गुजरात विधानसभा निवडणुकांशी संबंधित सर्व आकडे एका ठिकाणी

गुजरात चुनाव Image copyright SAM PANTHAKY/AFP/Getty Images

निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होईल आणि 18 डिसेंबरला मतगणना होणार आहे.

एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांनी सांगितलं.

पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 9 डिसेंबरला निवडणुका होतील. त्यासाठी 21 तारखेपर्यंत अर्ज करता येतील. 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांत 93 जागांसाठी मतदान होईल. त्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यासाठी 27 तारखेपर्यंत अर्ज करता येतील, तसेच 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

VVPAT यंत्राचा वापर

याआधी आयोगाने हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. पण त्यावेळी आयोगाने गुजरातमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नव्हत्या.

अनेकांचं मत आहे की, या उशीरामुळे भाजपाला सरळ फायदा होईल कारण आचारसंहिता लागू न झाल्यामुळे सत्ताधारी पक्षाला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात करण्याची संधी मिळाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की यावेळी VVPAT लिंक्ड (Voter Verified Paper Audit Trail) मतदान यंत्राचा वापर करण्यात येईल. या यंत्रामुळे मतदानाची पावती मिळू शकेल.

सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या मदतीसाठी साहाय्यकांची निवड केली जाईल. संवेदनशील भागात चित्रीकरण करण्यात येईल. मतदान सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवर असेल.

पेड न्यूज वर कडक लक्ष

येत्या निवडणुकीत आमदारांना प्रत्येक उमेदवारावर 28 लाख रुपये खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे.

त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने एक मोबाईल अॅप सुरू केलं आहे, ज्याद्वारे उमेदवार विविध परवानग्यांसाठी अर्ज करू शकतात.

निवडणूक आयोगाने सामान्य जनतेसाठीसुद्धा एका अॅपची घोषणा केली आहे ज्याद्वारे लोक तक्रारी नोंदवू शकतील.

निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक 'फ्लाईंग स्क्वॉड'ची नियुक्ती केली जाईल. जीपीएस प्रणालीद्वारे ते या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.

त्याचप्रमाणे पेड न्यूज रोखण्यासाठी त्रिस्तरीय चौकशी होणार आहे, ज्यासाठी प्री-सर्टिफिकेशन गरजेचं असेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)