दृष्टिकोन : गुजरातमध्ये ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांचा काँग्रेसला 'हात'

अल्पेष ठाकोर आणि राहुल गांधी Image copyright AICC
प्रतिमा मथळा अल्पेश ठाकोर आणि राहुल गांधी

गुजरात निवडणुकीआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी योग्य खेळी करण्यास सुरुवात केली आहे असं दिसत आहे.

गुजरातमध्ये ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांची गुजरातमध्ये शक्ती निश्चितचं वाढली आहे.

सोमवारी राहुल गांधी आणि ठाकोर एकत्रितरित्या सभा घेणार आहेत.

गेल्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पण यावेळी भाजपच्या मनसुब्यांवर अल्पेश ठाकोर पाणी तर फिरवणार नाहीत ना?

कोण आहेत अल्पेश ठाकोर?

राजकीय तज्ज्ञांच्या मते गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास 70 मतदारसंघांमध्ये ओबीसी समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अल्पेश यांचे वडील एकेकाळी भाजपमध्ये होते. गेल्या काही दिवसांमध्ये अल्पेश यांच्या जनाधारामध्ये कमालीची वाढ झाली आहे.

गुजरातमध्ये असणारी दारुबंदी ही केवळ नावापुरती असून सरकारनं आणखी कठोर कायदे करणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा अल्पेश ठाकोर

त्यांच्या आंदोलनानंतर सरकारला या दारूबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून नियम कठोर बनवावे लागले होते.

अल्पेश यांनी ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कासाठी एकता मंचाची स्थापना केली आहे. त्याद्वारे आपण लाखो लोकांसोबत जोडलो गेलो आहेत असा दावा ते करतात.

गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी बेरोजगारांचे प्रश्न, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडून चळवळ उभी केली. त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक सभा आणि मोर्चांचं आयोजन केलं होतं.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मी भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी लढत आहे. माझा लढा बेरोजगारीविरोधात आहे. राहुल गांधी आणि माझे विचार समान आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी आणि अल्पेश ठाकोर

गुजरातला प्रामाणिक सरकारची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हंटलं आहे.

सोमवारच्या सभेत नव्या सरकारच्या स्थापनेच्या प्रयत्नांचा आम्ही शुभारंभ करणार आहोत असं ते म्हणाले.

मतदान केंद्रावर आमची काय रणनीती असेल याची देखील आम्ही आखणी केली आहे असे ते म्हणाले.

हार्दिक पटेल यांचे दोन सहकारी रेश्मा पटेल आणि वरुण पटेल यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर रेश्मा पटेल म्हणाल्या, "भाजपनं आमच्या बहुसंख्य मागण्या मान्य केल्या आहेत. मग, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची आवश्यकता काय?"

रेश्मा आणि वरुण यांच्या भाजप प्रवेशबद्दल हार्दिक पटेल यांनी ट्वीट केलं आहे.

"लोक माझ्या बरोबर आहेत आणि मी त्यांच्यासाठी सतत लढत राहीन" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे

दरम्यान, दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना देखील काँग्रेसनं आपल्यासोबत येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

बीबीसीशी बोलताना मेवाणी म्हणाले, "भाजपला हरवणे माझे उद्दिष्ट आहे. काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय अद्याप आपण घेतला नाही."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)