'आम्ही पुरुष आहोत आणि आमचंही लैंगिक शोषण झालं होतं'

लहान मुलगा Image copyright AFP
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक छायाचित्र

लैंगिक शोषण हे लिंगभेदाच्या पलीकडचं असतं. स्त्री किंवा पुरुष कुणाचंही लैंगिक शोषण होऊ शकतं. सोशल मीडियावर 'मी टू' हा हॅशटॅग वापरत अनेक महिलांनी त्यांचे अनुभव शेअर केले. पण, समाजात असे अनेक पुरूष आहेत ज्यांना लौंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं आहे.

युनीसेफच्या आकडेवारीनुसार, जगातील 1 कोटी 20 लाख मुली कधी ना कधी लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. वयाच्या वीसाव्या किंवा त्यापेक्षाही कमी वयात या मुलींना लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं आहे.

म्हणजेच 10 पैकी एका मुलीला आयुष्यात केव्हा ना केव्हा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे.

पण, केवळ महिलाच लैंगिक शोषणाच्या बळी ठरत आहेत का? तर, समाजात महिलांनाच नव्हे तर लहान मुलं, तरूण आणि पुरुषांनाही लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे.

बीबसीनं आपल्या भारतीय वाचकांना त्यांच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत का? असा प्रश्न विचारत त्यांचे अनुभव बीबीसीला सांगण्याची विनंती केली.

यावर अनेकांनी आपले अनुभव बीबीसीकडे व्यक्त केले. यातले काही अनुभव धक्कादायक होते. यातील काहींवर लैंगिक अत्याचार करणारे हे त्यांचे परिचित किंवा नातेवाईकच होते.

यातील काही पुरुषांच्या प्रतिक्रिया बीबीसनं आपल्या सगळ्या वाचकांसाठी दिल्या आहेत.

'घर मालकाला मारायची इच्छा होते'

"होय, पुरुषांसोबतही असे अत्याचार होतात. काही वर्षांपूर्वी आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. तेव्ही मी अवघा 20 वर्षांचा होतो. उन्हाळ्यात आम्ही घराच्या गच्चीवर झोपायचो."

"एका रात्री 60 हून अधिक वर्षांचा आमचा घर मालकही गच्चीवर झोपण्यास आला. त्यानं मी झोपलेलो आहे हे बघून माझ्या बाजूला आपली चटई सरकवली."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक छायाचित्र

"मी झोपल्याचं बघून माझ्या पँटमध्ये त्यानं आपला हात सरकवला. माझी तेव्हा झोपच उडाली पण मी घाबरल्यानं काही बोलू शकलो नाही. त्याला थोबाडीत द्यावी असं माझ्या मनात आलं होतं. मात्र, मी कमकुवत असल्यानं गप्प राहिलो."

"मी पुरूष असल्यानं मी हे फार गांभिर्यानं घेतलं नाही आणि कुणाला सांगितलं ही नाही. 5 वर्ष झाली असतील आता या घटनेला, आम्ही आता स्वतःच्या घरात राहायला आलो आहोत. आजही त्याला मारण्याची इच्छा होते. पण, तो समाजातला प्रतिष्ठीत व्यक्ती असल्यानं हिंमत होत नाही."

'आईच्या काकांनी केलं लैंगिक शोषण'

"मी तेव्हा 7-8 वर्षांचा होतो. आमच्या घरी आईचे काका नेहमी यायचे. एका रात्री घरातल्या खोलीत आम्ही दोघंच झोपलो होतो. रात्री मला अचानक काहीतरी जाणवू लागलं."

"मी पाहिलं तर काका माझ्या अंगाशी सलगी करत होते. तेव्हा मी रडत असतानाही त्यांनी माझ्याशी अनैतिक संबंध ठेवले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना बघून खूप घाबरलो."

"अनेकदा मी त्यांच्या तावडीत सापडलो. पण, भीतीमुळे मी कुणाला काहीच सांगू शकलो नाही."

'माझ्या शिक्षकांनीच तो प्रसंग केला'

"1993 मधली ती घटना आहे. मी तेव्हा तीसरी का चौथीमध्ये शिकत होतो. आमच्या गावातल्या प्राथमिक शाळेत मी शिकत होतो. गावातल्या एका लग्नाची वरात दुसऱ्या गावात गेली होती."

"थंडीचे दिवस असल्याने मी वरातीसोबत त्याच गावात मुक्काम केला. रात्री उशीरा मला जाणवलं की कुणीतरी माझ्या शरीराशी चाळे करतं आहे. माझ्या शरीराशी चाळे करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून शाळेतले शिक्षकच होते."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक छायाचित्र

"मी जागा झालो, त्यांनी मला धमकी दिली. त्यामुळे पुढे त्यांच्या विरोधात मी काही बोलूच शकलो नाही. त्यानंतर त्यांनी माझं अनेक महिने शोषण केलं. शाळेत बहुदा प्रत्येक लंच ब्रेकमध्ये ते माझं लैंगिक शोषण करायचे."

