प्रेस रिव्ह्यू : हायकोर्टाच्या आदेशआनंतर अखेर एस.टी.चा संप मागे

एसटी बस Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एसटी संघटनेचा संप बेकायदेशीर असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं नोंदवल्यावर हा संप मागे घेण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. संप बेकायदेशीर असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं नोंदवल्यावर हा संप मागे घेण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तानुसार, हा संप बेकायदेशीर असून कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. कोर्टाच्या आदेशानंतर एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती.

या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचं पालन करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संप मागे घेतल्याचं प्रसिद्धी पत्रकही संघटनेनं प्रसिद्ध केलं. ऐन दिवाळीच्या तोंडावर एस.टी.चा संप सुरू झाल्याने नागरिकांचे गेले चार दिवस चांगलेच हाल झाले होते.

सरकारच्या सूचनेनुसारच अफजल गुरुचा दयाअर्ज फेटाळला - प्रणब मुखर्जी

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, संसदेवरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अफजल गुरूचा अर्ज सरकारच्या सूचनेमुळे फेटाळला; असं विधान माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 'संसद सदस्यांनी भारतीय दंड विधानात सुधारणा सुचवून मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली पाहिजे', असं मत प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केलं.

मुखर्जी यांचा मृत्युदंडाच्या शिक्षेला पहिल्यापासूनच विरोध आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, "संसद सदस्यांनी भारतीय दंड विधानात सुधारणा सुचवून मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली पाहिजे."

2012 ते 2017 या मुखर्जी यांच्या कार्यकाळात त्यांनी 30 जणांचे दयेचे अर्ज फेटाळले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीत फटाके फोडण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. मात्र, यामुळे दिल्लीतील प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाही.

दिल्लीत यंदा फटाके कमी, मात्र प्रदूषण पातळी घातक

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीत फटाके फोडण्याचं प्रमाण कमालीचं घटलं आहे. मात्र, यामुळे दिल्लीतील प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाही.

प्रदूषणाची नियमित मोजदाद करणारा केंद्र सरकारचा प्रकल्प 'सफर'च्या संकेतस्थळानुसार, दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सध्या घातक म्हणजे मानवी आरोग्याच्या दृष्टीनं सर्वाधिक संवेदनशील पातळीवर पोहचली आहे.

त्यामुळे दिल्लीत फटाके जरी कमी फुटत असले तरी हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तब्बल 12 वर्षानंतर बोफोर्स प्रकरणी ज्यांना क्लिन चिट मिळाली आहे, त्यांच्या विरोधात सीबीआय पुन्हा आपली बाजू मांडणार आहे.

बोफोर्सचं भूत पुन्हा अवतरणार?

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, तब्बल 12 वर्षानंतर बोफोर्स प्रकरणी ज्यांना क्लिन चिट मिळाली आहे, त्यांच्या विरोधात सीबीआय पुन्हा आपली बाजू मांडणार आहे.

बोफोर्स प्रकरणी हिंदुजा बंधूंना 12 वर्षापूर्वी दिल्ली हायकोर्टाकडून क्लिन चीट मिळाली होती. मात्र, त्यांच्याविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय सीबीआयनं केला आहे.

यासाठी सुप्रिम कोर्टात आपली बाजू मांडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सीबीआय केंद्र सरकारकडे करणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)