राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांमागचं 'राज'कारण : काय म्हणतात व्यंगचित्रकार?

राज ठाकरे व्यंगचित्र Image copyright RajThackeray / Facebook

मनसेचे मुंबईतले 6 नगरसेवक पक्ष सोडून गेले असताना आणि मनसैनिकांचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरू असतानाच राज ठाकरेंनी ऐन दिवाळीत एक कार्टून प्रसिद्ध केलं.

अलीकडच्या काळातलं त्यांनी काढलेलं हे सहावं कार्टून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी आहे. हे कार्टून राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे.

राज ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही, अशी तक्रार मनसे सोडून गेलेले नेते करत असतानाच आता कार्टूनच्या माध्यमातून राज लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळ ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रांची महत्त्वाची भूमिका होती.

त्या व्यंगचित्रांशी या व्यंगचित्रांची तुलना करता येईल का? व्यंगचित्रकार म्हणून राज कसे आहेत? त्यांच्या व्यंगचित्रांतील रेषा काय सांगतात? व्यंगचित्रकार राज ठाकरे रेखाटण्याचा प्रयत्न काही नामवंत व्यंगचित्रकारांच्या शब्दांत.

'परिपक्व कलाकार'

"कलाकार म्हणून राज ठाकरे परिपक्व आहेत. राजकारणी राज ठाकरेंपेक्षा व्यंगचित्रकार राज ठाकरे अधिक भावतात," अशी प्रतिक्रिया बीबीसीचे व्यंगचित्रकार कीर्तीश यांनी दिली.

व्यंगचित्रकार मंजुल म्हणतात, "कुणाही उदयोन्मुख व्यंगचित्रकाराला प्रेरित करतील, अशी त्यांची व्यंगचित्रं आहेत. मध्यंतरीचा बराच काळ त्यांनी व्यंगचित्रं काढली नव्हती. व्यंगचित्र काढण्यासाठी बराच वेळ ही द्यावा लागतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे."

Image copyright RajThackeray / Facebook

तर राजकीय व्यंगचित्राला आवश्यक गुण राज यांच्याकडे आहेत, असं मत व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचं आहे.

'बाळासाहेबांचा प्रभाव'

राज यांच्या व्यंगचित्रांवर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे, असं मत या तिघांचं आहे. कुलकर्णी म्हणतात, "बाळसाहेब ठाकरे यांना व्यंगचित्र काढताना आणि राजकारण करताना राज यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्यांना व्यंगचित्रांचं 'बाळ'कडू मिळालं आहे."

कुलकर्णी आणि कीर्तीश यांच्या मते राज यांची व्यंगचित्रं आर. के. लक्ष्मण यांच्या जवळ जाणारी आहेत.

Image copyright Raj Thackeray
प्रतिमा मथळा मोदी आणि अमित शाहांविषयी राज ठाकरेंचे अनेक कार्टून आहेत.

"अर्कचित्रांमध्येही राज यांचा हातखंडा आहे. राजकीय व्यंगचित्र काढताना वेगवेगळ्या नेत्यांचे चेहरे वेगवेगळ्या भावनांसकट वेगवेगळ्या कोनातून दाखवावे लागतात," असं कुलकर्णी म्हणाले.

"बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यात मास्टर होते. राजसुद्धा त्याच वाटेवरून जात आहेत."

रेषा आणि कंपोझिशन

राज यांच्या व्यगंचित्रांतील रेषा आणि कंपोझिशनची तिन्ही व्यंगचित्रकारांनी प्रशंसा केली आहे.

"राज ठाकरे यांची व्यंगचित्रं जुन्या शैलीची आहेत. आजही ते हातानं व्यंगचित्रं रेखाटतात. क्राफ्ट आणि कंपोझिशन म्हणून ही व्यंगचित्रं उत्तम आहेत," असे मंजुल म्हणाले.

"रेषा आणि कंपोझिशन यांचं संतुलन साधण्याची उत्तम हातोटी त्यांच्यात आहे. यासाठी परिपक्वता लागते," असं कीर्तीश म्हणाले. तर राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचं रेखाटन आणि मांडणीही आकर्षक असते, असं कुलकर्णी यांचं मत आहे.

राजकीय संदेश

"व्यंगचित्र हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे. राज त्यांची भूमिका, पक्षाची भूमिका आणि मतं स्पष्टपणे मांडतात," असं प्रशांत कुलकर्णी म्हणतात. त्यांची मराठी भाषा उत्तम आहे आणि ते त्याचा वापर उत्तम करतात, असंही कुलकर्णी सांगतात.

ते पुढे म्हणाले, "विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते खोटं बोलतात, अशी टीका करत होते. त्यावेळी राज यांनी महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख करत 'माझे असत्याचे प्रयोग' असं व्यंगचित्र रेखाटलं. हे व्यंगचित्र त्यांची भूमिका मांडणारं प्रभावी व्यंगचित्र ठरतं."

Image copyright RajThackeray / Facebook

ते म्हणाले, "सोशल मीडियाच भाजपवर उलटत आहे, हे दाखवण्यासाठी राज यांनी 'परतीचा पाऊस' हे व्यंगचित्र काढलं. हा पाऊस मोदी, शहा, जेटली यांना झोडपतो आहे, असं त्यांनी दाखवलं. त्यामुळे हे चित्र अधिक प्रभावी ठरलंच आणि त्यातला विनोदही प्रभावी ठरला."

'प्रचारकी व्यंगचित्रं'

"राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्रं निष्पक्ष असणार नाहीत. ते स्वतःच्या पक्षाविरुद्ध व्यंगचित्रं काढू शकतील का? त्यामुळं त्यांची व्यंगचित्रं प्रचारकी ठरतील," असं मंजुल यांना वाटतं.

Image copyright RajThackeray / facebook

व्यंगचित्र संवादाचं प्रभावी माध्यम असल्यानं त्यांचा प्रचारकी वापर नवा नाही, असं ते म्हणतात.

तर राज यांनी स्वत:च्या पक्षाचा प्रचार करणारी व्यंगचित्रं अजूनतरी काढलेली नाहीत. त्यामुळे त्यांची व्यंगचित्रं प्रचारकी वाटत नाहीत, ही मोठी जमेची बाजू आहे, असं कुलकर्णी यांना वाटतं.  

सोशल मीडियावरही हिट

बऱ्याच वेळा सोशल मीडियात वक्तव्यांपेक्षा व्यंगचित्रं जास्त शेअर होतात, हे कदाचित राज यांना माहीत असेल. म्हणूनच त्यांनी व्यंगचित्रांसाठी सोशल मीडियाचं माध्यम निवडलं असावं, असं कीर्तीश यांना वाटतं.

Image copyright RajThackeray / Facebook

डिजिटल युगात 'रीच' वाढल्यानं व्यंगचित्रं जास्तच प्रभावी ठरतात. जो विचार लिहून मांडता येणार नाही, तो व्यंगचित्रांतून मांडता येतो. काही न सांगताही व्यंगचित्र बऱ्याच वेळा फार काही सांगून जातात, असं ते मंजुल म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)