नोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा होमी भाभांची झाली होती शिफारस

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
आधुनिक भारताचे शिल्पकार ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. होमी भाभा यांच्या कर्तृत्वाचा वेध.

आधुनिक भारताचे शिल्पकार असं यथार्थ वर्णन होणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा.

भारतातील ज्येष्ठ वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्या तोंडून आपल्या वैज्ञानिक मित्रांसाठी कौतुकाचे चार शब्द निघणं तसं दुर्मिळच. त्याला फक्त होमी जहांगीर भाभा यांचा अपवाद होता. रामन भाभांना लिओनार्डो दा व्हिंची म्हणत असत.

नेहमी डबल ब्रेस्ट सूट घालणारे भाभा यांना वैज्ञानिक विषयांबरोबरच संगीत, नृत्य, पुस्तक या विषयात त्यांना तितकाच रस होता. वैज्ञानिकांना भाषण करताना तुम्ही नक्कीच बघितलं असेल, पण आपल्या मित्रांचं पोट्रेट किंवा स्केच बनवताना कदाचित बघितलं नसेल.

Image copyright TIFR
प्रतिमा मथळा होमी भाभा.

आर्काइव्हल रिसोर्सेज फॉर कंटेंपररी हिस्ट्रीचे संस्थापक आणि भाभा यांच्यावर पुस्तक लिहिणाऱ्या इंदिरा चौधरी सांगतात, "मृणालिनी साराभाई यांनी मला सांगितलं की भाभांनी त्यांचे दोन स्केच तयार केले."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चित्रकार एम.एफ. हुसेन.

"इतकंच काय तर हुसेन यांचं स्केचसुद्धा तयार केलं होतं. जेव्हा हुसेन यांचं पहिलं प्रदर्शन मुंबईला भरलं तेव्हा भाभा यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. जेव्हा बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टचं प्रदर्शन भरायचं तेव्हा भाभा जरूर येत असत आणि आपल्या संस्थेसाठी आवर्जून पेंटिंग्स आणि मूर्ती असत."

संगीत प्रेमी

प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी सुरुवातीच्या दिवसांत भाभांबरोबर काम केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, 57 वर्षांच्या आयुष्यात भाभा यांनी जितकं मिळवलं तितकं कुणी दुसऱ्यानं मिळवल्याचं उदाहरण सापडणार नाही.

यशपाल सांगतात, "संगीतात त्यांना खूप रुची होती. मग ते भारतीय असो की पाश्चात्य. कोणत्या पेंटिंगला कुठे टांगायचं आणि कसं टांगायचं, फर्निचर कसं बनवायचं. प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारीक लक्ष असायचं."

"TIFR मध्ये दर बुधवारी अकॅडमिक कॉन्फरन्स होत असे. भाभा एखाद्याच कोलोकियमला ( अकॅडमिक कॉन्फरन्स) अनुपस्थित असतील. ते बहुतांश वेळा यायचेच. यावेळी ते सगळ्यांना भेटायचे आणि आजूबाजूला काय होतं आहे त्याची माहिती घ्यायचे."

जवाहरलाल नेहरूंचे भाई

Image copyright NUCLEARWEAPONARCHIVE.ORG
प्रतिमा मथळा जवाहरलाल नेहरू आणि होमी भाभा यांच्यात मित्रत्वाचं घनिष्ट नातं होतं.

होमी भाभांची जवाहरलाल नेहरूंशी जवळीक होती. नेहरूंना भाई म्हणणाऱ्या निवडक व्यक्तींमध्ये भाभांचा नंबर लागतो.

इंदिरा चौधरी म्हणतात, "नेहरूंना केवळ दोन माणसं भाई म्हणत असत. एक होते जयप्रकाश नारायण आणि दुसरे होमी भाभा. आमच्या एका संग्रहात इंदिरा गांधी यांचं एक भाषण आहे. ज्यात त्या सांगतात की, नेहरूंना भाभा नेहमी रात्री उशीरा फोन करायचे आणि काही झालं तरी नेहरू त्यांच्याशी बोलायला वेळ काढायचेच."

