आता सामना धुमल वि. वीरभद्र : मोदी-शहांनी का टाकली हिमाचलच्या पिचवर गुगली?
- हेमंत कुमार
- बीबीसी हिंदीसाठी

फोटो स्रोत, Getty Images
प्रेमकुमार धुमल
हिमाचल प्रदेशात निवडणुकांचा निकाल हाती आला की मग कोण सिंहासनावर बसेल, ते बघू, असं भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवलं होतं. पण इतर राज्यांचा फॉर्म्यूला हिमाचलला लागू होणार नाही, हे पक्षनेतृत्वानं आता मान्य केलं आहे. म्हणूनच एक नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे - प्रेमकुमार धुमल.
पण, मतदानाला अवघे आठ दिवस उरले असताना धुमल यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्यामुळे स्पष्ट झालं आहे की संपूर्ण भारतात भाजप जी पद्धत मांडायच्या विचारात होती, ती हिमाचलमध्ये यशस्वी झाली नाही.
खरंतर हिमाचल प्रदेशात नेत्यांसाठी कधीही निवडणुका झाल्या नाहीत. आता भाजपनं उचललेल्या या पावलामुळे मात्र अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
फोटो स्रोत, PTI
अरुण जेटली आणि प्रेमकुमार धुमल
पहिली गोष्ट अशी, की भाजप नेतृत्वानं हे मान्य केलं आहे की स्थानिक नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव वेगवेगळा असतो.
विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वाची जशी मोट बांधतात तशी राष्ट्रीय नेतृत्वाची बांधू शकत नाही, विशेषत: त्या राज्यांमध्ये जिथं स्थानिक नेतृत्व ठीकठाक असतं.
हिमाचलमध्ये दांडपट्टा चालला नाही.
उत्तर प्रदेश किंवा हरियाणामध्ये जसा पक्षश्रेष्ठींचा दांडपट्टा चालला, तसा हिमाचल प्रदेशात चालणार नाही, हे भाजपला समजायला जरा वेळ लागला.
तापमान बदलाबरोबर थंड होणाऱ्या पहाडांसारखाच इथला प्रचारसुद्धा थंड पडलेला सगळ्यांना दिसत होता. त्याला काँग्रेस नेत्यांनी 'बिन नवरदेवाची वरात' असं म्हटलं होतं.
फोटो स्रोत, PTI
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुख्यमंत्रीपदी कोण असणार हे घोषित का केलं नाही, या प्रश्नाचं उत्तरं देतांना भाजप नेत्यांची भंबेरी उडाली होती.
कोणाचंही नाव घोषित करा, पण नाव जाहीर करा, अशी विनंती हिमाचल प्रदेशातील भाजपाचे नेते पक्षश्रेष्ठींना करत होते.
निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीपर्यंत ही मोहीम सुरू होती, पण पक्षश्रेष्ठींचं यावर कायम मौन होतं.
नेतृत्व किती महत्त्वाचं?
इथल्याच काय तर दिल्लीहून आलेल्या नेत्यांकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हा पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याच्या बाता ते करत होते. पण गेल्या दोन तीन दिवसांत हा घटनाक्रम वेगानं बदलला.
हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीदाचा उमेदवार घोषित करणं किती महत्त्वाचं आहे, याचं विवेचन काही राष्ट्रीय नेत्यांनी मोदी आणि शाह यांच्यासमोर केलं. त्याचासुद्धा परिणाम झाला.
फोटो स्रोत, PTI
हिमाचलच्या चंबा भागात उपस्थित असलेले अमित शाह
स्वत: अमित शहा दोन दिवसांपासून इथंच आहेत. सोमवारीच अशी पुसटशी चर्चा सुरू झाली होती की 2 नोव्हेंबरच्या रॅलीत मोदी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.
पण, वेळेअभावी शहा यांनी मंगळवारी घोषणा केली होती. हे पण बोललं जातं की जर उमेदवाराबाबत घोषणा केली नसती तर हा सामना थेट मोदी आणि वीरभद्र सिंह, असा झाला असता.
पक्षश्रेष्ठींनासुद्धा हे नको होतं. तसंच गुजरातची एकंदर परिस्थिती बघता पक्षश्रेष्ठींना हिमाचलमध्ये जास्त गुंतून पडायचं नव्हतं.
वीरभद्र विरुद्ध धुमल
पण, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्यामुळे हिमाचल प्रदेशात जो सामना मोदी विरुद्ध वीरभद्र होणार होता, त्यात अचानक बदल झाला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
वीरभद्र सिंह
आता हा सामना त्याच दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार - वीरभद्र विरुद्ध धुमल.
1998 पासून या दोघांमध्ये जय पराजयाचा सामना सुरू आहे. एकमेकांसमोर उभं ठाकण्याची ही त्यांची पाचवी वेळ आहे.
मागच्या चार लढतीत दोनदा वीरभद्र सिंह आणि दोनदा धुमल यांचा विजय झाला आहे.
आता भाजपा कोणत्या पद्धतीनं वातावरण तापवतं आणि या बदलत्या परिस्थितीत काँग्रेस काय रणनिती आखतं, हे दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)