गुजरात निवडणूक : मागण्या मान्य करेल त्या पक्षाबरोबर जाणार : हार्दिक पटेल

पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल

पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी रविवारी गोध्र्यातील मुस्लीम समाजातील नेत्यांची भेट घेतली. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने बातमी दिली आहे.

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत.

हार्दिक पटेल यांचे दोन सहकारी भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना पटेल यांनी ट्वीट केले की "माझ्यासोबत जनता आहे. मी जनतेच्या भल्यासाठी काम करत राहील."

पुढे ते म्हणाले, " मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत जाणार नाही. माझ्या तीन मागण्या आहेत. पाटीदार समाजाला आरक्षण, युवकांना नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी.

जो पक्ष या तीन मागण्या मान्य करेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ," असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

महाराष्ट्रात गोवा अवतरणार?

Image copyright SAJJAD HUSSAIN/getty images
प्रतिमा मथळा गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बीचेसचा विकास करण्याचा शासनाचा मानस आहे.

गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील बीचेसचा विकास करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. महाराष्ट्राला 720 किमीची समुद्री किनारपट्टी लाभलेली आहे.

या किनारपट्टीचा उपयोग महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. कोकणातल्या बीचेसवर छोट्या हॉटेल्सना परवानगी मिळेल.

त्या ठिकाणी मद्यपानाचीही व्यवस्था असेल आणि सीफूडचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल, असं या बातमीत म्हटलं आहे. ही हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 11.30 पर्यंत चालतील.

ही हॉटेल्स कशी चालवायची त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने अनेक सूचना दिल्या आहेत. किनाऱ्यांवर जागोजागी सीसीटीव्ही बसवले जातील, अशी माहितीही टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत दिली आहे.

माझी हकालपट्टी होणार : सायरस मिस्त्रींनी पत्नीला केला होता मेसेज

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सायरस मिस्त्री

सायरस मिस्त्रींना गेल्या वर्षी टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून काढून टाकण्यात आलं होतं.

24 ऑक्टोबर 2016 ला टाटा सन्सची बैठक सुरू होण्याआधी त्यांनी आपल्या पत्नीला टेक्स्ट मेसेज केला होता, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्स आणि टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

मिस्त्री यांचे माजी सहकारी निर्मलय कुमार यांनी त्यांच्या ब्लॉगमधून या टेक्स्ट मेसेजविषयी माहिती दिल्याचं वृत्त आहे.

मिस्त्री हे 2 वाजता बैठकीला हजर राहणार होते. त्याआधीच त्यांनी आपल्या पत्नीला मेसेज केला होता.

कुमार हे त्यावेळी टाटा समूहाचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते. मिस्त्री यांना काढून टाकण्याचा निर्णय चांगल्या प्रकारे हाताळता आला असता.

त्यांचा अपमान करण्याची काही गरज नव्हती असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. निर्मल कुमार हे सध्या सिंगापूर विद्यापीठमध्ये प्राध्यापक आहेत.

युनायटेड ब्र्युअरीजच्या संचालकपदावरून विजय मल्ल्या पायउतार होणार

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विजय मल्ल्या

भारतीय स्टेट बॅंक आणि समूहाचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेले उद्योजक विजय मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सेबीने त्यांना युनायटेड ब्र्युअरीजच्या संचालकपदावरून पायउतार व्हा असा आदेश दिला होता.

या आदेशाकडे त्यांनी काणाडोळा केला होता पण आता संचालक मंडळाने दबाव आल्यानंतर ते आपले संचालकपद सोडणार आहेत, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

त्यांच्या जागी कोण संचालक होईल याचा निर्णय अद्याप जाहीर झाला नसल्याचे इकॉनॉमिक टाइम्सनं म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)