प्रेस रिव्ह्यू : ऐन दिवाळीतही महाराष्ट्रात एसटीचा संप सुरूच

एसटी संप सुरूच Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एसटी संप सुरूच

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज तिसरा दिवस; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार हजार कोटींची कर्जमाफी; योगी आदित्यनाथ दिवाळीसाठी अयोध्येत; नोटबंदीचं समर्थन केल्यानं कमल हसन यांनी मागितली माफी.

एसटीचा संप सुरूच

महाराष्ट्र राज्या परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघू शकला नाही.

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटीच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेसह पाच अन्य संघटनांनी हा संप पुकारलेला आहे. या राज्यव्यापी संपाचा गुरुवारी तिसरा दिवस असून दिवाळीनिमित्त घर गाठायला आतूर लाखों प्रवाशांना याची झळ बसत आहे.

या संपात कर्मचारी आणि सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले आहेत. बुधवारी दिवसभरात राज्यात रोजच्या ५७ हजार फेऱ्यांपैकी केवळ सात बस चालविण्यात आल्या.

दोन दिवसांच्या संपामुळे एसटीचे सुमारे ४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे, असं महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

संघटनांनी एक महिन्याआधी या संपाबाबत नोटीस दिली होती, मात्र एसटी प्रशासनाकडून यावर वेळीच तोडगा का काढण्यात आला नाही, असा सवालही लोकसत्ताच्या वृत्तात विचारण्यात आला आहे.

योगी आदित्यनाथ अयोध्येत

अयोध्येकडे आपल्याच देशातील काही लोक शंकेच्या नजरेनं बघत आहेत. अयोध्येविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचं लवकरच निरसन होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. बीबीसी हिंदीने याविषयी वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दिवाळीच्या पुर्वसंध्येला योगी आदित्यनाथ अयोध्येत

दिवाळीच्या एक दिवस आधी आदित्यनाथ अयोध्यात पोहचले. काही दिवसांपूर्वी अयोध्येत रामाची भव्य मूर्ती उभारण्याचा आराखडा त्यांच्या सरकारने मांडला होता.

बुधवारी शरयू नदीच्या किनाऱ्यावर एका हेलीकॉप्टरमधून राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वेषातील व्यक्ती उतरल्या. या व्यक्तींचं स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर रात्री शरयू नदीच्या किनाऱ्यावर 1.75 लाख दिवे उजळण्यात आले. नदी किनाऱ्यावर लाईटींग करण्यात आली.

थायलंड, इंडोनेशिया या देशांत भगवान रामाचं महत्त्व विषद करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्याच देशात काही लोकं रामावर प्रश्न उपस्थित करतात. मी अयोध्यात आलो तरी ते प्रश्न उपस्थित करतात. नाही आलो तरी प्रश्न उपस्थित करतात.

शेतकऱ्यांना चार हजार कोटींची कर्जमाफी

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी ८ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकमतच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात निवडक शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले.

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची नावं आणि त्यांचं किती कर्ज माफ करावयाचं आहे, याची यादी राज्य सरकारकडून दरदिवशी बँकांकडं पाठविली जाणार आहे.

कर्जमाफीचे कुणाचे फॉर्म चुकले असतील तर ते रद्द केले जाणार नाहीत. त्रुटी दूर करून पुन्हा शेतकऱ्यांकडून भरून घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पंतप्रधानांनी नोटाबंदीची चूक कबूल करावी - कमल हसन

नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करण्यात घाई केली. ती माझी चूक होती आणि त्याबद्दल मी माफी मागतो, असं अभिनेता कमल हसन यानी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा त्यांची चूक कबूल करावी, अशी अपेक्षा हसन यांनी व्यक्त केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कमल हसन यांनी पंतप्रधानांना केलं आवाहन

द हिंदूच्या वृत्तानुसार, एका तामिळ मॅगझीनमध्ये लिहिलेल्या लेखात कमल हासन म्हणतात, "पंतप्रधानांनी माफी मागितल्यास मी त्यांना सलाम करेन. चुकांची दुरुस्ती करणं आणि त्यांचा स्वीकार करणं, हे महान नेत्यांचं लक्षण आहे."

"महात्मा गांधींना ते शक्य झालं. हे आजही शक्य आहे. काहीवेळ प्रतिक्षा करूयात."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)