एक्सक्लुझिव्ह : गुजरात निवडणुकांची तारीख जाहीर झाली नाही कारण...

राज्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती Image copyright ECI
प्रतिमा मथळा राज्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. पण गुजरात निवडणुका कधी होणार, यावर अजूनही गूढ कायम आहे. बीबीसी गुजरातीला दिलेल्या मुलाखतीत मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी निवडणुकीची तारीख जाहीर न करण्याची अनेक कारणं सांगितली आहेत.

जोती म्हणाले, "गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये 200 जणांचे प्राण गेले. अनेक खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे."

"निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यावर आदर्श आचारसंहितेचे पालन करावं लागतं. त्यामुळे पुनर्वसनाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून हा निर्णय आम्ही घेतला," असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गुजरातमध्ये काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पुनर्वसनाचं कार्य सुरू आहे.

"27 सप्टेंबर रोजी आम्हाला गुजरातच्या मुख्य सचिवांकडून पत्र मिळालं. पुरामुळे 45 खेडी उद्धवस्त झाली होती. त्यांच्या पुनर्वसनावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता सचिवांकडून व्यक्त करण्यात आली होती," जोती यांनी सांगितलं.

"एकदा निवडणुका जाहीर झाल्या की एकूण 26,000 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होतील. आता त्यातील बहुतेक जण पुनर्वसनाच्या कार्यात गुंतलेले आहेत. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला," असं जोती म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सणवार संपले की निवडणुकांची तारिख आम्ही जाहीर करू असं आम्ही ठरवलं होतं.

"त्याच बरोबर गुजरातमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. एकदा का सणवार संपले की निवडणुकांच्या तारीख जाहीर करू, असं आम्ही ठरवलं होतं," असं स्पष्टीकरण जोती यांनी दिलं.

"नियमानुसार निवडणुकांच्या 21 दिवस आधी तारीख जाहीर करावी लागते. 2012 मध्ये दोन महिने आधी निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली होती. पण त्यामुळे आदर्श आचारसंहिता दोन महिन्यासाठी लागू झाली होती," जोती यांनी सांगितलं.

"पण तुमच्या निर्णयामुळं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फायदा झाला, असं वाटत नाही का?" असं विचारल्यावर ते म्हणाले, "याचा फायदा सर्वच पक्षांना होईल. राहुल गांधी सुद्धा प्रचार करत आहेत."

Image copyright Eci
प्रतिमा मथळा 'हिमाचल आणि गुजरात निवडणुकांमध्ये काही साम्य नाही.'

हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. सगळ्या तारखा जाहीर झाल्या असून उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख (23 ऑक्टोबर) ही निघून गेली आहे. मग गुजरातच्या बाबतीत इतका उशीर का?

"हिमाचल आणि गुजरात निवडणुकांमध्ये काही साम्य नाही. त्यामुळं एकाच दिवशी निवडणुकीची घोषणा करण्याची आवश्यकता नव्हती," असं ते म्हणाले.

"गुजरात सरकारकडून तुम्हाला फायदा मिळाल्याचे 'द वायर' या वेबसाइटने म्हटलं आहे. त्यात काही तथ्य आहे का?" असं विचारताच जोती म्हणाले, "मी जेव्हा मुख्य सचिव होतो तेव्हाच मला निवासस्थान मिळालं होतं. जेव्हा माझी बदली झाली तेव्हा माझ्याकडे राहायला जागा नव्हती.

"त्यामुळे मी सरकारकडे परवानगी मागितली. आणि त्यांनी ती दिली. यात माझ्या पदाचा मी गैरवापर करण्याचा काही प्रश्नच नाही."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)