प्रेस रिव्ह्यू : ISमध्ये सहभागी ठाण्यातील तरुण रक्कात ठार

इस्लामिक स्टेट Image copyright Alamy

कथित इस्लामिक स्टेटमध्ये (IS) सामील झालेल्या ठाण्यातील चार विद्यार्थ्यांपैकी फहाद तन्वीर शेख गेल्या आठवड्यात रक्का शहरानजीक लढताना मारला गेला असल्याची शक्यता असल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

एका अनोळखी व्यक्तीने शेख याच्या घरी फोन करून ही माहिती त्यांच्या घरच्यांना दिली आहे, असं या वृत्तात म्हटले आहे. शेखसह ठाण्यातील अरीब मजीद, शहीम टंकी आणि अमन तांडेल हे तिघे ISमध्ये सहभागी झाले होते.

यातील अरीबला अटक झाली तर टंकी आणि अमन यापूर्वीच मारले गेल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

रक्का ही IS ची राजधानी मानली जात होती. या शहरावर इराकी फौजांनी ताबा मिळवला आहे. क्रौर्यानं भरलेल्या तीन वर्षांनंतर कथित इस्लामिक स्टेटच्या (IS) सैनिकांना रक्का या त्यांच्या राजधानीतून बाहेर पडावं लागलं आहे.

आता भारतासारख्या देशातून कथित इस्लामी स्टेटसाठी लढायला गेलेल्या अशा सैनिकांचं काय होणार हा प्रश्न चर्चेत आहे.

डॉ. लॉरेन्झो व्हिडिनो यांनी बीबीसीसाठी केलेल्या विश्लेषणनुसार जे परदेशी सैनिक तिथंच राहतील ते IS सोबत राहतील आणि 10 वर्षांपूर्वी ISचं जे रूप होतं तसं त्याचं स्वरूप पुढे असेल.

दहशतवादी हल्ले आणि गनिमीकावा पद्धतीच्या युद्धाचा मार्ग ते स्वीकारतील, असंही व्हिडिनो यांचं विश्लेषण सांगतं.

वातानुकूलित लोकलसेवा 1 जानेवारीपासून

मुंबईत पश्चिम रेल्वेवर लवकर एसी लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

Image copyright AFP

गेलं दशकभर हा प्रकल्प रखडला असून पण 1 जानेवारीपासून ही लोकल धावेल, असं गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

काही दिवसांपूर्वी मुंबईत रेल्वेच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 21 जण ठार झाले होते. त्यानंतर लोकल रेल्वेत पायाभूत सुविधांत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत.

यात 370 एस्कलेटरचाही समावेश असल्याचं आजतकच्या वृत्तात म्हटलं आहे. झोन आणि डिव्हिजन पातळीवरील अधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

कोळसावाहू गाड्यांमुळे गोव्याची हवा धोकादायक

कोळसावाहू गाड्यांमुळे वास्कोत नागरिकांत श्वसनाच्या विकारांत वाढ होत असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

Image copyright Getty Images

कोळशाची वाहतूक सुरू होण्यापूर्वी दररोज सर्वसाधारण 40 रुग्ण येत असत, पण ही संख्या आता वाढली असल्याचं डॉक्टरांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.

कोळसा वाहतुकीमुळं विविध गावांतील आणि शहरांतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं यात म्हटलं आहे. कोळश्यातून निघणारी धूळ शेती आणि जंगलांनाही हानीकारक असल्याचं यात म्हटलं आहे.

गोव्यातील कोळसा वाहतुकीवर 4 महिने लक्ष ठेवून हे वृत्त देण्यात आलं असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

'फिफा'ला भीती भटक्या कुत्र्यांची

अंतिम टप्प्यात आलेल्या 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेसमोर भटक्या कुत्र्यांची समस्या उभी राहिली आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक सकाळने दिले आहे.

Image copyright Thinkstock

नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 6 ऑक्टोबरला झालेल्या न्यूझीलंड-तुर्कस्तान सामन्यात भटका कुत्रा मैदानात आल्यामुळं हा सामना काहीवेळ थांबवावा लागला होता.

त्यानंतर 'फिफा'नं महापालिकेला या संदर्भात दक्षता घेण्यास सांगितलं आहे.

मनसेचे 'ते' नगरसेवक शिवसेनेतच

मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) शिवसेनेत आलेले सहाही नगरसेवक शिवसेनेतच राहणार आहेत.

या सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक पुन्हा मनसेत जाणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे, नगरसेवक दिलीप लांडे यांनी सांगितले.

या संदर्भातील वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. सहाही नगरसेवकांनी एका पत्रकातून हा खुलासा केला असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. 13 ऑक्टोबरला मुंबई महापालिकेतील मनसेच्या 7पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)