गोठलेल्या अलास्कात मराठी कुटुंबाने साजरी केली अनोखी दिवाळी

दिवाळी, अमेरिका, भारत, Image copyright JR Ancheta
प्रतिमा मथळा दिवाळी कार्यक्रमात नृत्य सादर होताना.

अमेरिकेच्या एका टोकावर आहे अलास्का. अवघी सात भारतीय कुटुंब अलास्कामधल्या फेअरबँक्स शहरात राहतात. शिक्षणासाठी इथं आलेले भारतीय विद्यार्थी स्थानिक नागरिकांच्या साथीने दिवाळीचा उत्सव साजरा करतात. पण सात महिने गोठलेल्या या प्रदेशात दिवाळी साजरी होते तरी कशी? शिवा हुल्लावरद यांनी बीबीसी मराठीसाठी पाठवलेला हा लेख.

ऑक्टोबर उजाडला की अलास्कामध्ये पारा उणे वीसवर जाऊन स्थिरावतो. घराबाहेर पडलं की गुडघाभर बर्फ आम्हाला सदैव साथ देतो.

फेअरबँक्स म्हणजे आमचं शहर अलास्काचा मध्यवर्ती भाग आहे. उत्तर अमेरिकेतलं सगळ्यांत मोठं शिखर माऊंट मॅकिन्ले आणि डेनाली नॅशनल पार्कपासून 200 किलोमीटरवर आमचं शहर आहे.

फेब्रुवारीपर्यंत हवामान उणे 60 होऊन जगणं आणखी कठीण होतं. ध्रुवप्रदेशातल्या अवकाशात होणाऱ्या घर्षणातून नॉर्दन लाईट्सचा मोरपंखी प्रकाश आसमंत भारून राहतो. यामुळे लहान होत जाणारा दिवस आणखी रोमांचक आणि संस्मरणीय होतो.

अलास्कामध्ये मे ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये 24 तास लख्ख सूर्यप्रकाश असतो. आणि सप्टेंबरपासून दिवस लहान व्हायला सुरुवात होते. मग हळूहळू 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र, असं समीकरण होतं.

डिसेंबरमध्ये तर दिवस फक्त तीन तासांपुरता असतो. क्षितिजावर सूर्य हजेरी लावतो आणि अवघ्या तासाभरात मावळतो.

Image copyright JR Ancheta
प्रतिमा मथळा दिवाळी कार्यक्रमातली तरुणाई

1902 पासून तीन सोन्याच्या खाणी फेअरबँक्समध्ये सुरू आहेत. म्हणूनच हे शहर 'गोल्डन हार्ट सिटी' म्हणून ओळखलं जातं.

1880 सालापासून कॅलिफोर्नियाहून अलास्काकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. साठच्या दशकात तेलाचा शोध लागल्यानंतर उत्तरेकडच्या भागातून व्हॅलडेझला तेल वाहून नेण्यासाठी ट्रान्स अलास्का पाईपलाईन उभारण्यात आली. सोबतच लोकसंख्या वाढीचं दुसरं पर्व सुरू झालं.

Image copyright JR ANCHETA
प्रतिमा मथळा बाहेर गोठावणारी थंडी पण भारतीयांनी उत्साहात केली साजरी दिवाळी

फेअरबँक्स शहरात सात भारतीय कुटुंब आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांचा हा कदाचित सगळ्यांत छोटा समूह असावा. यापैकी बरेच जण अलास्का विद्यापीठात काम करतात.

इथली एक योग अकादमी प्रसिद्ध आहे, जिथून अनेकदा सूर्यनमस्काराचे मंत्रोच्चार ऐकू येतात.

मी मूळ कर्नाटकातला तर माझी बायको नीलिमा पुण्याची आहे. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएचडी केल्यानंतर आम्ही दोघं नॅनोटेक्नॉलॉजी प्रोजेक्टसाठी अलास्काला आलो. इथं येण्यापूर्वी आम्ही वॉशिंग्टनला होतो.

