भारत आणि पाकिस्तानमधल्या 'अर्धविधवा'

लैला आणि अमृत
प्रतिमा मथळा लैला आणि अमृत

भारतातला गुजरात आणि पाकिस्तानातला सिंध... या दोन प्रांतात राहणाऱ्या अनुक्रमे अमृत आणि लैलामध्ये अरबी समुद्र आहे.

लैला पाकिस्तान आणि अमृत भारतात राहतात, पण त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. दोघींचे पती मच्छिमार आहेत आणि सध्या परदेशातल्या तुरुंगात आहेत.

लैलाला पाच मुलं आहेत आणि अमृतला चार मुलं.

लैलाचा पती भारतातल्या तुरुंगात आहे आणि अमृतचा पती पाकिस्तानमधल्या तुरुंगात.

दोघींचे मच्छीमार पती सागरी हद्द ओलांडल्यामुळे अटकेत आहेत. त्यांच्याकडून चुकून सागरी हद्द पार झाली, ते निरपराध आहेत, असं त्या म्हणतात.

'अर्धविधवा'

लैलाच्या कुटुंबातल्या 16 जणांना भारत सरकारने डिसेंबर 2016 मध्ये ताब्यात घेतलं.

अमृतचा पती कांजी आणि आणखी सहा जणांना पाकिस्तान सरकारने जानेवारी 2017 मध्ये अटक केली.

दिल्ली आणि इस्लामाबादमधले संबंध तणावाचे होतात, तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा फटका समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना बसतो.

पाकिस्तानच्या लैलाची व्यथा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
भारताच्या तुरुंगात खितपत पडलेल्या पाकिस्तानी मच्छिमारांच्या पत्नींची कहाणी.

या दोघींनाही दोन लहान मुली आहेत. त्या त्यांना एकच प्रश्न विचारतात. "माझे वडील समुद्रातून परत कधी येणार?"

"माझी मुलं वडिलांची सारखी आठवण काढतात, माझी लहान मुलगी तर जास्तच', पाकिस्तानच्या झांगिसार गावातली लैला सांगते.

प्रतिमा मथळा लैला तिचे पती इब्राहीम यांच्याशिवाय जगण्याचा संघर्ष करते आहे.

"ती सारखी तिच्या वडिलांबद्दल विचारते. तिला तिचे वडील परत आल्याची स्वप्नं पडतात", लैला आठवणी सांगते.

पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशातलं हे मच्छिमारांचं गाव आहे.

भारतीय अमृतचं दुःख

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमार लोकांच्या पत्नींची कहाणी.

पश्चिम भारतातल्या दीव आणि दमणमधल्या या किनाऱ्यावरच्या गावात अमृत सोळंकी राहते. तिलाही तिच्या मुलांशी खोटं बोलावं लागतं.

तिची मुलगी नम्रता 13 वर्षांची आहे. नम्रताने जेवावं म्हणून ती सारखी तिला तिचे वडील येणार आहेत, असं सांगत राहते.

वनकबरा हे दीव-दमणच्या केंद्रशासित प्रदेशातलं मच्छिमार गाव आहे. या गावातले सगळे जण मच्छिमारी करतात.

अमृतला कुटुंबाची गुजराण करण्यासाठी व्याजाने पैसे आणावे लागले.

"कर्ज देणाऱ्यांना मला वचन द्यावं लागलं की माझे पती पाकिस्तानातल्या तुरुंगातून परत आले की मी त्यांचे पैसे परत करेन", ती सांगते.

सरकारची निष्क्रियता

गुजरातच्या मत्स्योद्योग विभागाचे कमिशनर मोहम्मद शेख सांगतात, गुजरात, दमण आणि दीवमधले 376 मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.

प्रतिमा मथळा अमृत समुद्रकिनाऱ्यावर तिचे पती कांजी हे पाकिस्तानहून कधी परततील याची वाट बघते.

पाकिस्तानमधल्या 'फिशर फोक फोरम या संस्थेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचे सुमारे 300 मच्छिमार भारतीय तुरुंगात खितपत पडले आहेत. यापैकी 55 मच्छिमार थाट्टा जिल्ह्यातले आहेत.

पण भारताच्या ताब्यात पाकिस्तानचे फक्त 184 मच्छिमार आहेत, असं पाकिस्तानच्या सरकारचं म्हणणं आहे.

प्रतिमा मथळा पाकिस्तानमधल्या झांगिसारमधल्या महिला आपल्या पतीच्या सुटकेसाठी फिशर फोक फोरम या संस्थेच्या मदतीच्या आशेवर आहेत.

तुरुंगात असलेले मच्छिमार त्यांच्या कुटुंबात एकटेच कमावणारे आहेत. त्यांच्या पत्नी आणि आईला आता त्यांच्या शोधात समुद्रात जावं लागतं. त्यांच्यावर जगण्यासाठी रस्त्यावर भीक मागायची वेळ आली आहे.

