भारत-चीन तणाव : 1962च्या चीन युद्धातले थरारक अनुभव...

  • रेहान फजल
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी
भारत चीन युद्ध

1962च्या युद्धाच्या वेळी सेकंड लेफ्टनंट असलेले आणि निवृत्तीच्या वेळी ब्रिगेडिअर असलेले अमरजीत बहल 50 वर्षांनंतर युद्धाच्या आठवणींबद्दल फोनवर बोलत होते. त्यांना हुंदके आवरत नव्हते.

बीबीसी हिंदीने अमरजीत बहल यांच्याशी 2012 साली बातचीत केली होती. युद्धाला त्या वर्षी बरोबर 50 वर्षं झाली होती. 62च्या युद्धाची सुरुवात 19 ऑक्टोबरला झाली.

62च्या ऑक्टोबरच्या त्या आठवणी जागवताना अमरजीत बहल यांनी हे थरारक अनुभव ऐकवले.

'खूप खोलवर रुतलेलं ते दु:ख आहे. युद्धकैदी झाल्याचा खेद आहेच, पण चिनी सैनिकांशी चांगल्या प्रकारे मुकाबला करता आला याचा अभिमान आहे.' असं ते सांगतात.

भारत चीन युद्धाला 50 वर्षं झाल्याच्या दिवशी ते बोलत होते. चंदीगढहून बीबीसीशी बोलताना त्यांच्या आवाजातला भारदस्तपणातून लक्षात येत होतं की, सेकंड लेफ्टनंट असताना त्यांच्यात किती जोश असेल!

फोटो कॅप्शन,

अमरजीत बहल सात महिन्यानंतर मायदेशी परतले होते.

वरिष्ठांनी युद्धात भाग घेण्याचा आदेश दिल्यानंतर बगल यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. 17 पॅराशूट फिल्ड रेजिमेंटबरोबर आग्र्यामध्ये कार्यरत असलेले बहल 30 सप्टेंबर 1962 रोजी आग्ऱ्याहून नेफासाठी रवाना झाले.

अनेक चढ-उताराना तोंड दिल्यानंतर तेजपूर येथे थांबल्यानंतर बहल तंगधारला पोहोचले. पण पुढचा काळ किती कसोटीचा असणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती.

19 ऑक्टोबरची ती सकाळ

19 ऑक्टोबरची ती सकाळ बहल अजूनही विसरले नाहीत. एकाएकी चिनी सैनिकांकडून हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर तुफान गोळीबार सुरू झाला. चिनी लोकांच्या रणनीतीपुढे भारत मागे राहिला होता.

संपर्काची सगळी साधनं तुटली होती. आपल्या चाळीस सहकाऱ्यांबरोबर सेकंड लेफ्टनंट बहल यांनी जे धैर्य दाखवलं त्याची दखल अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पुस्तकात घेतली होती.

डकोटा विमानाने सीमेवर असलेल्या सैनिकांसाठी हत्यारं पाठवली जायची. पण घनदाट जंगलामुळे हत्यारं शोधणं अतिशय कठीण होतं. तरीसुद्धा बहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे मोठ्या संख्येनं हत्यारं होती.

19 ऑक्टोबरला सकाळी चार वाजता हल्ल्याला सुरुवात झाली. बहल सांगतात की, नऊ वाजता त्यांना आभाळ फाटल्यासारखं वाटत होतं.

या युद्धात बहल यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले होते. पण विपरित परिस्थितीत कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास तयार असलेल्या सैनिकाप्रमाणे लेफ्टनंट बहल यांनी ब्रँडी लावून जखमी सैनिकांची मलमपट्टी केली.

बहल आणि त्यांचे साथीदार हल्ल्याला उत्तर देत होते, पण त्यांचा कोणाशीच संपर्क होऊ शकला नव्हता.

युद्धकैद्याचे दिवस

शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सेकंड लेफ्टनंट बहल आणि त्यांच्या साथीदारांचा शस्त्रसाठा संपला आणि ते युद्धकैदी झाले.

कोणत्याही सैनिकासाठी ही दुर्दैवी स्थिती आहे. पण बहल यांच्या मते, कोणताही साथीदार मागे हटला नाही. या एका गोष्टीचा त्यांना आजही अभिमान आहे. त्याच वेळी अनेक भारतीय अधिकारी आणि सैनिक तिथून दूर होत होते.

चिनी सैनिकानी ब्रिगेडिअर बहल यांचं पिस्तूल हिसकावून घेतलं. त्यांच्या साथीदारांची हत्यारंसुद्धा जप्त करण्यात आली होती. चार दिवसांनंतर बहल आणि त्यांच्या साथीदारांना शेन ई इथल्या युद्धकैदी शिबिरात पाठवलं.

या शिबिरात 500 युद्धकैदी होते. त्यावेळचे सेकंड लेफ्टनंट असलेले बहल सांगतात, "कॅप्टन आणि लेफ्टनंट एकत्र होतो. आम्ही आपसांत बातचीत करायचो. आम्ही जेवणाच्या वेळी भेटायचो तेव्हासुद्धा आम्ही आमच्या शिपायांशी बोलत असू. कारण आमच्यासाठी तेच जेवण बनवायचे."

