प्रेस रिव्ह्यू : 'बाबरी मशीदीचा वाद जवळपास सोडवला होता'

शरद पवार Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 1991 मध्ये राम मंदिर आणि बाबरी मस्जिद आम्ही जवळपास सोडवला होता. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, 1991 मध्ये राम मंदिर आणि बाबरी मस्जिद आम्ही जवळपास सोडवला होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं आहे.

अयोध्येमधील या वादग्रस्त जागेवर स्मारक बांधण्यात येणार होतं, असं पवार म्हणाले.

तसंच मंदिर आणि मशिदीसाठी दोन स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्यात येणार होता, असा तोडगा तेव्हा दोन्ही गटांसोबत झालेल्या बैठकीत जवळपास निघाला होता, असं पवार यांनी सांगितल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी 1990 मध्येच हा वाद सोडवण्यासाठी एक अनौपचारिक समिती स्थापन केली होती आणि त्यामध्ये राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंग शेखावत आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार होते, अशी माहिती पवार यांनी स्वतः दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

काश्मीरच्या स्वायत्ततेला चिदंबरम यांचा पाठिंबा?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चिदंबरम यांनी कश्मीरी जनतेच्या स्वायत्ततेच्या मागणीला पाठिंबा दर्शविल्याचं नवभारत टाइम्समधील वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवभारत टाइम्समधील वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरमधील नागरिकांशी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या चर्चेअंती इथल्या नागरिकांनी केलेली स्वातंत्र्याची मागणी म्हणजे ही त्यांना हव्या असलेल्या स्वायत्ततेशी निगडीत आहे. असा निष्कर्ष चिदंबरम यांनी काढला आहे.

त्यांनी काश्मिरी जनतेच्या स्वायत्ततेच्या मागणीला पाठिंबा दर्शविल्याचेही या वृत्तात स्पष्ट केलं आहे.

चिदंबरम यांच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकांनी यावर मतं नोंदवली असून भाजप नेत्यांनी चिदंबरम यांच्या या मताचा निषेध केला आहे.

हार्दिक पटेलांचे काँग्रेसला 3 नोव्हेंबरपर्यंतचे अल्टिमेटम

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काँग्रेसनं पाटीदार समाजाच्या आरक्षणाबद्दल आपली भूमिका 3 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करावी असं अल्टीमेटम हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिलं आहे.

द स्टेट्समनमधील वृत्तानुसार, काँग्रेसनं पाटीदार समाजाच्या आरक्षणाबद्दल आपली भूमिका 3 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करावी, असं अल्टिमेटम हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी हे अल्टिमेटम काँग्रेस पक्षाला दिलं आहे.

काँग्रेस पक्ष पाटीदार समाजाला घटनात्मकदृष्ट्या कसं आरक्षण मिळवून देईल, हे त्यांनी स्पष्ट करावं. तसंच काँग्रेसनं असं केलं नाही तर भाजपप्रमाणे त्यांनाही विरोध करण्यात येईल, असंही पटेल म्हणाले आहेत.

शिवसेनेचा सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध - मुख्यमंत्री

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शिवसेना राज्य सरकारनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध करते. असं विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

राज्य सरकारनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला शिवसेना विरोध करते, असं विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, सरकारला पाठिंबाही द्यायचा आणि बाहेरुन विरोधही करायचा हे जनतेला पटणार नाही. जनता याचा योग्य तो न्याय करेल अशी खात्री असल्याचंही फडणवीस म्हणाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

लोकसत्तानं वृत्तानुसार, आगामी निवडणुकांमध्ये जर सेना-भाजप युती व्हायची असेल तर भाजप केंद्रात आणि राज्यात शिवसेना मोठा भाऊ या जुन्या सूत्रानुसार होणं शक्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

आता भाजप केंद्रात आणि राज्यातही मोठा भाऊ आहे हे शिवसेनेनं लक्षात घेतलं तरच युती होईल, असं मत फडणवीस यांनी नोंदवलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)