भाभा यांच्या विचारांचे आयाम विस्तारलेले होते. वर्तमानाबरोबरच भविष्यातल्या गरजांचीही त्यांना जाणीव होती आणि त्याला ते महत्त्व देत.

भविष्याचा वेध

प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. एम.जी.के. मेनन यांनी त्यांचा एक किस्सा ऐकवला, "मी एकदा त्यांच्याबरोबर डेहराडूनला गेलो होतो. तेव्हा पंडित नेहरू तिथे थांबले होते. एकदा आम्ही सर्किट हाऊसवरून निघून हाय वेवर निघाले."

"त्यांनी मला विचारलं तुम्ही रस्त्याच्या च्या दोन्ही बाजूंच्या झाडांना ओळखता का? मी म्हटलं त्यांचं नाव स्टरफुलिया अमाटा आहे."

Image copyright TIFR
प्रतिमा मथळा टीआय़एफआर संस्थेची वास्तू.

प्रा. मेनन यांनी सांगितलं, "भाभा म्हणाले मी अशीच झाडं सेंट्रल अव्हेन्यू वर लावू इच्छितो. मी म्हटलं, होमी या झाडांना मोठं व्हायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहीत आहे का?"

"त्यांनी विचारलं, किती? मी म्हटलं कमीत कमी शंभर वर्षं. ते म्हणाले त्याने काय होणार? मी राहणार नाही, तुम्ही राहणार नाही, पण हे वृक्ष तर राहतील. येता जाता लोक त्यांना बघतील जसं आपण आता हे झाडं बघत आहोत. मला हे पाहून खूप छान वाटलं की ते स्वत:पेक्षा भविष्याचा विचार जास्त करत आहेत."

साठ वर्षाआधी झाडांचं ट्रांसप्लांट

भाभा यांना बागकामाची फार आवड होती. TIFR आणि BARC च्या सुंदर हिरवळीचं श्रेय त्यांना दिलं जातं.

इंदिरा चौधरी सांगतात, "TIFR मध्ये अमीबा गार्डन नावाचं गार्डन आहे ज्याचा चेहरा अमीबासारखा होता. त्या पूर्ण गार्डन पाहून ते तीन फूट शिफ्ट केलं होतं, कारण त्यांना ते आवडलं नव्हतं."

"त्यांना परफेक्शन हवं होतं. भाभांनी सगळ्या मोठ्या वृक्षांना ट्रान्सप्लांट केलं होतं. एकाही झाडावर काटा नव्हता. पहिले झाडं लावली मग इमारती तयार केल्या. मला ही गोष्ट आठवली. कारण बेंगळुरू मेट्रो बनवण्यासाठी झाडं तोडली होती. झाडं तोडण्याऐवजी त्यांना ट्रान्सप्लांट केलं जाऊ शकतं असं त्यांनी खूप आधीच ओळखलं होतं.

खाण्याचे शौकीन भाभा

भाभा कायम प्रवाहापासून वेगळं चालण्यात धन्यता मानायचे. वक्तृत्वात त्यांचा कोणीच हात पकडू शकत नव्हतं. कोणत्याही गोष्टीचं अवडंबर माजवण्यावर त्यांचा विश्वास नव्हता.

इंदिरा गांधीचे वैज्ञानिक सल्लागार असलेले अशोक पार्थसारथी सांगतात, "जेव्हा ते 1950 ते 1966 च्या दरम्यान अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष होते, तेव्हा ते भारत सरकारचे सचिवसुद्धा होते. ते सेवकाला आपली बॅगही उचलू देत नसत. स्वत:च बॅग उचलून चालायला लागत. यानंतर कार्यभार स्वीकारलेले विक्रम साराभाईसुद्धा स्वावलंबी होते. मी आधी वैज्ञानिक आहे आणि नंतर अणुशास्त्रज्ञ.

Image copyright TIFR
प्रतिमा मथळा युवा होमी भाभांचे छायाचित्र.

