झारखंड 'भूकबळी' प्रकरण : चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण?

कोयली देवी Image copyright DHIRAJ
प्रतिमा मथळा संतोषी आणि तिच्या कुटुंबाला रेशन मिळालेलं नाही. असं झारखंड सरकारच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील संतोषी कुमारी या चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी झारखंड सरकारनं तपास पूर्ण केला आहे.

फेब्रुवारीनंतर संतोषी आणि तिच्या कुटुंबाला रेशन मिळालेलं नाही, असा उल्लेख या तपासाच्या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, या अहवालात संतोषीचा मृत्यू अन्न न मिळाल्याने नव्हे तर मलेरियामुळे झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सिमडेगाच्या उपायुक्तांना या प्रकरणी तपासाचे आदेश दिले होते.

झारखंड सरकारनं हा तपास अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हा अहवाल केंद्र सरकारला मिळाला असून केंद्राच्या पथकानं झारखंडमध्ये पोहोचून स्वतंत्र तपासाला सुरुवात केली आहे.

या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना गावकऱ्यांनी संतोषीच्या घरावर शुक्रवारी रात्री हल्ला केला. या प्रकरणात गावाची बदनामी झाल्यामुळे गावकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

जबाबदार कोण?

या घटनेची माहिती मिळताच सिमडेगाच्या उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना गावात पाठवून या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे.

Image copyright RAVI PRAKSH
प्रतिमा मथळा झारखंड सरकारच्या अहवालात संतोषीचा मृत्यू अन्न न मिळाल्याने नव्हे तर मलेरियामुळे झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

संतोषी कुमारीच्या कुटुंबीयांना रेशन न मिळण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान म्हणाले, "आम्ही लाखो-करोडो रूपयांची सबसिडी अन्नपदार्थांवर देतो."

"तरीही एखाद्या कुटुंबास रेशन मिळत नाही तर ही दुखद बाब आहे. या घटनेचा पूर्ण तपास करण्यात येईल आणि संतोषीच्या कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द होण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तपासलं जाईल", असं पासवान म्हणाले.

दरम्यान, आधार कार्डाची निर्मिती करणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांड्ये यांनी सांगितलं की, संतोषीला 2013 मध्येच आधार कार्ड देण्यात आलं होतं.

त्यांनी या वेळी सांगितलं की, "आधार कायद्याच्या 7 व्या कलमानुसार, एखाद्याकडे आधार क्रमांक नसला तरी त्याला सरकारी योजनेचा लाभ घेण्यावाचून रोखलं जाऊ शकत नाही."

Image copyright RAVI PRAKSH
प्रतिमा मथळा आपली मोठी मुलगी गुडियासोबत कोयली देवी

"संतोषीचं गाव कारीमाटी इथे जाऊन स्वतः या प्रकरणाचा तपास केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाला अहवाल सादर केला असून काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस केली आहे," असं सिमडेगा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मंजुनाथ भजंत्री यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

मलेरियामुळे झाला मृत्यू

मंजुनाथ भजंत्री पुढे म्हणाले, "मी कारीमाटी गावात जाऊन अनेकांशी बोलून आलो आहे. इथल्या एका नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशनरनं संतोषीच्या रक्ताचे नमुने तपासले होते. त्यात पीएस फर्स्ट आढळलं होतं."

"तसंच 13 ऑक्टोबरला संतोषीची आई कोयली देवी याच डॉक्टरांकडे आली होती. तेव्हा त्यांच्या रक्तातही पीव्ही पॉझिटीव्ह आढळलं होतं. त्यामुळे संतोषीचा मृत्यू मलेरियानं झाला हे स्पष्ट आहे."

संतोषीचा मृत्यू अन्न न मिळाल्यानं झाला हा अपप्रचार आहे, असंही ते म्हणाले.

"फेब्रुवारीमध्ये संतोषीच्या कुटुंबाकडे 'आधार'ची झेरॉक्स रेशन कार्डाला लिंक करण्यासाठी मागितली होती. मात्र, त्यांनी आधारची झेरॉक्स आणून दिली नाही."

"त्यामुळे संतोषीच्या कुटुंबीयांनी दोन-दोन रेशन कार्ड बनवली असावीत, अशी आम्हाला शंका आली. त्यामुळे त्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलं." असंही भजंत्री यांनी सांगितलं.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ज्यां द्रेज यांनी सांगितलं की, "झारखंडमधील 80 टक्के रेशन दुकानांमध्ये आधार कार्डवर आधारित रेशन वितरण व्यवस्था लागू केली आहे."

"याचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. गावागावात इंटरनेट पोहोचलं नसल्यानं देखील रेशन वितरण व्यवस्थेत अडचणी आल्या आहेत. तसंच अनेकांच्या परिवारातील कुटुंब प्रमुखांचा अंगठा बायोमेट्रीक सिस्टममध्ये स्कॅन होत नसल्यानंही समस्या उद्धवत आहेत", असं द्रेज म्हणाले.

Image copyright RAVI PRAKSH
प्रतिमा मथळा संतोषीच्या मृत्यूनंतर झारखंडमध्ये विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या सरकारला जबाबदार धरलं आहे.

संतोषीच्या मृत्यूनंतर मात्र झारखंडमध्ये राजकारणाला ऊत आला आहे. विरोधी पक्षांनी याप्रकरणी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या सरकारला जबाबदार धरलं आहे.

राजकीय भूकंप

झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी कारीमाटी गावात जाऊन संतोषीच्या आईची विचारपूस केली.

त्यांनी कोयली देवींना एक क्विंटल तांदूळ आणि आठ हजार रुपयांची मदत केली.

यावेळी बीबीसीशी बोलताना मरांडी म्हणाले की, "झारखंडमध्ये 11 लाखांहून अधिक रेशन कार्ड रद्द केली आहेत. यातील बहुतांश रेशन कार्ड ही गरिबांची आहेत."

"अडीच लाखांच्या आसपास वृद्धांना मिळणारं पेन्शनही बंद करण्यात आलं आहे. यामुळेच लोक भुकेने मरत आहेत. संतोषी आठ दिवस उपाशी होती आणि फक्त पाणी पिऊन जगत होती."

"अखेर तिचा तिच्या आईच्या देखत मृत्यू झाला, ही लाजिरवाणी बाब आहे."

Image copyright RAVI PRAKSH
प्रतिमा मथळा कोयली देवी यांच्या घरात झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख बाबूलाल मरांडी

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी रांचीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा सीबीआयद्वारे तपास केला जावा, अशी मागणी केली आहे.

सीबीआय तपासाची मागणी

सरकारच्या अहवालावर आमचा विश्वास नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंह यांनी सांगितलं की, सरकारने या मृत्यूची जबाबदारी घेऊन दोषींवर कारवाई केली पाहिजे. मात्र, भाजपनं सरकारवर लागलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे.

भाजपचे नेते दीपक प्रकाश यांनी एक पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांकडून या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचं सांगितलं.

या आरोप-प्रत्यारोपानंतर कोयली देवींचा आरोपच लक्षात राहण्यासारखा असल्याचं दिसतं. दहा वर्षीय संतोषी कुमारीचा मृत्यू 28 सप्टेंबरला झाला होता. त्यानंतर कोयली देवींनीच हा आरोप केला. की,

"संतोषीचा मृत्यू भूकेनंच झाला. ती भात-भात करून गेली."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)