गुलाब शाह हे पाकिस्तानमधल्या फिशर फोक फोरमसाठी काम करतात. ते म्हणतात, समुद्रामध्ये कोणत्याही सीमा असता कामा नये आणि 'सर क्रिक' वादावरही तोडगा निघायला हवा.

भारत आणि पाकिस्तानमधली ही 98 किलोमीटरची पट्टी अरबी समुद्रात खुली होते.

प्रतिमा मथळा पाकिस्तानमधल्या सिंधु नदीच्या त्रिभुज प्रदेशात मच्छिमारांना धोका पत्करून समुद्रात जावंच लागतं.

"हे मच्छिमार छोट्या खाड्यांमधून बोटी नेतात आणि नंतर समुद्रात भरकटून हद्द ओलांडतात. अशा मच्छिमारांची थेट तुरुंगात रवानगी होते.

"काही वेळा तर त्यांना जन्मभर तुरुंगातच राहावं लागतं", गुलाब शाह सांगतात.

"जर हद्द ओलांडणं हे बेकायदेशीर आहे तर त्यांना कायद्यानुसार फक्त तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते."

भारतातल्या मच्छिमारांच्या प्रतिनिधींचंही हेच म्हणणं आहे.

गुजरातमधल्या पोरबंदर फिशिंग बोट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनीष लोधरी सांगतात, "पाकिस्तान मरीन सिक्युरिटी एजन्सी भारतीय मच्छिमारांना अटक करते तेव्हा त्यांच्या संस्थेने भारत सरकारकडे प्रत्येक वेळी मदत मागितली आहे. "

"ही खूप मोठी प्रक्रिया आहे. पाकिस्तानमध्ये अटक झाली तर कितीही वेगाने गोष्टी पुढे सरकल्या तरी पाकिस्तानमधून हे मच्छिमार त्यांच्या घरी परत येईपर्यंत एक महिना जातो," ते सांगतात.

प्रतिमा मथळा गुजरात आणि दीवमधल्या मच्छिमार उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं.

पाकिस्तान आणि भारताने हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयीन आयोग नेमला आहे.

या आयोगाच्या सदस्यांनी वर्षातून एकदा एकमेकांच्या देशातल्या तुरुंगात असलेल्या मच्छिमारांची भेट घ्यावी आणि त्यांचं समुपदेशन करावं, अशी शिफारस या आयोगाने केली.

या मच्छिमारांना चांगलं अन्न मिळावं, औषधोपचार मिळावेत याचीही काळजी घ्यावी, असंही या आयोगाने म्हटलं होतं. पण यातल्या एकाही शिफारशीची अमलबजावणी झाली नाही.

मच्छिमारांच्या अटकेला प्रतिबंध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत. पण हा करारही पाळला जात नाही.

तुरुंगात असलेल्या मच्छिमारांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोही देशांमध्ये दर सहा महिन्यांनी द्विपक्षीय चर्चा होते पण प्रगती मात्र संथगतीने होते.

प्रतिमा मथळा या महिलांच्या मनात सगळ्यांनीच सोडून दिल्याची भावना आहे. शांता कोलीपटेल (डावीकडून दुसऱ्या)

शांता कोलीपटेलचे पती कांजीभाई यांनाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये अटक केली होती.

दोन्ही देशातल्या या मच्छिमारांच्या पत्नी निरक्षर आहेत आणि त्यामुळे त्यांना ही कायदेशीर लढाई लढता येत नाही.

"आमया नवऱ्याच्या सुटकेसाठी कायद्याची लढाई द्यायची असेल तर बोटीचे मालक आम्हाला कोणतीही आर्थिक किंवा कायदेशीर मदत करत नाहीत", शांता सांगते.

न संपणारी व्यथा

पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातल्या झांगिसारमधल्या सलमाचं दु:ख तर आणखी मोठं आहे. तिच्या मुलाच्या अटकेबद्दल तिला प्रसारमाध्यमांतून कळलं.

"मी इंटरनेटवर माझ्या मुलाचा फोटो पाहिला तेव्हा मला त्याच्या अटकेबद्दल कळलं. पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांना अटक केली होती आणि माझ्या मुलाला त्यांनी तुरुंगात टाकलं." ती सांगते.

या धक्क्यामुळे तिच्या पतीचा मृत्यू ओढवला.

प्रतिमा मथळा सलमा म्हणते, ती भारतातल्या तुरुंगात असलेल्या तिच्या मुलाशी अनेक वर्षँ बोलू शकलेली नाही.

" पाकिस्तान सरकारने आमच्यावर दया करावी आणि त्यांच्या मच्छिमारांची सुटका करावी. तरच आमच्या गरीब मुलांना ते सोडून देतील," सलमा म्हणते.

भारतातल्या दीवमध्ये शांता कोलीपटेल यांचंही तेच म्हणणं आहे.

" पाकिस्तानी महिला आमच्यासारख्याच अडचणींना सामोऱ्या जातात. मच्छिमारांचं आयुष्य सगळीकडे सारखंच आहे."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)