"माझ्यात आत्मविश्वास कमी असल्यानं मी काही करूच शकलो नाही आणि आतल्या-आत घुसमटत बसायचो. नंतर मला समजलं की त्यानं पूर्वी अनेक मुलांच शोषण केलं आहे."

'शेतात नातेवाईकांनीच बलात्कार केला'

"मी 12 वर्षांचा असताना आमच्या गावातल्या शाळेत शिकत होतो. वडिलांच्या सांगण्यावरुन मी आमच्या शेतातही काम करण्यास जात असे."

"एकेदिवशी शेतात काम करत असताना आमचे एक नातेवाईक शेतात आले. मी तेव्हा शेतात इलेक्ट्रीक मोटर चालू करत होतो. ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या अंगाला स्पर्श केला."

"मला त्यावेळी काय करायचं हे समजतच नव्हतं. त्यांनी जबरदस्तीनं माझे सगळे कपडे उतरवून माझ्यावर बलात्कार केला. माझं सगळं अंग खूप दुखत होतं. अनेक वर्ष हा प्रकार सुरुच होता."

"बदनामीच्या भीतीनं मी आजवर हे कुणालाच सांगितलं नाही. कदाचित लोक माझी थट्टा करतील असंही मला वाटलं. या घटनेमुळे आजही अंगावर काटा येतो."

'गॅरेजवाल्यानं केला अत्याचार'

"माझ्यावरही लैंगिक अत्याचार झाले आहेत. 2000 मध्ये मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो. कॉलेज माझ्या घरापासून 20 किलोमीटर लांब होतं. मी बसनं कॉलेजला जायचो."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक छायाचित्र

"कॉलेजपासून अडीच किलोमीटर आधी उतरुन मी पायी जायचो. मी विचार केला की तिथं आपली सायकल ठेवली तर सोपं होईल. त्याच ठिकाणच्या एका गॅरेजमध्ये माझे वडील गाडी दुरुस्त करायचे."

"हे गॅरेज वडिलांच्या ओळखीच्याचंच होतं. तो कोणतेही पैसे न घेता सायकल ठेवण्यास तयार झाला. मी सायकल ठेवायला यायचो तेव्हा गॅरेजवाल्याकडे पाहून हसायचो. तोही मग हसायचा."

"त्याच्या या हसण्यामागे काय दडलंय हे मला कळलंच नाही. यातच एक महिना निघून गेला. एक दिवस त्याने मला त्याच्याकडे बोलावलं. गॅरेजमध्ये मेकॅनिक नव्हते. त्याने मला जवळ बसवलं."

"त्यानं माझा हात हातात घेतला. मी हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं दोन्ही हातांनी माझा हात पकडला. त्यानंतर त्यानं माझ्यासोबत जबरदस्ती केली. मी त्यामुळे रडायला लागलो."

"मग तो म्हणाला की, कॉलेजमधून संध्याकाळी लवकर ये फिरायला जाऊ. माझ्याकडून याचं वचन घेऊनच त्यानं मला जाऊ दिलं. मी परत तिथे आलोच नाही. माझ्या मित्राच्या घरी सायकल ठेवली."

"आज 17 वर्षांनंतरही ही गोष्ट मला लख्ख आठवते. माझ्या कुटुंबातील कुणालाच याबद्दल माहिती नाही."

'पुजाऱ्यानं केला अत्याचार'

"मी त्यावेळी आठ वर्षांचा होतो. नवरात्रीनिमित्त मी चित्रकूट आश्रमात गेलो होतो. तिथल्या एका पुजाऱ्यानं माझ्या गुप्तांगांना स्पर्श केला होता. मला विचित्रच वाटलं. पण, त्याचे हे चाळे वाढत गेले."

"त्यानं माझा शर्ट आणि पँट दोन्ही उतरवले. मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला थांबवू नाही शकलो. माझी आई माझ्यासोबत होती. पण, ती गडबडीत होती. मी तिला सांगितलं."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा समाजात महिलांनाच नव्हे तर लहान मुलं, तरूण आणि पुरुषांनाही लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो आहे.

"पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण, तिला वाटत होतं की मुलांचं लैंगिक शोषण होऊच शकत नाही. मी घाबरल्यानं त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न केला."

"मी आईला म्हणायचो की, आपण घरी जाऊयात. कारण त्या पुजाऱ्याची मला घृणा येत होती. एकदा तर मी त्याला विरोध करण्यासाठी कडकडून चावाच घेतला होता."

"दसऱ्यानंतर आम्ही घरी आल्यावरच हा प्रकार थांबला. मी 14 वर्षांचा असताना जेव्हा मी त्याठिकाणी पुन्हा गेलो तर तो प्रकार मला पुन्हा आठवला."

"पण माझ्या आईला माझ्यावर अजून विश्वास नाही. ते 8 दिवस कसे काढले हे माझं मलाच ठाऊक आहे. आई-वडीलांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण मुलीच नव्हे तर मुलंही शोषणाचा सामना करतात."

"कारण मुलं असली तरी ती तुमचीच मुलं असतात. इतरांची नसतात. त्यामुळेच त्यांचं पालकांनी ऐकलं पाहिजे."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)