प्रेस रिव्ह्यू : महिलेवर भरदिवसा फुटपाथवर बलात्कार, प्रत्यक्षदर्शींनी काढले व्हीडिओ

संग्रहित छायाचित्र Image copyright AFP
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये रविवारी दुपारी एका महिलेवर भररस्त्यात बलात्कार झाला आहे.

काही जणांनी या घटनेचं चित्रीकरण देखील करण्यात केलं. पण, त्या महिलेच्या मदतीसाठी कुणी समोर आलं नाही.

या प्रकरणात पोलिसांनी गांजी शिवा नावाच्या एका चालकाला अटक केली आहे, असं वृत्त बीबीसी हिंदीने दिलं आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याच स्पष्ट झालं. खूप दिवस जेवण न केल्यामुळं ती महिला अशक्त झाली होती. त्यामुळे ती त्याचा प्रतिकार करू शकली नाही, असं पोलीस म्हणालेत.

जावडेकरांच्या सचिवासाठी रेल्वेनं खास डबा जोडला?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे खासगी सचिव विनय श्रीवास्तव यांच्यासाठी रेल्वेनं लखनऊ ते दिल्ली प्रवासासाठी पद्मवती एक्सप्रेसला खास वातानुकूलित डबा जोडल्याचा आरोप करण्यात आला आहे, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

श्रीवास्तव यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. या आरोपाची पंतप्रधान कार्यालयातर्फे चौकशी सुरू झाली आहे.

"हा डबा माझ्यासाठी जोडण्यात आला नव्हता. तर सणावारासाठी जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली म्हणून रेल्वेनी हा डबा जोडला" असं श्रीवास्तव यांनी म्हटले.

"मी खास डब्यासाठी कुणावर दबाव आणला नाही किंवा साधं कुणाशी बोललोदेखील नाही," असं स्पष्टीकरण श्रीवास्तव यांनी दिलं आहे.

राष्ट्रगीतावेळी उभं राहण्याची सक्ती नाही

Image copyright AFP
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

चित्रपट गृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवलं जातं. यावेळी उभं राहण्याची सक्ती नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

देशभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहण्याची सक्ती नाही असं न्यायालयानं म्हटल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

अकरा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात आदेश दिला होता. सिनेमागृहात राष्ट्रगीतावेळी उभं राहून त्याचा सन्मान करावा असं त्या आदेशामध्ये सांगण्यात आलं होतं.

पण, जे लोक त्याचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल याबाबत न्यायालयाचा काही आदेश नव्हता.

त्या संदर्भात केंद्र सरकारनं याचिका दाखल करून या आदेशात सुधारणा करावी अशी विनंती न्यायालयाला केली. ती फेटाळून लावतांना कोर्टानं वरील आदेश दिले आहेत.

'रामदेव बाबांचे गुरू कोण?'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रामदेव बाबा

रामदेव बाबा यांचे गुरू कोण? असा प्रश्न सरकारी नोकरीच्या उमेदवारांना हरियाणा सरकारनं परीक्षेत विचारला असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

हे प्रश्न सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत विचारले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हरियाणा सरकारने असे अनेक प्रश्न विचारले आहेत ज्यांचा सामान्य ज्ञानाशी काहीच संबंध नाही अशी ओरड उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

हरियाणामध्ये काही समाजांमध्ये चलकडा नावाचा एक दागिना घातला जातो. तो नेमका शरीराच्या कोणत्या भागावर परिधान केला जातो असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता.

"पोलीस काँस्टेबल, क्लर्क, अन्न निरीक्षक, तलाठी या परीक्षांच्या वेळी प्रश्नपत्रिकेत असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत ज्यांचा संबंध सामान्य ज्ञानाशी नाही," असं एका उमेदवारानं म्हटलं आहे.

या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच पुस्तकात नसतात मग आम्ही अभ्यास कसा करायचा असा प्रश्न एका उमेदवारानं एक्सप्रेसच्या प्रतिनिधीला केला आहे.

'जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स'

Image copyright facebook/rahul gandhi
प्रतिमा मथळा राहुल यांनी जीएसटीची खिल्ली उडवली आहे.

वस्तू आणि सेवाकर कायदा किंवा जीएसटीचा खरा अर्थ गब्बर सिंग टॅक्स आहे अशी बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमध्ये केली. एनडीटीव्हीनं असं वृत्त दिलं आहे.

राहुल यांनी जीएसटीची तुलना 70 च्या काळात सुपरहिट ठरलेल्या शोले चित्रपटातील खलनायक गब्बर सिंगशी केली आहे.

त्यावर "राहुल आणि त्यांचा पक्ष ड्रामेबाज नंबर वन आहे," असं प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)