गुजरातमध्ये मिळाले समुद्री डायनासोरचे अवशेष

इक्थॅसोर Image copyright COURTESY G PRASAD

पश्चिम गुजरातमध्ये इक्थॅसोर या समुद्री डायनासोरसचं जीवाश्म सापडलं आहे. सापडलेलं जीवाश्म 15.2 कोटी वर्षं जुनं आहे. इक्थॅसोरचे जीवाश्म भारतात प्रथमच सापडले आहेत.

इक्थॅसोर हे नामशेष झालेले समुद्री डायनासोर आहेत.

कच्छच्या वाळवंटातील मेसोझोइक युगातल्या खडकांत हे जीवाश्म मिळालं आहे.

संशोधकांच्या या टीमचं नेतृत्व प्रा. गुंटुपल्ली व्ही. आर. प्रसाद यांनी केलं. प्रसाद म्हणाले, "सापडलेल्या जीवाश्माची लांबी 18 फूट (5.5 मीटर) इतकी आहे. कवटी आणि शेपटीच्या हाडांचा काही भाग वगळता हे जीवाश्म जवळपास पूर्ण अवस्थेत आहे."

या शोधाचे निष्कर्ष Plos One या science journal मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

ते म्हणाले, "ज्युरासिक काळातील इक्थॅसोरचं जीवाश्म भारतात पहिल्यांदाच भारतात सापडलं, इतकंच या संशोधनाचं महत्त्व मर्यादित नाही."

"इक्थॅसोरसची इंडो-मादागास्कन प्रदेशातील उत्क्रांती आणि भारताची ज्युरासिक काळातील इतर खंडाशी असणारा संबंध यावरही हे संशोधन प्रकाश टाकतं", असं ते म्हणाले.

हे संशोधन करणाऱ्या टीममध्ये भारत आणि जर्मनीतील संशोधकांचा सहभाग होता. या संशोधकांच्या मते, सापडलेलं जीवाश्म इक्थॅसोरच्या ऑप्थॅल्समसोराईडच्या कुळातील असण्याची शक्यता आहे. हे इक्थॅसोरस 16.5 कोटी ते 9 कोटी वर्षांपूर्वीच्या काळात समुद्रात होते.

इक्थॅसोरस

Image copyright JAMES MCKAY
  • बऱ्याचवेळा इक्थॅसोरसना पोहणारे डायनासोर म्हटलं जातं, पण हे चुकीचं आहे.
  • इक्थॅसोर पृथ्वीवर प्रथम अस्तित्वात आले ते ट्रायाजिक युगात (251 दशलक्ष ते 199 कोटी वर्षांपूर्वी).
  • इक्थॅसोरची विभागणी 19व्या शतकाच्या मध्यापासून सरपटणाऱ्या प्राण्यांत करण्यात आली असली तर या नावाचा अर्थ फिश लिझार्ड - समुद्री पाल असा आहे.
  • यांची लांबी 1 ते 14 मीटर होती तर सरासरी लांबी 2 मीटर ते 3 मीटर होती.
  • तीक्ष्ण आणि मोठे दात इक्थॅसोरसचं वैशिष्ट्य होतं.
  • डायनासोरच्या आधीच इक्थॅसोरचं नामशेष झाले. क्रिटॅशिअस युगाच्या (14.55 दशलक्ष ते 6.55 दशलक्ष वर्षांपूर्वी) सुरुवातीला इक्थॅसोर नामशेष झाले.

या संशोधकांनी म्हटलं आहे की, या नव्या संशोधनामुळे भारत आणि दक्षिण अमेरिकेत 15 कोटी वर्षांपूर्वी काही समुद्री संबंध होता का, यावर प्रकाश पडू शकतो.

या सापडलेल्या जीवाश्माच्या दातांचा अभ्यास करता हे इक्थॅसोर त्या काळात परिसंस्थेमध्ये (इकोसिस्टीम) अव्वल क्रमांकाचे शिकारी होते असं दिसतं, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)