प्रेस रिव्ह्यू - राहुल गांधीची 'टिवटिव' वेब रोबोच्या हाती?

राहुल गांधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हे वेब रोबोटसदृश ऑटोमॅटीक रिप्लाय देणाऱ्या यंत्रणेद्वारे नियंत्रित होत असल्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हे 'बॉट्स'कडून म्हणजेच वेब रोबोसदृश ऑटोमॅटीक रिप्लाय देणाऱ्या यंत्रणेद्वारे नियंत्रित होत असण्याची शक्यता आहे.

हे बॉट्स प्रत्यक्ष ट्वीट करत नसले तरी रिट्वीट करतात. एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटर अॅनालीसिसमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. Office of RG या राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलवरच्या रिट्वीटचं हे विश्लेषण आहे.

राहुल गांधी यांची रिट्वीट्स खोटी असल्याचं या विश्लेषणात म्हटलं आहे. कझाकिस्तान, इंडोनेशिया अशा शहरांमधून हे बॉट्स नियंत्रित करण्यात येत असल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.

अर्थात अशा प्रकारचं ट्विटर विश्लेषण प्रथमच येत आहे, असं नाही. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर लोकप्रियतेच्या विश्लेषणातही असे काही संशय असल्याचं, आऊटलुकनं आपल्या बातमीच म्हटलं आहे.

या संदर्भातल्या बातम्या कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

Image copyright TWITTER

रिट्वीट करताना भाजपशी संबंधित किंवा भाजपला वादात ओढू शकणारे मुद्दे या बॉट्सकडून रिट्वीट केले जात असण्याची शक्यता आहे, असं एएनआयनं दिलेल्या बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

IS च्या ताब्यातील भारतीयांना ओळखण्यासाठी डीएनए चाचणी

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील 39 भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या डीएनएचे नमुने गोळे केले जाणार आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इराक आणि सीरियात IS म्हणजेच कथित इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील 39 भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने गोळे केले जाणार आहेत.

भारताच्या परराष्ट्र खात्याकडून हे नमुने गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मोसूल इथे तीन वर्षांपूर्वी या भारतीयांना ISनं पकडले गेल्याची शक्यता आहे.

हे डीएनएचे नमुने इराक आणि सीरियात पाठवले जाणार आहेत. या देशांतून ISची पिछेहाट झाल्यानंतर तिथे IS च्या ताब्यात असलेले नागरिक आणि सापडलेले मृतदेह यांच्या नमुन्यांची पडताळणी केली जाणार आहे.

आतंरजातीय विवाह करणाऱ्यांना मिळणार 3 लाख

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आता तीन लाखांचा मदत निधी मिळणार आहे.

सकाळमधील वृत्तानुसार, राज्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आता तीन लाखांचा मदत निधी मिळणार आहे.

त्यासाठी सरकारतर्फे ५० हजाराचं अनुदान दिले जाणार असून आंबेडकर फाउंडेशनतर्फे अडीच लाख असे एकूण तीन लाख रुपये मदत निधी मिळणार आहे.

त्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात (कोर्ट मॅरेज) विवाह करणं ही एक अट आहे. तसंच अनुसूचित जातीतील मुलगा किंवा मुलीने बाह्यजातीतील मुलाशी किंवा मुलीशी विवाह करण्याची अट आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या