एका परिसंवादात एका कनिष्ठ शास्त्रज्ञाने साराभाईंना एक प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर माहिती नसल्याचं त्यांनी मान्य केलं. हे मान्य करण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटला नाही. काही दिवसांतच माहिती घेऊन उत्तर देतो, असं त्यांनी सांगितलं.

होमी भाभा खाण्यापिण्याचे शौकीन होते हे फारच कमी लोकांना माहिती आहे. अणुशास्त्रज्ञ एम.एस. श्रीनिवासन यांनी इंदिरा चौधरी यांना साराभाईंबद्दलची आठवण सांगितली. वॉशिंग्टन भेटीदरम्यान भाभा यांचं पोट बिघडलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना फक्त दही खाण्याचा सल्ला दिला होता.

त्यावेळी त्यांनी पपई संपवली. पोच्ड एग्जचा नाष्टा केला. कॉफी आणि टोस्टचा समाचार घेतला आणि त्यानंतर दही मागवलं. सगळ्या पदार्थांचा दुसरा राऊंड झाल्यावर दही मागवलं होतं.

नोबेलसाठी मानांकन

भाभा यांचा एक लाडका कुत्रा होता. त्याचे कान सूपासारखे लांब होते. ते त्याला क्युपिड नावाने हाक मारत. दररोज त्याला फिरायला घेऊन जात असत.

भाभा घरी आले की क्युपिड त्यांच्या दिशेने धाव घेत असे. दुर्देवी अपघातात भाभा यांचं निधन झालं. भाभा दिसत नसल्याने दु:खी झालेल्या क्युपिडने पुढचा महिना अन्नाला स्पर्शदेखील केला नाही.

रोज डॉक्टर त्याला औषध देत असत. पण क्युपिड फक्त पाणी प्यायचा. खाणं साधं हुंगायचादेखील नाही. महिनाभर पोटात काही न गेल्याने क्युपिडची प्रकृती ढासळली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.

कोणीही माणूस परफेक्ट नसतो. भाभाही एक माणूसच होते. ते नियमाला अपवाद नव्हते. वेळ न पाळणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वातलं वैगुण्य होतं.

Image copyright TIFR
प्रतिमा मथळा सगळ्यात डावीकडचे होमीभाभा आणि उजवीकडे आइनस्टाइन

इंदिरा चौधरी यांनी यासंदर्भातल्या आठवणींना उजाळा दिला. 'प्रत्येक व्यक्तीमध्ये बऱ्यावाईट गोष्टी असतात. भाभांना वेळेचं भान नसे. भाभा यांची भेट घेण्यासाठी लोक वेळ घेत असत. ही माणसं अनेक तास त्यांची प्रतीक्षा करत असत."

"व्हिएन्नास्थित आंतरराष्ट्रीय अणुसंस्थेच्या बैठकींनाही ते उशिरा पोहोचत. यावर उपाय म्हणून त्यांना बैठकीची वेळ अर्धा तास आधीची सांगण्यात येत असे. जेणेकरून भाभा बैठकीच्या सुरुवातीपासून उपस्थित राहू शकतील."

प्रतिष्ठेच्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठी भाभा यांच्या नावाची पाच वेळा शिफारस करण्यात आली होती. त्यांच्या योगदानाचं महत्त्व लक्षात घेऊनच त्यांना आधुनिक भारताचा निर्माणकर्ता अशी बिरुदावली मिळाली होती.

त्यांना श्रद्धांजली वाहताना जेआरटी टाटा म्हणाले होते, 'आयुष्यात तीन माणसांना भेटण्याचं भाग्य मला लाभलं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि होमी भाभा. होमी भाभा फक्त वैज्ञानिक किंवा गणितज्ञ नव्हते तर महान अभियंता, उद्यानकर्ते आणि द्रष्टे होते.

"याव्यतिरिक्त ते उत्तम कलाकार होते. ज्या लोकांना मी ओळखतो त्यापैकी परिपूर्ण व्यक्तिमत्व कोण असा प्रश्न कोणी विचारला तर होमी यांचं नाव एकमेव असेल."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)