टीपू सुलतानकडे होती हिरेजडीत तलवार आणि राम नावाची अंगठी

टीपू सुलतान Image copyright Thinkstock

'टायगर ऑफ म्हैसूर' म्हणून ओळख असणाऱ्या टीपू सुलतान यांच्या जयंतीच्या वेळी दर वर्षी राजकीय वाद होत असतात. यंदाही केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी परत या वादाला तोंड फोडलं आहे.

कर्नाटक सरकारतर्फे टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या निर्णयावर अनंत कुमार हेगडे यांनी टीका केली आहे. टीपू सुलतान हा एक 'निर्घृण हत्यारा' आणि 'बलात्कारी' होता. असं त्यांनी म्हटलं आहे. या आधीही असेच वाद झाले आहेत.

टीपू सुलतान हा एक धाडसी शासक होता, ज्याने 18व्या शतकात ब्रिटिश वसाहतवाद्यांशी दोन हात केले होते. त्याची प्रतिमा एक धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता अशी आहे, असं काहींचं म्हणणं आहे. पण आता काही लोक असा आरोप करत आहेत की टीपू सुलतानच्या काराकिर्दीत जवळजवळ 800 मंदिरं पाडण्यात आली होती.

दरवर्षीचा वाद

सध्या टीपू सुलतान जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार टोलेबाजी सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टीपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कर्नाटक विधानसभेला 60 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमीत्तानं विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात ते बोलत होते.

"ब्रिटीशांशी लढताना टीपू सुलतान यांना वीरमरण आले. 'म्हैसूर रॉकेट्स' विकसित करून त्याचा युद्धात वापरही केला. हेच तंत्र पुढे युरोपीय लोकांनी आधुनिकरित्या विकसीत केले," ते म्हणाले.

टीपू सुलतानशी निगडीत इतिहासातल्या खास गोष्टी?

हिऱ्यांची तलवार

2015 मध्ये टीपू सुलतानच्या हिरेजडित तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला. ही तलवार 21 कोटी रुपयांना विकली गेली.

Image copyright BBC World Service
प्रतिमा मथळा टीपू सुलतानची तलवार

या तलवारीवरच्या मुठीवर टीपू सुलतानच्या शासनाचं बोधचिन्ह असलेला हिऱ्यांचा वाघ आहे.

'राम' नावाची अंगठी

टीपू सुलतानकडे 'राम' नावाची अंगठी होती. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने टीपूच्या मृतदेहातून ही अंगठी काढून घेतली होती, असं सांगितलं जातं.

Image copyright CHRISTIES

2014 मध्ये 'क्रिस्टीझ लिलावघरा'ने या अंगठीचा लिलाव केला. 'क्रिस्टीझ'च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरुन ती अंगठी 41 ग्रॅम वजनाची होती.

टीपूंचे रॉकेट

लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये टीपू सुलतान यांनी विकसीत केलेली काही रॉकेटं ठेवली आहेत. 18व्या शतकात ब्रिटीश ते लंडनला घेऊन गेले होते.

ही रॉकेटं दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या रॉकेट बाँब पेक्षा थोडीशी मोठी आहेत. माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'अग्निपंख' पुस्तकात लिहीलं आहे की त्यांनी नासा सेंटरमध्ये टिपूंच्या रॉकेटची चित्र बघितली होती.

टीपू आणि त्यांचे वडील हैदर अली यांनी दक्षिण भारतातील युद्धात रॉकेटचा वापर केला होता. या रॉकेटची युद्धात फारशी मदत झाली नाही, पण शत्रूंच्या टापूत भितीचं वातावरण मात्र याने निर्माण केलं होतं.

टीपूंची तोफ

2010 साली टीपू सुलतानच्या शस्त्रागाराचा लिलाव झाला. यामध्ये त्यांच्या तलवारी, बंदुकांसह एका दुर्मीळ तोफेचा पण लिलाव झाला. तोफेची लांबी अडीच मीटर पेक्षा जास्त होती.

त्यावेळी या तोफेचा निर्धारीत किंमतीपेक्षा तीनपट, म्हणजे तब्बल 3 लाख पाउंडहून अधिक मध्ये लिलाव झाला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)