जगाचं एक टोक असलेलं फेअरबँक्स शहरात मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी असली तरी इथली सगळी माणसं लोभसवाणी आहेत.

Image copyright JR ancheta
प्रतिमा मथळा ऑक्टोबर उजाडला की अलास्कामध्ये पारा उणे वीसवर जाऊन स्थिरावतो.

फेअरबँक्सचे लोक प्रत्येकवर्षी दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात. भारतीयांसाठी दिवाळीचं महत्त्व त्यांना ठाऊक नाही. दिवाळी कशी साजरी केली जाते याचीही त्यांना कल्पना नाही.

फेअरबँक्सच्या लोकसंख्येत 20 टक्के मूळ रहिवासी आहेत तर बाकीचे सगळे गेल्या शंभर वर्षांत इथे स्थलांतरित झाले आहेत. भारतीय संस्कृती, खाणंपिणं, कपडे आणि योगाबद्दल त्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

Image copyright JR Ancheta
प्रतिमा मथळा दिवाळी कार्यक्रमातली धमाल

इथले बरेच जण भारतात जाऊन आले आहेत आणि आपल्या देशाच्या खंडप्राय रचनेची त्यांना जाणीव आहे.

फेअरबँक्समधले आमचे स्नेही डेव्ह, त्यांची पत्नी मेलिसा आणि मुलगी मेआ काही वर्षांपूर्वी आमच्याबरोबर पुण्यात आले होते. अजूनही या भेटीतला प्रत्येक क्षण त्यांच्या स्मरणात आहे.

पण फेअरबँक्स मध्ये एकही भारतीय स्टोअर नाही. आपल्यासारखा किराणा माल मिळणारी दुकानं नाहीत. भारतीय स्टोअरचं महत्त्व भारताबाहेर राहणाऱ्या कोणालाही विचारा.

पण यामुळे आमचा दिवाळी साजरा करण्याचा उत्साह जराही कमी होत नाही.

फेअरबँक्समध्ये दिवाळीचा जल्लोष विद्यापीठ कॅम्पसमध्ये साजरा होतो. भारताच्या कानाकोपऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे जवळपास 50 विद्यार्थी जगाच्या दुसऱ्या टोकाला येऊन शिकत आहेत, हे कमालच. त्यांची 'नमस्ते इंडिया' नावाची संघटना दिवाळी कार्यक्रमांचं आयोजन करते.

विद्यापीठाच्या बॉलरूममध्ये दिवाळीचा सोहळा रंगतो. जवळपास साडेतीनशे माणसं या कार्यक्रमाला येतात. प्रत्येकी 20 डॉलरला कार्यक्रमाचं तिकीटही असतं आणि महिनाभरापूर्वीच सगळी तिकीटं हातोतात संपतात.

तिकिटाची काही रक्कम गरजूंसाठी काम करणाऱ्या नॅशनल चॅरिटी संस्थेला देण्यात येते. तिकिटांमधून आलेली काही रक्कम विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाते. विविध देशांतून अलास्कात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास, आरोग्य किंवा कोणत्याही आपात्कालीन अडचणीसाठी ही रक्कम वापरली जाते.

पहाटे पाच वाजता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतो. दुपारी बारापर्यंत सगळा ऐवज तयार होतो. मग बॉलरूम सजावटीला सुरुवात होते. विविधरंगी रांगोळ्या, फुलांची आरास, वातावरण प्रकाशमान आणि प्रसन्न करणारी दिव्यांची माळ, असा सगळा साज दिवाळीचा माहोल तयार करतो.

Image copyright JR Ancheta
प्रतिमा मथळा अलास्का दिवाळी कार्यक्रमात तरुणाई नृत्य सादर करताना

अख्खी बॉलरूम दिवाळीमय होते आणि आम्हाला घरची, घरच्यांची आठवण येते. वातावरणात आनंद असला तरी मन हळवं होतं. पहाटे उठून केलेलं अभ्यंगस्नान, प्रसन्न संध्याकाळी होणारं लक्ष्मीपूजन, फटाके आणि चविष्ट फराळ - मायदेशातली दिवाळी आमच्या डोळ्यांसमोर तरळते.

