लोकांचा मुद्दाम काढून घेतलेला फोटो इथं आहे.

9)समाज प्रतिबिंब

असं म्हणतात समाज प्रवाही असतो. त्याची बदलण्याची तयारी असते. 1900च्या दशकातील मराठी समाज तसा होता असं म्हणावं लागेल. कारण, मनोरंजनाच्या दिवाळी अंकातही समाजोपयोगी बदल घडावेत असाच ध्यास होता.

हिंदूंमधल्या जाती व पोटजाती यावर दिनकर वर्दे यांचा लेख आहे. पण, हेतू जातीपातीचं वारं कमी व्हावं हाच आहे.

शिवाय लोकशिक्षण कसं हवं यावरही विनायक ओक यांचा लेख आहे, जिथे शालेय शिक्षणाचं महत्त्व त्या काळच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न झालाय.

सुधारणा करणार की होऊ देणार या लेखाच्या नावातच सगळं काही आलं. बदल स्वत:पासून सुरु करावा हा संदेश देणारा हा लेख.

10) नाटक/कादंबरी

साहित्य हा तर दिवाळी अंकाचा प्राण. सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे लेखक कवींसाठी दिवाळी अंक हे एक प्रभावी माध्यम.

अगदी सुरुवातीपासून तीन ते पाच हजारांचा खप दिवाळी अंकांना होता असं साहित्याचे अभ्यासक शशिकांत सावंत सांगतात.

व. पु. काळेंसारख्या प्रथितयश लेखकाने आपल्या काही कादंबऱ्या दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रसिद्ध केल्यात. मनोरंजन अंकात 'वधूंची अदलाबदल' असं एक प्रहसन आहे.

प्रतिमा मथळा नाटक

पुढारलेल्या दोन कॉलेज तरुणांमध्ये वधूंवरुन उडालेला गोंधळ अशी विनोदी मांडणी आहे. लेखकाला व्यासपीठ आणि त्याचवेळी नवनवीन विषय आणि जॉनर वाचकांपर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिवाळी अंकांनी केला आहे.

जवळजवळ प्रत्येक कविता ही नवीन आहे. म्हणजे इतर कुठेही प्रकाशित न झालेली आहे.

हा 1909 साली प्रसिद्ध झालेला पहिला दिवाळी अंक शताब्दी वर्षात म्हणजे 2009 मध्ये 'अक्षरधारा'च्या वतीने पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)