#PIDI राहुल गांधी यांचा कुत्रा ट्विटरवर मोकाट सुटतो तेव्हा...

राहुल गांधी आणि पीडी Image copyright Getty Images/Twitter

गेल्या काही दिवसांत राहुल गांधी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांच्या मार्मिक विनोदी ट्वीट्समुळे अनेकांना आश्यर्यही वाटत असेल. राहुल गांधी यांच्या या मेकओव्हरच्या मागे कोण आहे?

आता खुद्द राहुल गांधी यांनीच हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, त्यांची ट्वीट्स हा पीडी करतो. पिडी हा राहुल यांचा पाळीव कुत्रा आहे. रविवारी राहुल यांनी ट्वीट करून पिडीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.

राहुल यांनी पिडीच्या वतीने लिहिलं आहे.

ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, लोक नेहमी विचारतात, या माणसासाठी कोण ट्वीट करत आहे. मी आता सर्वांसमोर हजर होतो आहे. मी आहे पीडी. मी त्यांच्यासारखाच स्मार्ट आहे. पाहा मी एका ट्वीटसोबत काय करू शकतो. उप्स... ट्रीटसोबत!

राहुल यांचा व्हीडिओ

14 सेकंदाच्या या व्हीडिओमध्ये राहुल त्यांचा पाळीव कुत्रा पिडीसोबत खेळत आहेत. त्यांनी त्याल नमस्ते करण्यासाठी सांगितल्यानंतर पिडी आपल्या पुढच्या दोन पायवर उचलतो.

त्यानंतर राहुल पिडीच्या नाकावर बिस्किट ठेवतात आणि चुटकी वाजवून हे बिस्किट खाण्यासाठी सांगतात. पिडी मोठ्या चातुर्याने हे बिस्किट खातो.

राहुल यांचं हे ट्वीट अनेकांनी रिट्वीट केलं आहे.

Image copyright Twitter

काँग्रेसची सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रम्या ट्वीटमध्ये म्हणतात, "तर तुम्हाला आता समजलं असेल, या टॅलेंटची स्पर्धा कोण करू शकतो?"

राहुल गांधी यांच्या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केलं, तसं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि काही नेत्यांनीही याची दखल घेतली.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आसामाचे मंत्री हेमंत बिस्व शर्मा ट्वीटमध्ये म्हणतात, 'राहुल गांधी सर, माझ्याशिवाय याला कोण चांगलं ओळखू शकतो. मला आजही आठवतं.... जेव्हा आम्ही आसामच्या गंभीर विषयांवर चर्चा करत होतो तेव्हा, तुम्ही याला बिस्किटं भरवण्यात मग्न असायचा.'

हेमंत बिस्व शर्मा 2001 ते 2015 पर्यंत आसाम काँग्रेसचे आमदार होते. 2016 ला ते भाजपमध्ये आले.

Image copyright Twitter

हेमंत यांच्या ट्वीटला उत्तर देताना लेखक पवन खेडा यांनी ट्वीट केलं की, 'ज्या बैठकीत कोण जास्त विश्वासू आहे हे समजलं होतं, ही तीच तर बैठक नव्हे?'

काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी स्मृती इराणींना 'तुम्ही आता कधी प्रेस कॉन्फरन्स घेणार', अशी विचारणा केली आहे.

राहुल गांधी यांची ट्विटरवर वाढती प्रसिद्धी पाहून इराणी यांनी एका रिर्पोटचा हवाल्याने राहुल गांधी परदेशात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, अशी टीका केली होती.

भाजपच्या वतीने राहुल यांचा हा व्हीडिओ विनोदी अंगानं मांडला गेला.

भाजपच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळणारे अमित मालवीय यांनी पॅडमॅन या सिनेमाचे पोस्टर एडिट करून त्यावर राहुल गांधी आणि पिडीचा फोटो लावून ट्वीट केलं आहे की, 'पिडी लाओ, काँग्रेस बचाओ.'

Image copyright Twitter

भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्य प्रीती गांधी यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांचे स्नॅपचॅट व्हीडिओचे स्क्रीनशॉट मिळवून ट्वीट केलं आहे, 'मला आजपर्यंत समजू शकलं नव्हतं की, असे मूर्खपणाचे मीम्स का बनवले जातात. पण मला हे प्रकरण आता समजलं आहे.'

अनेक ट्विटरकरांनी #Pidi हा हॅशटॅग वापरून त्यावर काही शाब्दिक कोट्या केल्या आणि मार्मिक भाष्यही काहींनी केली. फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा इतर सोशल मीडियावरही राहुल गांधींच्या पिडीचीच चर्चा आहे.

फेसबुक पोस्ट्मध्येही राहुल गांधी आणि पिडी ट्रेंडमध्ये आहेत.

Image copyright FACEBOOK

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी 'पिडीच्या अकाउंटला व्हेरिफाईड अकाउंट मिळण्यास किती वेळ लागणार' अशी विचारणा केली आहे.

अनेकांनी हॅशटॅग PIDI वारंवार ट्वीट केल्यानं हा ट्विटरवर टॉप ट्रेंड बनला होता.

Image copyright Twitter

चयन चटर्जी यांनी ट्वीट करताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पाळीव कुत्र्यांचे फोटो ट्वीट केले आहेत आणि पिडीचा इतिहास जुना असल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय पिडी गांधी नावाने एक अकाउंटही सुरू झालं असून त्यावर 6 ट्वीट झाले आहेत.

एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, लोक मला गुजरात निवडणुकीत मोदींच्या विरोधात उभे करू इच्छितात. पण ट्विटरवर माझ्या धमाक्यांनंतर मला विजयासाठी मतांची गरज आहे का?

Image copyright Twitter

राहुल यांचे ट्वीटरवर 40 लाख फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3.6 कोटी फॉलोअर्सशी तुलना करता ते फारच मागे आहेत.

पण गेल्या काही दिवसांत राहुल गांधी ट्वीटरवर चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांचे फॉलोअर्स आणि ट्विटरला मिळणारे रिट्वीट यांत चांगलीच वाढ झाली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)