विद्यापीठाचे अधिकारी दिवाळीच्या निमित्ताने जमलेल्या फेअरबँक्स समुदायाचं स्वागत करतात. गणेशवंदन आणि नृत्याने कार्यक्रमाची नांदी होते.

स्थानिक अमेरिकन मंडळीही भारतीय पोशाखात अवतरतात. बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर नाचण्याची तयारी अनेक महिने सुरू असते. माझ्या मुली नीशी आणि इशा त्यांच्या इथल्या मित्रमैत्रिणींसह अनेक वर्षं या कार्यक्रमात परफॉर्म करत आहेत.

आमच्या सोहळ्याला मेजवानीत काय असेल अशी उत्सुकता तुम्हाला असेल ना?

Image copyright JR Ancheta
प्रतिमा मथळा दिवाळी कार्यक्रमादरम्यान भोजन समारंभ

आमचा मेनू बहुढंगी असतो. छोले, मटर पनीर, पोटॅटो करी, चिकन मखनी, पुरी, पुलाव, पकोडा आणि डाळ, असा दणकट आहार असतो. स्वीट डिश म्हणून तोंडाला पाणी सुटेल असं आम्रखंड, बेसन लाडू आणि बर्फी असते.

भारतीय पदार्थ इथल्या मंडळींना प्रचंड आवडतात. त्यांची रेसिपी विचारून ते आम्हाला भंडावून सोडतात.

खाणंपिणं आणि धमाल सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे स्नेहमेळाव्यात वेळ कसा जातो कळतही नाही.

धार्मिक विधी आटोपले की डान्स पार्टीला सुरुवात होते. वय बाजूला सारून सगळी मंडळी थिरकू लागतात. पुढचे अनेक तास कल्ला सुरू राहतो.

Image copyright JR Ancheta
प्रतिमा मथळा अलास्कामधील दिवाळी सोहळा

मंडळी दमली की पार्टी संपते. मग सगळं आवरण्याची गडबड सुरू होते. पाहुणे परतू लागतात. काही तासांचा कार्यक्रम आम्हाला घरची, घरच्यांची, संस्कृतीची आठवण करून देतो. आम्ही भले संख्येने कमी असू पण दिवाळीचा सण जोशात साजरा करतो.

ज्यांना दिवाळी म्हणजे काय ठाऊकही नाही, अशा दोस्तांसमवेत आपला सण साजरा करण्यासारखा आनंद नाही.

या सणाच्या निमित्ताने परिसरातल्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यासमोर आपल्या संस्कृतीची झलक सादर करणं, दिव्यांच्या माध्यमातून प्रकाशाचा संदेश देणं, हीच खरी दिवाळी.

अलास्कन समाजाच्या साथीने सर्वव्यापी ईश्वराची प्रार्थना करतो. आम्हाला बुद्धी दे, आमचं संरक्षण कर, अशी त्याला विनंती करतो. आमच्यासाठी सणांचा हंगाम दिवाळीपासून सुरू होतो आणि थँक्सगिव्हिंग (आप्तेष्टांचे ऋण व्यक्त करण्याचा अमेरिकन सण) आणि ख्रिसमसनिशी संपतो, असं मी माझ्या इथल्या दोस्तांना सांगतो.

भौगौलिकदृष्ट्या आम्ही भारतापासून दूर आहोत. पण फेअरबँक्समध्ये भारतातलं दिवाळी वातावरण आम्ही निर्माण करतो.

अलास्काच्या भूमीपुत्रांसह दिवाळीचा जल्लोष साजरा होत असल्यानं मायदेशात नसण्याची खंत एवढी जाणवत नाही. या दिवाळीची धूम मनात ताजी असतानाच पुढच्या वर्षीच्या दिवाळीची तयारीही सुरू होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)