"पण मेजर आणि लेफ्टनंट कर्नल यांना वेगळं ठेवलं जायचं आणि त्यांना बाहेर निघण्याची मुभा नव्हती. मेजर डालवी कुठेतरी दूर एकटे राहायचे. त्यांची स्थिती तर फारच कठीण होती", बहल सांगतात.

भारतीय जवानांचं स्वयंपाकघरात असणं फायदेशीर होतं. या जवानांमुळे बहल यांना सकाळी सकाळी ब्लॅक टी (बिना दूध-साखरेचा) मिळायचा. पण जेवणात त्यांना पोळी, भात आणि मुळ्याची भाजी मिळत असे. सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणातही हेच पदार्थ असत.

एका बाजूला कडक शिस्त, मारहाण, कैद्यासारखी वागणूक आणि दुसऱ्या बाजूला शिबिरात गाणं-बिणं आणि 'हिंदी चीनी भाई भाई'च्या घोषणा असत.

एकेकाळी भारत आणि चीनच्या मैत्रीचं प्रतीक असलेलं हे गाणं बहल यांच्यासाठी एक मोठी अडचण झाली होती.

ते सांगतात, "गुंज रहा है चारो ओर, हिंदी चिनी भाई भाई' हे गाणं सतत वाजायचं. हे ऐकून आमचे कान किटले होते. कारण त्यामुळे संबंधांमध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती."

युद्धकैदी म्हणून सैनिकांबरोबर सक्ती होत असे. कधी कधी मारहाण होत असे. ब्रिगेडिअर बहल यांच्याबरोबरसुद्धा असं झालं होतं. पण त्यावेळी मी तरुण होतो आणि त्यामुळे हे फार गांभीर्यानं घेतलं नाही, असं ते सांगतात.

चिनी सैनिक अधिकारी अनुवादकांच्या मदतीने भारतीय युद्धबंदींबरोबर बोलायचे. भारत अमेरिकेच्या हातचं प्यादं आहे असं चिनी लोक बिंबवण्याचा प्रयत्न करायचे. भारतीय कैद्यांना ही गोष्ट मान्य करायला लावायचे.

युद्धकैदी असतांना पळून जायचा प्रयत्न करणं हेसुद्धा एक काम होतं. बहल यांच्या डोक्यातसुद्धा अशी कल्पना होती. बहल आणि त्यांचे दोन साथीदार आजारी असण्याचा बहाणा करून औषधं गोळा करत. जेणेकरून पळून गेल्यावर ती कामात येतील.

आसपासचं वातावरण चांगलं होण्याची ते वाट बघत होते. पण त्याआधी त्यांना सोडून देण्यात आलं.

आपल्या लोकांची भेट..

"जेव्हा आम्हाला सोडण्याची घोषणा झाली तेव्हा इतका आनंद झाला होता की, वेळ जाता जात नव्हता. पुढचे 20 दिवस 20 वर्षांसारखे वाटत होते. आम्हाला गुमला इथे सोडण्यात आले. आम्ही भारतभूमीला वंदन केलं आणि म्हटलं, "मातृभूमी ये देवतुल्य ये भारत भूमी हमारी"

या दरम्यान रेडक्रॉसच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांना सूचना मिळाली होती की, ते युद्धकैदी झालेले आहेत.

पण त्याआधीच लष्कर मुख्यालयाकडून घरी टेलिग्राम गेला, "सेकंड लेफ्टनंट बहल बेपत्ता आहेत आणि त्यांचा मृत्यू झाला असं मानलं जात आहे."

बहल सुटकेच्या दिवशीचं वर्णन करताना अगदी गदगदून जातात. "मी अतिशय भावूक झालो होतो. एका युद्धकैद्यालाच मायदेशी परत येण्याच्या आनंदाची कल्पना येऊ शकेल."

अमृततुल्य चहा..

अमरजीत बहल तब्बल सात महिन्यानंतर चिनी युद्धकैदी शिबिरातून मायदेशी परतले.

बहल यांच्या मते, भारतात आल्यानंतर त्यांना आनंद झाला तो सगळ्यात चांगला चहा मिळण्याचा. त्यांच्या चहात दूध आणि साखर होती आणि तो चहा अमृततुल्य वाटला त्यांना.

त्यानंतर बहल आणि त्यांच्या साथीदारांना डी- ब्रिफिंगसाठी (युद्धकैदी म्हणून सुटून मायदेशी आल्यावर केली जाणारी चौकशी) रांचीला नेलं.

तिथे बहल यांना तीन दिवस ठेवलं. यानंतर त्यांना ऑल क्लिअर मिळालं आणि त्यानंतर ते सुटीवर जाऊ शकले. यथावकाश ते आपल्या रेजिमेंटमध्ये परत गेले.

निवृत्त ब्रिगेडिअर बहल यांना युद्धकैदी म्हणून पकडले गेलो म्हणून वाईट वाटत नाही. कारण ते असं मानतात की, हा त्यांच्यासाठी कडू-गोड अनुभव होता. गोड यासाठी की, एक तरुण अधिकारी म्हणून त्यांना युद्धात सहभागी होता आलं, ते जखमी झाले आणि युद्धकैदीही झाले.

युद्धकैदी बनल्याचा हा अनुभव त्यांच्यासाठी कडवट ठरला. कारण ते सांगतात की, ते जर कैदी झाले नसते तर आणखी एक लढाई लढले असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)