प्रेस रिव्ह्यू : मोदी म्हणतात GSTमध्ये बदल करू पण मागे घेणार नाही

जीएसटीवर ठाम असल्याचं सरकारचं म्हणनं Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जीएसटीवर ठाम असल्याचं सरकारचं म्हणनं

GST बद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी; अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयातील 18 बालकांचा मृत्यू; आणि फेरीवाल्यांवरील मनसेच्या दादगिरीविषयी काय म्हणाले रामदास आठवले.

GST वर सरकार ठाम

"GST कधीच मागे घेणार नाही. पण त्यात काही बदल घडवून आणायचे असतील तर तो मार्ग खुला असेल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बिदर इथं रविवारी आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

"GSTसाठी कुठलीही किंमत मोजायला मी तयार होतो, पण त्यापासून मागे हटणार नव्हतो. GSTमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार तयार आहे. आम्ही राहू किंवा नाही राहू पण देशाला बर्बाद होऊ देणार नाही," असं ते म्हणाले.

"युपीए सरकारला फक्त लोकांना अडकवणं, लटकवणं आणि भटकवणं माहित होतं, " असा टोला मोदींनी मनमोहन सिंग सरकारवर लगावला आहे.

बांद्राच्या झोपडपट्टीत आग लावणाऱ्याला अटक

बांद्रा येथील गरीबनगर झोपडपट्टीवरील कारवाईदरम्यान लागलेल्या आगीच्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे.

Image copyright BBC/Rahul Ransubhe
प्रतिमा मथळा बांद्रा रेलवेस्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी अतिक्रमण हटवताना भीषण आग लागली.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, आपले अनधिकृत दुकान वाचवण्यासाठीच एकाने ही आग लावल्याचं निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शबीर खान या दुकानदारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

अटक केलेला आरोपी शब्बीर आणि त्याचे साथीदार हे आझाद मैदान हिंसाचारातील आरोपी आहेत. बांद्रा येथील बेहरामपाड्यातील गरीबनगरमध्ये शबीरचे कपड्याचे दुकान आहे. दुकानाच्या पोटमाळ्यावर तो राहतो.

गुरुवारी रेल्वे परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी तिथे पोहोचले. कारवाईस्थळापासून काही अंतरावरच शबीरचे दुकान होते. त्याने आजुबाजूच्या दुकानदारांना एकत्र केले आणि झोपड्यांना आग लावण्याचा कट रचला.

अहमदाबादमध्ये बालकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती

अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात शनिवारी 18 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर गुजरात सरकारने एक त्रिसदस्यीय समिती नेमली असल्याचं 'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright Allison Joyce / GETTY IMAGES
प्रतिमा मथळा प्रातिनिधीक छायाचित्र

अवघ्या तीन दिवसांत या शासकीय रुग्णालयात 18 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील नऊ बालकांचा मृत्यू 24 तासांत झाल्याची बाब उघडकीस आली.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विजय रुपाणी यांनी रविवारी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी या मृत्यूंचं कारण शोधण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले. त्यात एक बालरोगतज्ज्ञ, एक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एका सरकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे.

या समितीला त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

"या बालकांपैकी काहींची प्रकृती खूपच ढासळली होती आणि दूरच्या गावांतील डॉक्टर बहुधा अजूनही दिवाळीच्या सुटीवर असल्यानं या बालकांना दूरवरून येथील सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले असावं," असं आरोग्य खात्याचे प्रधान सचिव जयंती रवी यांनी सांगितलं.

फेरीवाल्यांवर दादागिरी करण्यापेक्षा सीमेवर लढा- आठवलेंचा मनसेवर निशाणा

मुंबईच्या फेरीवाल्यांनी एका 'मनसे' कार्यकर्त्यावर केलेल्या हल्ल्याचं रामदास आठवले यांनी समर्थन केलं आहे.

"लोकांना त्रास होत असेल अशा ठिकाणी फेरीवाल्यांनी बसू नये, मात्र त्यासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था करून द्यायला हवी," असं . औरंगाबादेत ते म्हणाल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

Image copyright MANPREET ROMANA/GettyImages
प्रतिमा मथळा रामदास आठवले

"मनसेचे कार्यकर्ते दमदाटी करत असतील, फेरीवाल्यांवर हल्ले करत असतील तर फेरीवाल्यांनी देखील प्रतिहल्ले करावे", असं आठवले म्हणाले.

"फेरीवाल्यांवर दमदाटी करण्यापेक्षा या कार्यकर्त्यांना लष्करात भरती करुन पाकिस्तानवर हल्ला करा," असं आठवले या पत्रकार परिषदेत म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)