प्रेस रिव्ह्यू : बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मायावती हिंदू धर्म सोडणार?

Image copyright AFP

भाजपनं जर मानसिकता बदलली नाही तर आपण बौद्ध धर्म स्वीकारू असं वक्तव्य बसपच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"भाजपनं दलित, अदिवासी, मागसवर्गीय आणि धर्मांतरित यांच्याबाबतची स्वतःची भूमिका बदलावी अन्यथा मी धर्म बदलण्याचा निर्णय घेईन," असं वक्तव्य मायावती यांनी केल्याचं या वृत्तात लिहीण्यात आलं आहे.

यूपीमधील आझमगडमध्ये मंगळवारी मायावती यांची सभा झाली. त्यावेळी भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Image copyright Getty Images

जीडीपीमध्ये घसरण होईल - IMF

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हणजेच IMF नं 2017-18 च्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर म्हणजेच जीडीपी 6.7 टक्के इतकं असेल असं भकीत केलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे. गेल्या वर्षी हा आकडा 7.1 टक्के इतका होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जीडीपी दर्शवणाऱ्या काही देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे.

इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसित देशांमध्ये मात्र जीडीपी वाढण्याचं भकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं असल्याचं, या बातमीत लिहीण्यात आलं आहे.

त्यावेळी चीनचा विकासदर मात्र 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Image copyright Getty Images

चेक इन बॅगेजमध्ये लॅपटॉपला बंदी

विमानप्रवासात आता चेकइन बॅकेजमध्ये लॅपटॉप आणि इतर लार्ज पर्सनल इलेक्ट्रॉनिक उपकरणं नेण्यात बंदी घातील जाण्याची शक्यता असल्याच वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता असून त्यांचा निर्णय झाल्यानंतर भारतातही हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

अशा उपकरणांच्या बॅटरीत स्फोट झाला तर ते दुर्लक्षित राहण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

हॅंडबॅगेजमधील लार्ज पर्सनल इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील बॅटरीला आग लागली तर परिस्थिती कशी हाताळायची याचं प्रशिक्षण विमानातील कर्मचाऱ्यांना दिल जात असल्याचं या वृत्तात म्हंटलं आहे.

बाँडचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांना पदव्युत्तरला प्रवेश नाही

पदवी आणि पदव्युत्तर प्रशिक्षणानंतर ग्रामीण भागांत सेवा करण्याच्या बाँडची पूर्तता न करणाऱ्या डॉक्टरांना एमडी, एमएस आणि पदव्युत्तर पदविकांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

सार्वजनिक मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना ग्रामीण भागात बाँडसेवा बंधनकारक आहे.

ही सेवा न केल्यास आतापर्यंत फक्त दंडात्मक कारवाई केली जात होती. 2008 पासून या दंडाची रक्कम 10 लाख रुपये करण्यात आली, असं या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright PHILIPPE HUGUEN/AFP/Getty Images

मुलाच्या रक्तात चारही प्रकारच्या मलेरियाचे जंतू

बस्तर येथील 12 वर्षांच्या एका मुलाच्या रक्तात मलेरियाच्या चारही प्रकारचे जंतू सापडल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. अमेरिकेतील पब्लिक लायब्ररी सायन्समध्ये ही नोंद झाली असल्याचे या वृत्तात म्हटलं आहे.

अशा प्रकारची ही पहिलीच नोंद असून यातून मलेरियाच्या निदानासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली असल्याचं यात म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)